

शंभरापैकी नव्याण्णव लोकांना त्रास होत नाही आणि एखाद्यालाच त्रास होतो अशा अॅलर्जीच्या रोगात रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. ज्या पदार्थांची किंवा आहारविहाराची, वातावरणाची अॅलर्जी आहे त्यांचा वात, पित्त, कफ आणि रोग लक्षणांचा काळ असा सूक्ष्म अभ्यास करावा.
वातप्रधान अॅलर्जीत म्हणजे गार वारा, रुक्षता यामुळे अंगाला खाज सुटणे, त्वचा काळी पडणे, शरीर सुकणे याकरिता चांगले तूप किंवा शतावरी सिद्ध तूप, च्यवनप्राश सकाळ-सायंकाळ घ्यावे.
पित्तप्रधान अॅलर्जीत एवढ्या-तेवढ्याने शरीरावर लाल पिटिका, फोड आणि त्वचेची आग होत असते. यावर उपाय म्हणून प्रवाळ, कामदुधा आणि चंदनावटी प्रत्येकी तीन किंवा सहा गोळ्या दोन वेळा द्याव्यात. सकाळी एक चमचा उपळसरीचूर्ण आणि रात्रौ त्रिफळाचूर्ण घ्यावे.
कफप्रधान अॅलर्जीमध्ये प्राणवह स्रोतसाचे सर्दी, दमा, खोकला हे विकार असल्यास रंजनादिवटी सहा गोळ्या, ज्वरांकुश, लक्ष्मीनारायण आणि लवंगादिवटी तीन गोळ्या दोन वेळेला घ्याव्यात. सोबत तुळशीची दहा पाने खावीत.
कफपित्त प्रधान अॅलर्जीत लघुमालिनीवसंत सहा गोळ्या, प्रवाळ आणि लघुसुतशेखर प्रत्येकी तीन गोळ्या.
सर्व प्रकारच्या अॅलर्जीत पोटात महापित्तघृत आणि बाहेरून लावण्याकरिता एलादितेल किंवा शतधौतघृत वापरावे. खूप कंड असल्यास तूप आणि मिरपूड कालवून लावावे. एकांत पित्तज अॅलर्जीत दशांगलेप किंवा चंदनगंध बाह्योपचारार्थ वापरावे.
बलवान रोगी असल्यास रक्तमोक्षण, सर्दी नस्य विधीपूर्वक करावे. वमन अणू तेल, तूप, महानारायण तेल, स्नेह, जुलाबांसाठी पित्त किंवा पित्त काढून टाकावे. मनुका, ज्येष्ठमध, गुलाबकळी काढा, बस्ती, वायूकरता करंजेल तेलाची पिचकारी.
विशेष दक्षता आणि विहार : व्याधीचे मूळ कारण शोधावे आणि ते कटाक्षाने टाळावे. आरोग्य नियम पाळावेत. आहार-औषधे, व्यायाम, मोकळ्या हवेत फिरणे, सूर्य नमस्कार, प्राणायाम, दीर्घश्वसन यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी.
पथ्य : अळणी जेवण, त्वचेची स्वच्छता, निव्वळ गारीचे दूध किंवा शेळीचे दूध चांगले, दुधीभोपळा, कारले, पडवळ, फुलका, चपाती, ज्वारीची भाकरी, मोड आलेली धान्ये.
कुपथ्य : मीठ, मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ.
रसायनचिकित्सा : पौष्टिक आहार, प्रवाळ, कामदुधा, रजन्यादिवटी, गोक्षुरादिगुग्गुळ.
योग आणि व्यायाम : मोकळ्या हवेत फिरणे, व्यायाम, नस्य, स्वेदन, दीर्घश्सन करावे. किमान व्यायाम हवा.
अन्य षष्ठी उपक्रम (पंचकर्मादि) : बस्ती, स्नेहन, शेक, रक्तमोक्षण, जळवा लावणे.
चिकित्साकाल : 1 महिना ते 6 महिने.
निसर्गोपचार : मोकळ्या हवेत (कोवळ्या उन्हात) फिरणे-चंदनगंध, आवळकाठी चूर्ण, हळद, तूप यांचा त्वचेस मसाज.
अपुनर्भवचिकित्सा : नियमितपणे त्रिफळाचूर्ण घ्यावे. अधून मधून दुर्वांचा रस घ्यावा, प्रवाळ भस्म घ्यावे.
संकीर्ण : ज्यापासून अॅलर्जी आहे असे पदार्थ वस्तू, वास, कपडे वापरु नये. उन्हात फिरू नये. कंड सुटल्यास फडक्याने चोळावे. खाजवू नये.