डॉ. संजय गायकवाड
उत्तम पचन आणि सशक्त पचनसंस्था हे आरोग्याचे लक्षण आहे. पचनामध्ये बिघाड झाल्यास वेगवेगळे आजार निर्माण होतात. अयोग्य आहार आणि आहाराच्या अयोग्य सवयी यामुळेच शरीरातील वात, पित्त, कफ हे त्रिदोष वाढतात आणि त्याचा परिणाम पचनसंस्थेच्या आरोग्यावर होतो. त्याचबरोबर शरीरातील इतर संस्थांवरही त्याचा हळूहळू परिणाम होऊ लागतो. आरोग्यसंपन्न पचन हे आरोग्यासंपन्न जीवनाचे मूलभूत कारण आहे. अर्थात, त्यासाठी योग्य आणि संतुलित आहार गरजेचा असतो. शरीरातील त्रिदोष वाढू नयेत म्हणून योग्य वेळी काळजी घेतली तर सुदृढ आयुष्य जगणे सहज शक्य होऊ शकते.
आयुर्वेदानुसार पचनसंस्थेचे आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि उत्तम राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. आरोग्यसंपन्न पचन हे आरोग्यसंपन्न जीवनाचे नेतृत्व करते आणि अयोग्य पचन हे आजारी किंवा अनहेल्दी जीवनाचे नेतृत्व करते. थोडक्यात, आपले आरोग्य हे उत्तम पचनावर अवलंबून असते. पचन उत्तम होते म्हणजे, आपण जे काही खाल्ले आहे, त्यातील पोषक घटक अतिशय चांगल्या पद्धतीने शरीरातील प्रत्येक पेशीद्वारे स्वीकारले गेले आहेत. आपले पचन जर स्वास्थ्यपूर्ण असेल तर आपले शरीर स्वास्थ्यपूर्ण उती, पेशी (धातू) तयार करू शकते. याउलट, पचन कमकुवत वा अशक्त असेल, तर शरीरातील पेशी म्हणजे स्नायू, रक्त, मज्जातंतू हेसुद्धा कमकुवत होतात आणि संभाव्य आजार होण्याची शक्यता वाढते.
पचनासंबंधीच्या आजारांमागे आपल्या सवयी कारणीभूत असतात. आपल्या चवीच्या अट्टहासापायी आपण अयोग्यरीत्या आहार घेतो आणि शरीरातील दोषांचे असंतुलन करून घेतो. वात हा थंडीमुळे वाढतो, कोरडे आणि हलके अन्न म्हणजे कच्च्या भाज्या जास्त खाल्ल्यास तो वाढतो. पित्त उष्णतेमुळे वाढते, तेलकट, तळलेले पदार्थ यासारख्या पदार्थांमुळे ते वाढते, तर कफ हा थंडीमुळे वाढतो. पचायला जड पदार्थ, थंड पदार्थ, आइस्क्रीम, योगर्ट यामुळे तो वाढतो. अयोग्य प्रकारे आहार घेणे हेसुद्धा त्रासदायक ठरू शकते. तसेच आरोग्यसंपन्न आहार चुकीच्या पद्धतीने घेतल्यास तेसुद्धा पचन विकाराचे कारण बनू शकते.
पचनक्रिया अशक्त असल्याची काही लक्षणे म्हणजे, अतिरिक्त वात वाढणे, बद्धकोष्टता, डायरिया, जळजळणे, उलटी होणे, अपचन, गोळे येणे, वेदना होणे, ढेकर येणे इत्यादी होय. आधुनिक वैद्यकशास्त्रात याला इरिटेबल बॉवल सिंड्रोम, अल्सर्स, कोलायटिस, पँक्रियाटायटिस यासारखी नावे दिली जातात; परंतु आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम तज्ज्ञ त्या व्यक्तीची जीवनशैली तपासतो. चुकीच्या खाण्याच्या सवयी, चुकीचे पदार्थ खाण्यासाठी निवडणे आणि अयोग्य पदार्थ एकत्र करून खाणे या सर्व गोष्टी थेट पचनाशी निगडित असतात आणि त्यातूनच हा त्रास उद्भवतो.
अशा परिस्थितीत आयुर्वेदिक तज्ज्ञ रुग्णाला तपासत आणि त्याचबरोबर रोगाची सुरुवात अर्थात व्याधीजनन कसे झाले, हेही तपासतो. हे समजून घेतल्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात. हे उपचार रुग्णाच्या जीवनशैलीत योग्य तो बदल सांगून आणि त्याचबरोबर औषधोपचार करून केले जातात. आयुर्वेदानुसार पचनसंस्थेच्या विकारासाठी कारणीभूत ठरणारे काही मूलभूत घटक आहेत. त्यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झाले तर वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात.
जठराग्नी ः यालाच आपण 'अग्नी' असे म्हणतो. हा जठराग्नी खाल्लेले अन्न छोट्या कणांमध्ये परिवर्तित करण्याचे काम पचनादरम्यान करतो. ज्या वेळेला हा जठराग्नी सशक्त असतो, तेव्हा शरीर योग्य प्रकारे हे काम करते. ज्यावेळी हा जठराग्नी अतिशय कमजोर असतो, तेव्हा अन्नाचे सुरुवातीचे पचन योग्य होत नाही आणि योग्य प्रकारे पचन न झाल्याने आम वाढतो. ज्या वेळी जठराग्नी खूप जास्त असतो तेव्हा जळजळ होते.
समान वायू ः हा वाताचा उपप्रकार आहे. तो शरीरामधील पोषक घटक शोषून घेण्याचे काम करत असतो. ज्या वेळी अन्नाचे योग्य प्रकारे तुकडे होतात, तेव्हा समान वायू त्यातील घटक शोषून घेण्याचे मार्गदर्शन करतो. केवळ मार्गदर्शनच नाही तर समान वायू अग्नीवर थेट परिणाम करतो. समान वायू योग्य नसल्यास त्यामुळे गॅस उत्पन्न होतो, डायरिया होतो आणि आतड्यांची काही पदार्थ शोषण्याची क्षमता कमी होते.
अपान वायू ः या प्रकारचा वात खालच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. खास करून विषारी घटकांना बाहेर टाकणे आणि मळ बाहेर टाकणे यावर नियंत्रण ठेवतो. ज्यावेळी हा वायू सशक्त असतो, त्यावेळी उत्सर्जनाची क्रिया समान्य असते. मळ घट्ट पण मऊ असतो. ज्यावेळी यामध्ये बिघाड होतो, तेव्हा दोन्ही प्रकारच्या समस्या म्हणजे, बद्धकोष्ठता आणि डायरिया उद्भवतात.
क्लेडक कफ ः या प्रकारचा कफ पचनसंस्थेतील श्लेष्म आवरणाचे रक्षण करतो. खास करून पोटातील आवरणाचे रक्षण करतो. ज्या वेळी हा कफ सशक्त असतो, तेव्हा अग्नी आणि वायूचे संतुलन राखले जाते. तो कमी झाल्यानंतर उष्णता वाढते आणि कोरडेपणा येतो. अतिरिक्त श्लेष्म तयार झाल्यास अन्नावरची वासना नाहीशी होते. तसेच कफाचे प्रमाण वाढले तर पचनमार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
पक्काक पित्त ः या प्रकारच्या पित्तामध्ये अग्नी असतो. त्याला पाचक अग्नी असे म्हणतात. जठराग्नीचा हा प्रकार अन्नाचे विघटन करण्यासाठी कारणीभूत असतो. यामध्ये पित्त वाढते आणि अग्नी कमी होण्याची शक्यता असते. एकाच वेळी अग्नी आणि पाणी वाढले तर पाण्यामुळे अग्नी विझू शकतो. परिणामी, क्रॉनिक पित्त होऊन पचनसंस्था बिघडते. यामुळे जळजळ आणि आम तयार होतो. या सर्व गोष्टी दुबळ्या पचनामुळे होतात.
आम दोष ः आम हे अयोग्य पद्धतीने पचलेल्या अन्नाचे शेवटचे लक्षण होय. हा विषारी घटक असून तो पचनसंस्थेत साचतो आणि नंतर तो वेगवेगळ्या अवयवांमध्ये साचतो. पेशींमध्ये साचतो आणि आजार होण्यास कारणीभूत होतो. आम वाढल्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते आणि दुर्गंधीयुक्त वात तयार होतो.
सुयोग्य उपचार पद्धती ः सुयोग्य अर्थात नियमानुसार दिल्या जाणार्या उपचारांमध्ये सर्व प्रकारच्या सवयीसुद्धा बघितल्या जातात. कारण, या सवयी सशक्त पचनासाठी पूरक असतात. आपण काय खातो यापेक्षा कसे खातो, हे जास्त महत्त्वाचे असते. आनंदी आणि सशक्त वातावरणात खाणे हे बासमती तांदूळ खाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.
जेवताना सभोवतालचे वातावरण शांत, आनंदी, उत्साही असावे. कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा मन विचलित करणारी गोष्ट आजूबाजूला नसावी. थोडक्यात टीव्ही बघताना, वाचताना जेवण करू नये, अन्न व्यवस्थितपणे चावावे, गरम अन्नच खावे, अन्न अगदी थोड्या पाण्याबरोबर खावे, अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्यावी. संपूर्ण भरपेट आहार दुपारच्या वेळी जेव्हा सूर्य माथ्यावर असेल आणि अग्नी प्रदीप्त असेल तेव्हाच घ्यावा. खूप जास्त आहार घेऊ नये.
योग्य आहार म्हणजे, अन्नाकडे अतिशय आध्यात्मिक दृष्टीने बघून त्याचे सेवन करावे. सुदृढ आहार घेतल्यास अनेक पचनासंबंधी समस्या दूर होतात. योग्य आहारासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत तर गुरुत्व लक्षणे दिसू लागता. थोडक्यात, आरोग्यपूर्ण आहार, योग्य पदार्थांची संगती योग्य पचनासाठी कारणीभूत ठरते. आयुर्वेदानुसार जेवणापूर्वी सॅलड खाण्याऐवजी ते जेवणानंतर खाणे हे जास्त योग्य असते. कारण ते थंड असतात आणि अग्नी कमकुवत बनवतात. जेवताना गोड पदार्थ, डेझर्ट हे सुरुवातीला खावे. जेवणानंतर खाल्ल्यास पचन बिघडते. दोन विरुद्ध पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास त्याचाही पचनावर परिणाम होतो. म्हणजे दूध हे थंड असते आणि ते उष्ण असलेल्या योगर्टबरोबर एकत्र केले तर त्याचा विरुद्ध परिणाम दिसतो. तसेच दुग्धजन्य पदार्थ आणि मांस हेदेखील एकत्रितपणे खाऊ नये.
योग्य आहाराची निवड केल्यास पचनसंस्थेला ते पूरक ठरते आणि त्यामुळे शरीरातील वात, पित्त, कफ हे त्रिदोषदेखील संतुलित राहतात. आयुर्वेदानुसार आपल्या प्रकृतीनुसार आहार घेतला नाही तर विकृती निर्माण होते. याच तत्त्वावर आपला आहार आणि जीवनशैली आखली पाहिजे. तेच योग्य पचनासाठी आणि पर्यायाने योग्य आरोग्यासाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे.
(पूर्वार्ध)