औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
मिनी घाटीत उपचार सुरू असलेल्या 30 वर्षीय गर्भवती महिलेची मागच्या आठवड्यापूर्वी प्रसूती झाली. नवजात मुलीला तिच्यापासून अलिप्त ठेवण्यात आले. त्या आईने बुधवारी कोरोनावर मात केली आहे. तेव्हा आयसोलेशन वॉर्डातून आलेल्या आई आणि नवजात मुलीची नजरभेट ही उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा क्षण ठरला. गेल्या 14 दिवसांपासून त्या मुलीचा सांभाळ करणाऱ्या घाटीतील कर्मचाऱ्यांनी तिचे नाव करिना ठेवले होते. त्यामुळे बुधवारी (दि.29) कोरोनामुक्त आई आणि मुलगी करिना यांचा नजरभेट सोहळा प्रत्येकाच्या मनाला सुखद आनंद देणारा ठरला.
मनपा आयुक्त डॉ. आस्तिककुमार पांडे्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती नागरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. जाधव, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. पद्मा बकाल, डॉ. संजय वराडे, डॉ. सुनील गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती. आयसोलेशन वॉर्डातून आई बाहेर पडल्यानंतर तिची नवजात मुलगी वडिलांकडे सुपुर्द करण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिझर प्रसूती यशस्वी झाली. या महिलेला मुलगी झाली. तपासणीतून ही नवजात मुलगी कोरोनामुक्त असल्याचे निदान झाले होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीसाठी मुलीला जन्मल्यानंतर आईपासून दूर ठेवले. तेव्हापासून डॉक्टर, परिचारिका या बाळाचा सांभाळ करीत होते. नंतर या महिलेचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने या आईची आणि मुलीची भेट झाली.
वेदनादायी होता तो कालावधी…
गेल्या पंधरा दिवसांपासून मी मुलीपासून दूर असल्यामुळे वेदनादायी होते. पण डॉक्टर, परिचारिकांनी तिची काळजी घेतली. मुलीला प्रत्यक्ष पाहून खूप आनंद झाला. पुढील 14 दिवस तिला जवळ घेता येणार नाही. पण, ती नजरेसमोर राहील. एक मुलगा कोरोनामुक्त झाला. दुसराही लवकरच होईल. नागरिकांनी काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्स पाळले पाहिजे असे मनोगत त्या कोरोनामुक्त झालेल्या आईने व्यक्त केले. कोरोनाच्या संकटात नवजात मुलीने कोरोनावर मात केली. त्यामुळे तिचे नाव डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी करिना ठेवले. हे नाव कायम ठेवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांबरोबर बोलेन, असेही या महिलेने सांगितले.