

डॉ. संजय गायकवाड
अटॅक हा शब्द ऐकला की, डोळ्यासमोर हृदयावर होणारा अचानक आणि गंभीर आघात येतो; पण किडनीही अशाच संकटाला सामोरे जाऊ शकते, ज्याला किडनी अटॅक म्हणतात. यात मूत्रपिंडे अचानक आपली कार्यक्षमता गमावतात आणि शरीरातील विषारी द्रव्ये तसेच पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यात अयशस्वी होतात.
क्रॉनिक किडनी डिसीजच्या उलट, किडनी अटॅक अचानक येतो. अगदी निरोगी दिसणार्यालाही तो प्रभावित करू शकतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास किडनीचे कायमचे नुकसान होऊ शकते, गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशावेळी डायलिसिस किंवा अन्य तातडीच्या उपचारांची आवश्यकता पडू शकते.
किडनी अटॅक काही तासांत किंवा दिवसांत विकसित होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये कारण दूर केल्यावर मूत्रपिंड कार्य काही दिवसांत सुधारू लागते, तर काही गंभीर प्रकरणांमध्ये दीर्घकाळ लागू शकतो. शरीरातील पाणी कमी झाल्यास मूत्रपिंडाकडे रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. यामुळे ऑक्सिजन व पोषण घटक कमी मिळून मूत्रपिंडांचे कार्य बंद पडते. सेप्सिस ही जीवनास धोका निर्माण करणारी स्थिती असून त्यात संक्रमण रक्तवाहिन्यांमध्ये वेगाने पसरते. यामुळे मूत्रपिंडाच्या ऊतकावर परिणाम होतो. अचानक किंवा दीर्घकाळ रक्तदाब कमी झाल्यास मूत्रपिंडकडे ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही.
किडनी स्टोन, मोठा प्रोस्टेट किंवा ट्यूमर यामुळेही मूत्रमार्ग बंद होऊ शकतो. हृदय किंवा यकृताचे गंभीर आजार असल्यास मूत्रपिंडकडे रक्तप्रवाह कमी होतो किंवा शरीरात अतिरिक्त द्रव्य राहते, ज्यामुळे मूत्रपिंडावर ताण येतो. वृद्ध व्यक्ती, विशेषतः 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना याबाबत जोखीम अधिक असते. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेले लोकही मूत्रपिंडाच्या नुकसानाच्या द़ृष्टीने संवेदनशील असतात.
लवकर उपचार केल्यास किडनीमध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची अद्भूत क्षमता असते. परंतु काहींची मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी असल्याने त्यांना किडनी अटॅकचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत सतत वैद्यकीय देखरेख, पुरेसे पाणी पिणे, अनावश्यक औषधे टाळणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे आवश्यक आहे. बचावात्मक उपायांमध्ये भरपूर पाणी पिणे, अनावश्यक पेनकिलर घेणे टाळणे, रक्तातील साखर आणि रक्तदाब मर्यादित ठेवणे, हे उपाय प्रभावी ठरतात.