कोंड्याची समस्या? उपाय काय? | पुढारी

Published on
Updated on

अपर्णा देवकर

केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने, रसायनयुक्त ऑईल-शाम्पूच्या अतिरेकामुळे, जंतू संक्रमणामुळे, केसांची नीट निगा न राखली गेल्याने कोंड्याची समस्या उद्भवते. वेळेवर आणि योग्य उपाय केल्यास कोंड्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते.

सर्वसामान्यत: आपल्या केसांबाबत आपण सर्वचजण फार संवेदनशील असतो. त्यांचा रंग, त्यांची जाडी, त्यांचं टेक्श्‍चर याबाबत आपण सतर्कही असतो. त्यादृष्टीने आपण आपल्या केसांची निगा ठेवतो, पण तरीदेखील केसात कोंडा होणे, केस गळणे, केस पांढरे होणे अशा काही ना काही समस्या उद्भवतात. सगळ्यात जास्त जी समस्या आढळते, ती म्हणजे केसांत कोंडा होणे. कोंडा म्हणजेच डँड्रफ. कोंडा आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. केसांत सगळ्यात जास्त कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो. थंडीमुळे केसांना कोरडेपणा येतो. हे कोंड्याचे त्याकाळात मुख्य कारण असते असे दिसते. केसांना पुरेसे पोषण न मिळाल्यामुळेदेखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट पदार्थांचे सेवन केल्याने व कमी पाणी प्यायल्यामुळेदेखील कोंडा होतो.

आपल्यातले अनेकजण केस झटपट सुंदर करण्यासाठी केमिकलयुक्त कॉस्मेटिक प्रॉडक्टचा वापर करतात. त्यांच्या परिणामांमुळेदेखील कोंडा होऊ शकतो. सामान्यत: केसांत कोंडा होण्यामागे आणखी एक कारण आढळते. आपल्या डोक्याच्या त्वचेमध्ये मृत कोशिका असतात. ज्यांना डेड स्कीन सेल्स म्हणतात. या डेड सेल्सच्या संदर्भाने विचार केला तर, कान, नाक, चेहरा, पोट, पाठ येथेदेखील ही समस्या होऊ शकते. आपल्या डोक्यात कोरडेपणा व खाज होत असेल, तर याचा अर्थ असा होतो, की आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्यप्रकारे काम करत नाही आणि एनिमा हा रोग झाल्यामुळेदेखील त्वचेत कोरडेपणा येऊन आपल्या केसांमध्ये कोंडा होतो. आपल्या केसांत कोंडा होत असेल आणि सारखी सारखी केसांत कोंड्यामुळे खाज सुटत असेल, तर ही एक गंभीर समस्या होऊ शकते. ही समस्या मुळापासून नष्ट करायची असेल तर पुढील काही उपाय आपण करून पाहू शकता.

* एलोवेराचे ताजे जेल डँड्रफच्या घरच्या उपायांसाठी एक वरदान आहे. यासाठी कोरफडीच्या पानांचा चमच्याने रस काढावा व हाताने मिक्स करून डोक्याच्या त्वचेवर या रसाने मसाज करावा. 30 मिनिटे हा रस केसांवर ठेवून मग केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. असे केल्याने केसांना पोषण तर मिळतेच, शिवाय केसांतील आर्द्रतेचा अंशदेखील नियंत्रणात राहतो.

* कोरफड व टी ट्री ऑइल एकत्र करून केसांमध्ये लावण्याने डोक्यातील कोंडा हटवण्यासाठी मदत मिळते. टी ट्री ऑईलमध्ये अ‍ॅन्टिबायोटिक गुणधर्म असतात. ते जीवाणूंचा नाश करण्यास मदत करतात. हे मिश्रण त्वचेसंदर्भातील संक्रमणास प्रतिबंधदेखील करते. कोरफड व टी ट्री ऑइल एकत्रितपणे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे. 

* दही डोक्याच्या त्वचेला मॉइश्‍चराईझ करते. 2-4 टीस्पून एलोवेराचे ताजे जेल किंवा रस आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइल (किंवा नारळ तेल) 1 कप दह्यामध्ये मिक्स करावे. हे मिश्रण केसांचे पॅक म्हणून टाळू आणि केसांवर लावावे. ते 30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्यावे, मग केस पाणी आणि शॅम्पूसह धुवावेत. ही प्रक्रिया नियमितपणे केल्यास यामुळे डँड्रफ कमी होण्यास मदत होईल.

* आपणाला आधीच माहीत असेल, की कडुनिंब आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते! कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्याच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचे त्वचा संबंधित संसर्ग टाळता येतात. डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी घरच्या उपचारांमध्ये कडुलिंबाचे तेल फार फायदेशीर ठरते ते त्यामुळेच! तीन चमचे एलोवेराचे जेल आणि 10 ते 15 थेंब कडुलिंबाचे तेल एकत्र करून यांचे मिश्रण तयार करावे. हे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे. सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे. यावेळी केस साफ करण्यासाठी कुठल्याही सौम्य शॅम्पूचा वापर करावा, बघा तुम्हाला कोंड्याच्या समस्येसंदर्भाने नक्की फरक जाणवेल. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news