हृदयशस्त्रक्रियेनंतर घ्यायचा आहार | पुढारी

Published on
Updated on

डॉ. बिपीनचंद्र भामरे

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) सीव्हीडीमुळे होणारे 85 टक्के मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे आणि स्ट्रोक्समुळे होतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे विकार (कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज – सीव्हीडी) हे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार असतात. त्यात हृदयातील रक्तवाहिनीचा विकार, र्‍ह्युमॅटिक हार्ट डिसीज इत्यादी आजारांचा समावेश असतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, अतिरिक्त कोलेस्टरॉल, मानसिक ताण, चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यासारख्या हृदयविकारांसाठी कारणीभूत असणार्‍या घटकांमुळे हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

यापैकी बहुतेक घटकांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. जीवनशैलीशी संबंधित समस्या आपण टाळू शकतो. आहार हा सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.

हृदय शस्त्रक्रियेनंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला सकस आणि संतुलित आहार घेण्यास सांगतात. कारण सकस आहार घेतल्यामुळे तुमची प्रकृती सामान्य होण्यास मदत होते, तुमच्या हृदयाला इतर काही समस्या भेडसावत नाहीत. तुम्ही व्यवस्थित आहार घेतला तर तुमच्या शरीरावरील छेद भरून निघण्यास मदत होते. शस्त्रक्रियेनंतर पुढील काही महिने तुम्ही घरगुती आहार घ्यावा.

भारतीय घरगुती आहाराची पद्धत उत्तम आहे. त्याला काही अपवाद आहेत. शस्त्रक्रिया झाल्या झाल्या रुग्णांनी आहारात आमूलाग्र बदल करावा, असे डॉक्टर सुचवत नाहीत. कारण ते पदार्थ बेचव असल्यामुळे रुग्ण तो आहार घेणे टाळतात. शस्त्रक्रियेच्या वेळी दिलेले छेद भरून काढण्यासाठी तुम्हाला विशिष्ट आहार घ्यावा लागतो. काही पदार्थ टाळणे अत्यावश्यक असते. पण काही गैरसमज तुमची चिंता वाढवू शकतात. 

गैरसमज : काही सुपर फूडस् खाल्ल्यामुळे तुमचे हृदयविकार लांब राहतात.

तथ्य : सुपर फूड नावाचा काहीही प्रकार नसतो. ब्ल्यूबेरी, डाळींबे, अक्रोड, मासे हे पोषक पदार्थ आहेत. परंतु त्यामुळे हृदयविकार होण्याला प्रतिबंध होत नाही. पण, काही पदार्थ तुम्हाला निश्चित मदत करू शकतात. अभ्यासानुसार तृणधान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, फळे आणि ऑलिव्ह तेल, आठवड्यातून एकदा मासे आणि चिकन यामुळे हृदयविकारांचा धोका कमी झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आठवडाभर बहुधा शाकाहारी पदार्थ खातात आणि आठवड्यातून एकदा मांसाहारी पदार्थ खातात. तुम्ही रेड मीट म्हणजेच मटण टाळावे. कारण त्यात कोलेस्टरॉलचे प्रमाण जास्त असते.

गैरसमज : चरबी किंवा मेद तुमच्यासाठी चांगले नाही.

तथ्य : आपल्या शरीराला दररोज एका विशिष्ट प्रमाणात कोलेस्टरॉल आवश्यक असते. कारण आपल्या शरीरातील बहुतेक हार्मोन्स म्हणजेच संप्रेरके कोलेस्टरॉलपासून तयार झालेली असतात. आपल्या मेंदूला आणि काही स्नायूंना कोलेस्टरॉलची इंधन म्हणून आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला कोलेस्टरॉल म्हणजेच मेद आवश्यक असते. पण त्याचे प्रमाण महत्त्वाचे असते. तुम्ही फास्ट फूड, बेक केलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. एवढेच नव्हे तर शीतपेये इत्यादी अतिसाखर असलेले पदार्थही टाळले पाहिजेत. त्यांचा हृदयावर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. लाल मांसापासून (मटण) तयार करण्यात आलेले सॅच्युरेटेड फॅटस् आणि बटर या घटकांमुळेही व्यक्तीच्या एलडीएल पातळीमध्ये वाढ होते. सॅच्युरेटेड फॅटस्ऐवजी मोनोसॅच्युरेटेड फॅटस् आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटस्मुळे तुमची एलडीएल पातळी कमी होऊ शकते. याचा अर्थ, तुम्ही प्रक्रिया न केलेले आणि नैसर्गिक अन्न सेवन केल्यास तुमच्या शरीरातील कोलेस्टरॉलची पातळी वाढणार नाही. आपल्याला आवश्यक असलेल्या ऊर्जेच्या 10 टक्के मेद सेवन करावे. म्हणजे साधारण 30-35 ग्रॅम/दिन एवढे मेद सेवन करावे.

गैरसमज : मीठ नैसर्गिक असल्यामुळे ते धोकादायक नसते.

तथ्य : अतिरिक्त मीठ हे मद आणि साखरेपेक्षाही अधिक धोकादायक असते. अतिरिक्त मिठामुळे रक्तदाब वाढतोच; पण त्याचबरोबर मूत्रपिंडांवरील ताणही वाढतो. आपण सेवन करत असलेल्या बहुतेक अन्नपदार्थांमध्ये मीठ नैसर्गिकरीत्या समाविष्ट असते. त्यामुळे आपण मीठ घालण्याची आवश्यकता नसते. पण प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण नैसर्गिक पातळीहून खूप जास्त असते. अतिप्रमाणात मीठ खाल्ल्यास तुमच्या शरीरातील पाणी वाढून रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयावर, रक्तवाहिन्यांवर मूत्रपिंडांवर आणि मेंदूवर ताण येऊ सकतो. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. त्यामुळे मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे आणि मीठ कमी असलेले खाद्यपदार्थ खावेत. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात दर दिवशी किती मीठ गेले पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करा. कारण अतिमीठ हे पूर्णपणे वर्ज्य आहे.

सकस आहार, पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम या तीन घटकांची ओपन हार्ट सर्जरीनंतर आवश्यकता असते. तेलकट, तळलेले पदार्थ टाळावेत. आहार मर्यादित असावा. आहाराचा दर्जाही तितकाच महत्त्वाचा असतो. डाएट फॅडच्या फंदात पडू नका. आपल्या भारतीय आहारपद्धती समाधानकारक आहेत. प्रकृती सामान्य होईपर्यंत शक्यतो घरगुती पदार्थ खावेत. मेद आणि मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. मद्यसेवन कमी करावे आणि धूम्रपान वर्ज्य करावे. तुमचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि हृदय निरोगी राहण्यासाठी सकस आहाराची सवय अंगी बाणवून घ्या.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news