सुचित्रा दिवाकर
हृदयाच्या झडपांचे आजार असल्यास, धाप लागणे, धडधड वाढणे, चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसतात. यामध्ये औषोधोपचारा व्यतिरिक्त दोन उपचार केले जातात. एक तर फुग्याच्या साहाय्याने झडपेची रूंदी वाढवणे व दुसरा म्हणजे कृत्रिम झडप लावणे हे होय. रक्त प्रवाह सुरळीत असण्याच्या प्रक्रियेत हृदयांच्या झडपांचे कार्य महत्त्वाचे असते. झडपांचे कार्य बिघडले तर रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो.
फुफ्फुसांमध्ये रक्त साचू लागते. त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. या अवस्थेत रुग्णाला शारीरिक श्रम केले म्हणजे दम लागण्यास सुरुवात होते थकवा जाणवू लागतो. उदा. आंघोळ करणे, घरातल्या घरात चालणे आदी अगदी छोट्या हालचालींचा सुद्धा त्रास होऊ लागतो. त्याचबरोबर छातीत धडधडणे, चक्कर येणे ही लक्षणेसुद्धा दिसू लागतात. झाडपांचे कार्य बिघडल्यामुळे हृदयातील रक्त प्रवाहांची दिशा बदलते परिणामी या प्रवाहात अडथळा आल्याने नेहमीच्या लयबद्ध हृदयाच्या ठोक्यांचा आवाज बदलतो व वेगवेगळे आवाज येतात. या आवाजाच्या लयीवरून कोणती झडप खराब झाली आहे याचे निदान डॉक्टर करतात.
हृदयाची झडप खराब झाली आहे हे ओळखण्यासाठी एक्सरे आणि ईसीजी या वैद्यकीय तपासण्या करतात. यावरून हृदयाचा आकार बदलला आहे का आणि फुफ्फुसासंबंधीची मूलभूत माहिती मिळते. मला या तपासण्या पुरेशा नसतात. इको कार्डिओग्राफी आणि कलर डॉपलर या तपासण्या मात्र अत्यंत आवश्यक आहेत. झडपेची वाढलेली जाडी, एकमेकांना चिकटलेल्या पडद्यांमुळे कमी झालेले झडपेचे क्षेत्रफळ तसेच झडपा नीट बंद न झाल्यामुळे उलट्या बाजूने जाणारा रक्तप्रवाह या सर्व गोष्टी कलर डॉपलरमध्ये स्पष्टपणे दिसतात. या तपासण्यावरून हृदयरोगाची तीव्रता किती आहे. सौम्य, मध्यम की तीव्र आहे हे ठरवले जाते. त्यानुसार उपाययोजना ठरवली जाते. झडपांमधील रचनेत बदल झाला असल्याने बिघडलेल्या झडपा औषधांनी दुरुस्त होत नाहीत; पण सौम्य आजारांमध्ये लागणारी धाप किंवा होणारी धडधड औषधांनी दुरूस्त होऊ शकते. त्यासाठी शारीरिक हालचालींवर नियंत्रण आणि मिठाचे सेवन मर्यादित ठेवणे ही पथ्ये पाळावी लागतात.
झडपांमधील आजार झालेल्या रुग्णांमध्ये 60 ते 70 टक्के रुग्णांमध्ये डावीकडची हृदय झडप बारीक झालेली दिसते. अशा स्थितीत झडपेची रूंदी वाढवण्यासाठी शस्त्रक्रियेला पर्यायी उपचार असतो. यामध्ये पायातल्या नलिकेमधून टोकाशी फुगा असलेली नळी हृदयात घातली जाते. तो फुगा झडपेच्या मधोमध ठेवून फुगवला जातो. त्याच्या दाबामुळे झडपेच्या एकमेकांना चिकटलेले पदर वेगळे होतात व झडपेचे क्षेत्रफळ वाढते. या उपचारासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 दिवस राहावे लागते. झडप फारच खराब झाली असेल तर मात्र शस्त्रक्रियाच करावी लागते. तसेच, झडप नीट बंद होत नसल्यास शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशावेळी हृदय पूर्ण उघडून म्हणजे 'ओपन हार्ट' शस्त्रक्रिया करावी लागते. खराब झालेली झडप काढून टाकून त्या जागी त्याच मापाची दुसरी झडप बसवली जाते. या झडपा दोन प्रकारच्या असतात धातूंच्या संयोगापासून आणि वेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेली झडप ही सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते. या झडपा साधारणपणे 12 ते 15 वर्षे टिकतात. या झडपांवर रक्त चिकटून ते गोठू शकते. त्यामुळे ही झडप बिघडते. असे होऊ नये म्हणून त्याचे गोठण्याचे प्रमाण एका विशिष्ट मर्यादेत ठेवावे लागते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे औषध घ्यावे लागते. तेही अतिशय काटेकोरपणे घ्यावे लागते. ते कमी अथवा जास्त झाल्यास दुसर्या समस्या उद्भवू शकतात.
या समस्या उद्भवू नयेत म्हणून नियमितपणे रक्तातील गोठण्याचे प्रमाण तपासावे लागते. दुसर्याही प्रकारची एक झडप असते त्यावर रक्त चिकटण्याची शक्यता कमी असते मात्र ही झाडप जास्त काळ टिकण्याची शक्यता नसते. थोडक्यात, झडपांच्या विकारावर कायमस्वरूपी शस्त्रक्रिया अथवा उपाय नाही. एकदा बदललेली झडप पुन्हा बदलावीच लागते. तेच फुगा घालून वाढवलेली झडपेची रूंदी काही वर्षांनी पुन्हा कमी होते. या आजारात योग्य वेळी उपचार करणे खूप गरजेचे असते. वेळेआधी अथवा वेळेनंतरही शस्त्रक्रिया करणे योग्य नसते. अशा रुग्णांनी वरचेवर तपासणी करत राहावी. कारण वेळे आधी शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते आणि वेळ टळल्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास त्यामध्ये रुग्णाला धोका जास्त असतो. शिवाय फायदा दीर्घकाळ टिकणारा नसतो. औषधाचे परिणाम व चाचण्यांनी योग्य वेळ ठरवता येते. अलीकडे यावर बरेच संशोधन सुरू आहे. भविष्यात कदाचित यावर आणखी प्रभावी उपाय निर्माण होऊ शकतात.