

डॉ. प्राजक्ता पाटील
अतिरिक्त मासिक रक्तस्राव, योनीमार्गात वेदना आणि गर्भधारणेशी संबंधित अडचणी निर्माण करणार्या अॅडेनोमायोसिस आणि फायब्रॉईडस् या स्त्रियांमध्ये आढळणार्या दोन सामान्य समस्या आहेत.
अॅडेनोमायोसिस आणि फायब्रॉईडस् या दोन्ही आजारांचा गर्भाशयावर होणारा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होतो. यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण योग्य निदानामुळे प्रभावी उपचारांची दिशा ठरते. दोन्ही समस्या दिसायला सारख्या वाटल्या तरी त्यांची निर्मिती कशी होते, त्या कुठे वाढतात आणि दैनंदिन आयुष्यावर त्यांचा नेमका कसा परिणाम होतो, यामध्ये मूलभूत फरक आहे.
अॅडेनोमायोसिस म्हणजे गर्भाशयाच्या आतील आवरणासारख्या (एंडोमेट्रियम) ऊती गर्भाशयाच्या स्नायूंच्या थरात म्हणजे मायोमेट्रियममध्ये वाढू लागणे. यामुळे गर्भाशय जाड आणि मोठे होते, कधी कधी त्याचा आकार दुप्पट किंवा तिप्पटही होऊ शकतो. पोटात किंवा योनींमार्गात वेदना, मोठ्या गाठींसह होणारा जास्त आणि दीर्घकाळ चालणारा मासिक रक्तस्राव तसेच अत्यंत वेदनादायक पाळी ही अॅडेनोमायोसिसची प्रमुख लक्षणे मानली जातात. अनेकवेळा या आजारात ठळक लक्षणे नसल्यामुळे अनेक स्त्रियांना आपण या समस्येने ग्रस्त आहोत, याची जाणीवही होत नाही. साधारणपणे ज्यांनी गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून घेतली आहे, ज्या चाळिशीच्या पुढील वयाच्या आहेत, त्यांच्यात अॅडेनोमायोसिस अधिक प्रमाणात आढळतो, असे निरीक्षण आहे.
फायब्रॉईडस् म्हणजे गर्भाशयाच्या भिंतीत किंवा त्यावर वाढणार्या स्नायू व ऊतींच्या गाठी. वैद्यकीय भाषेत त्यांना लिओमायोमा असेही म्हटले जाते. या गाठी कर्करोगरहित असतात आणि स्त्रियांमध्ये आढळणार्या सर्वात सामान्य सौम्य गाठी मानल्या जातात. फायब्रॉईडस्मुळे वेदना, अनियमित आणि जास्त रक्तस्राव अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. मात्र काही स्त्रियांमध्ये कोणतीही लक्षणे न दिसता फायब्रॉईडस् ‘सायलेंट’ स्वरूपातही आढळतात. फायब्रॉईडस्च्या उपचारांचा निर्णय प्रामुख्याने लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.
अॅडेनोमायोसिसमध्ये गर्भाशयाच्या स्नायूंमध्येच एंडोमेट्रियल ऊती वाढतात, तर फायब्रॉईडस् या गर्भाशयाच्या आत, भिंतीत किंवा बाहेर वाढणार्या स्वतंत्र गाठी असतात. अॅडेनोमायोसिसचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी हार्मोन्समधील असंतुलन, गर्भाशयातील दाह आणि प्रसूतीशी त्याचा संबंध जोडला जातो. फायब्रॉईडस् मात्र असामान्य स्नायू पेशींच्या वाढीमुळे होतात आणि त्यावर हार्मोन्स तसेच आनुवंशिक घटकांचा प्रभाव असतो.
अॅडेनोमायोसिसमध्ये गर्भाशय संपूर्णपणे मोठे व नाजूक होते, तर फायब्रॉईडस्मध्ये गाठींच्या आकारावर आणि संख्येवर गर्भाशयाचा आकार अवलंबून असतो.
अॅडेनोमायोसिसमध्ये पाळीच्या काळात तीव्र, कळ येणार्या वेदना जाणवतात; तर फायब्रॉईडस्मध्ये वेदना गाठींच्या जागेवर अवलंबून बदलतात. दोन्ही आजारांत जास्त रक्तस्राव होऊ शकतो; मात्र त्याची पद्धत आणि तीव्रता वेगवेगळी असते. प्रजननक्षमतेवर परिणाम पाहिला तर अॅडेनोमायोसिसमुळे भ्रूण रोपणात अडथळे येतात आणि वारंवार गर्भपात होण्याची शक्यता वाढते; तर फायब्रॉईडस्मुळे गर्भाशयाचा आकार बदलून किंवा नलिका अडवून गर्भधारणा कठीण होऊ शकते.
या दोन्ही आजारांची कारणे पूर्णपणे स्पष्ट नसली तरी हार्मोन्स, आनुवंशिकता, दाह आणि काही वेळा आघात यांचा सहभाग असू शकतो, असे संशोधनातून सूचित होते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचा फायब्रॉईडस्च्या वाढीवर विशेष प्रभाव दिसून येतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान फायब्रॉईडस् वाढतात, तर रजोनिवृत्तीच्या काळात ते आकुंचन पावतात.
उपचारांच्या दृष्टीने अॅडेनोमायोसिस आणि फायब्रॉईडस्साठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. अॅडेनोमायोसिसमध्ये वेदनाशामक औषधे, हार्मोनल उपचार, जीएनआरएच अॅगोनिस्टस्, युटेरिन आर्टरी एम्बोलायझेशन, एंडोमेट्रियल अब्लेशन आणि गंभीर प्रकरणांत गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. फायब्रॉईडस्मध्ये लहान आणि लक्षणे न दिसणार्या गाठींसाठी निरीक्षण, औषधोपचार, कमी आक्रमक प्रक्रिया, मायोमेक्टॉमी किंवा अत्यंत गंभीर स्थितीत हिस्टेरेक्टॉमी हे पर्याय उपलब्ध आहेत.