

डॉ. श्रुतिका कांकरिया
दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक मधुमेह दिन’ म्हणून पाळला जातो. सध्याच्या अंदाजानुसार भारतात 100 दशलक्ष (10 कोटींहून अधिक) लोकांना मधुमेह आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक कुटुंबात एखादा तरी मधुमेही सदस्य आहे. मधुमेह फक्त रक्तातील साखरेपुरता मर्यादित नसतो. तो शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करतो. विशेषतः डोळ्यांवर त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होतो.
उपलब्ध अभ्यासानुसार प्रत्येक 5 मधुमेही व्यक्तींपैकी एकाला (सुमारे 20 %) डायबेटिक रेटिनोपॅथी होते. यामध्ये डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर (रेटिना) सूज, रक्तस्राव किंवा गाठी निर्माण होतात. यातील सर्वांत धोक्याची बाब म्हणजे जोपर्यंत द़ृष्टी कमी होत नाही तोवर अनेकांना याची जाणीवही होत नाही. काही रुग्णांमध्ये मॅक्युलामध्ये सूज (डायबेटिक मॅक्युलर एडिमा) किंवा ग्लॉकोमा (डोळ्याचा दाब वाढणे) हीही समस्या दिसून येते. हे आजार वेळेवर ओळखले गेले नाहीत, तर कायमचे द़ृष्टी नुकसान होऊ शकते. मधुमेही रुग्णांमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया वेळेत न केल्यास ती अधिक धोकादायक ठरू शकते, याचीही जाणीव नसते.
डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे नेमके काय?
अनियंत्रित मधुमेहामुळे डोळ्याच्या पडद्यातील रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात. त्यातून द्रव्य पाझरून रेटिनावर सूज येते, तर कधी रेटिनाचा रक्तपुरवठा कमी होतो. पर्यायाने रेटिनाच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि प्रथिने पोहोचू शकत नाहीत. रेटिनाचा रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आपोआप नवीन केशवाहिन्या तयार होतात; पण त्या नाजूक असल्याने सहज फुटू शकतात. असे झाल्यास रेटिना जागेवरून हलणे, डोळ्यात रक्तस्राव होणे, अशा गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. यालाच डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात.
मधुमेही रेटिनोपॅथीची लक्षणे काय आहेत?
धूसर द़ृष्टी / रात्री द़ृष्टी मंदावणे, अचानक आपल्या द़ृष्टीच्या फेर्यात विविध काळे स्पॉटस् तरंगणे (फ्लोटर्स), एकदम अंधत्व येणे.
डायबेटिक रेटिनोपॅथीवरील उपचार कोणते?
डायबेटिक रेटिनोपॅथीवरीलवरील उपचार हा व्याधीची तीव्रता आणि व्याप्ती यावरून ठरतो. प्रारंभिक टप्प्यात रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब यावर नियंत्रण ठेवले, तरी ही व्याधी कमी होते.
डायबेटिक मॅक्युलर एडिमा (नेत्रपटलाची सूज) असेल, तर डोळ्यात अँटिव्हीईजीएफ विशिष्ट इंजेक्शन देऊन सूज कमी केली जाते. इंजेक्शनमुळे रुग्णाला वेदना होत नाहीत आणि उपचारांनंतर अर्ध्या ते एका तासात घरी जाता येते. हे इंजेक्शन पूर्णपणे सुरक्षित असते. इंजेक्शननंतर दर 1 ते 2 महिन्यांनी ओसीटी (जउढ) मशिनद्वारे तपासणी करून नेत्रपटलाच्या सुजेची चढ-उतार पाहिली जाते. सुजेचे प्रमाण अधिक असल्यास किंवा केशवाहिन्यांचे जाळे तयार झाल्यास परत परत इंजेक्शन देण्याची गरज पडू शकते.
रेटिनावर हिरव्या लेसर किरणांद्वारे उपचार केले जातात, ज्याला पीआरपी (पॅनरेटिनल फोटोकॉग्युलेशन लेसर)असे म्हणतात. हे लेसर 3 सत्रांमध्ये केले जाते. अधिक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून द़ृष्टी वाचविण्याचा प्रयत्न केला जातो; पण त्यापूर्वीच सावध होऊन उपचार करावेत.
मधुमेही रुग्णांमध्ये मोतिबिंदू झाल्यास त्याची काळजी कशी घ्यावी?
मधुमेहींमध्ये होणारा मोतिबिंदू अधिक टणक असतो. त्यावर वेळेत उपचार न केल्यास शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. हल्ली अद्ययावत तंत्रज्ञानामुळे लहानात लहान छिद्र (2 मिमीहून कमी) घेऊन मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे जखम लवकर भरते आणि शस्त्रक्रियेनंतर होऊ शकणार्या संसर्गाची शक्यता कमी होते.
मधुमेहाच्या मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करताना डोळ्याची बाहुली मोठी न होणे, मोतिबिंदू चिकटलेला असणे, कृत्रिम लेन्स बसविण्याची जागा (आधार) कमकुवत असणे अशा समस्या उद्भवू शकतात. या गोष्टींचा विचार करून विशेष सर्जिकल हुक्स आणि जेलचा वापर करणे गरजेचे असते. रुग्णाला डायबेटिक रेटिनोपॅथी असेल, तर आधी त्यावर उपचार करून मगच मोतिबिंदू शस्त्रक्रिया करावी लागते.