डॉ. मनोज कुंभार
ज्यांना उष्णतेच्या दिवसांतही थंडी वाजते त्यांचे काय? थोडीशीही थंडी त्यांना सहन होत नाही. सर्वसामान्य तापमानालाही त्यांना दर वेळीच थंडी वाजत असते. उष्णतेच्या दिवसांतही पंखा लावणे, कूलर सुरू करणे किंवा एअर कंडिशनिंग सुरू करणे याची भीती वाटते. त्यांचे हात-पायही नेहमीच थंड पडलेले असतात. ही लक्षणे अर्थातच सर्वसामान्य नाहीत.
बाहेर 40 अंशांपर्यंत तापमान असतानाही तुमचे हात-पाय थंड पडत असतील, तर हा एक आजार आहे. याला वैद्यकीय परिभाषेत 'कोल्ड इन्टॉलरन्स' असे म्हणतात. महिलांना नेहमीच थोडी जास्तच थंडी वाजते. कारण, त्यांची शारीरिक रचना भिन्न असते; परंतु जर तुम्हाला जास्त थंडी वाटत असेल आणि दीर्घ काळ हा प्रकार सुरू असेल, तर त्वरित डॉक्टरांची भेट घ्या. यामागची कारणे आणि उपाय या दोहोंचाही विचार करू या.
1. वजन बरेच कमी असणे : फिट राहणे ही गोष्ट अत्यावश्यक असली, तरी वजन प्रमाणबद्ध असणे ही महत्त्वाची बाब आहे. वजन मोठ्या प्रमाणात कमी असेल, तर तुम्हाला जास्त प्रमाणात थंडी वाजू शकते. बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय 18.5 हून कमी असेल, तर तुमच्या संपूर्ण आरोग्यालाच हा धोका आहे, हे लक्षात घ्या. तुमचे वजन कमी आहे, याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता असल्यामुळे तुम्हाला थंडी वाजत राहते. तुम्ही खूप कमी प्रमाणात खात असाल, तर तुमच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. यासाठी तुम्ही वजन वाढवले पाहिजे. प्रथम आपल्या आहारात सुधारणा केली पाहिजे. थोड्या थोड्या वेळाने संतुलित आहार घ्या. प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण आहारात असलेच पाहिजे. कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असले पाहिजे.
2. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड : थायरॉईड ग्रंथीतून आवश्यक प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स स्रवत नसेल, तर पचनक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. भारतात दर दहा व्यक्तींमागे एका व्यक्तीला हा आजार असतो. केस लवकर गळणे, कोरडी त्वचा आणि खूप थकवा अशी याची इतर लक्षणे आहेत. नुकतीच आई बनलेली महिला किंवा साठ वर्षांहून अधिक वयाच्या महिला यांना हा आजार होण्याचा जास्त धोका असतो. यालाच वैद्यकीय भाषेत हायपोथायरॉयजिझम असे म्हणतात.
लगेच डॉक्टरांकडे जा. रक्त तपासणी करून डॉक्टरांना याविषयी समजते. त्यानुसार औषधे घेतल्यावर त्रास दूर होतो.
3. लोहाची कमतरता : शरीरात लोहाची सातत्याने कमतरता असेल, तर थंडी वाजते. शरीरातील लाल रक्तपेशींना ऑक्सीजनचा पुरवठा करण्याबरोबरच शरीराच्या विविध अवयवांंमध्ये उष्णता राखणे आणि पोषक तत्त्वांचा पुरवठा करणे ही कार्ये पार पाडण्यातही लोहाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात हुडहुडी भरते. तसेच थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन स्रवण्याच्या कार्यावरही परिणाम होऊन हायपोथायरॉयडिजम होऊ शकतो.
यावर उपाय म्हणून लोह मोठ्या प्रमाणात असलेला आहार घ्या. मांस, अंडी, हिरव्या पालेभाज्या, सागरी अन्नपदार्थ यांचे सेवन करा.
4. रक्त पुरवठ्यात कमतरता : हृदयाच्या कार्याशी याचा थेट संबंध असतो. त्यामुळे हाता-पायांना कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. तुमचे हृदय कमजोर असेल किंवा रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज म्हणजेच अडथळे असतील तर असे होऊ शकते. त्यामुळे हृदय रक्त नीट पोहोचवू शकत नाही. तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तुम्हाला रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या असतील, तर हे होऊ शकते. रेनॉईड्सच्या आजारामुळेही असे होऊ शकते. यामध्ये तापमान जरा उतरले, की लगेच हात आणि पायांच्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात.
यावर उपाय म्हणून तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करून घ्या.
5. झोप कमी असणे : झोप कमी झाली किंवा निद्रानाशाचा विकार असेल, तर संपूर्ण शरीरच सर्वसामान्य पद्धतीने काम करणे बंद करते. अशा वेळी सर्वसामान्य तापमानालासुद्धा थंडी वाजते. हे नेमके कसे घडते हे अद्याप समजलेले नाही; परंतु काही संशोधनांनुसार आपल्या मेंदूच्या तापमान नियंत्रण करणार्या भागाची कार्यक्षमता कमी होते. युरोपियन जर्नल ऑफ अॅप्लाईड फिजिऑलॉजीमध्ये याविषयी एक संशोधन प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार झोप कमी झाली की थकवा येतो आणि पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होते.
यावर उपाय म्हणून पुरेशा प्रमाणात शांत झोप घेतली पाहिजे. रोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. शिवाय मधल्या वेळात संधी मिळाली, तर वीस ते तीस मिनिटांची डुलकीही काढा.
6. डीहायड्रेशन : आपल्या शरीराचा 60 टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला असतो. तापमान नियंत्रित राखण्यात हे पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल, तर तापमानाचे नियंत्रण योग्य प्रमाणात होत नाही. शरीर बाह्य वातावरणाप्रमाणे हळूहळू थंड किंवा गरम होते; परंतु जर पाणी कमी असेल, तर पचनक्रिया बिघडून थंडी वाजू शकेल.
यावरचा उपाय म्हणजे दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्या. याशिवाय, व्यायाम करा आणि घाम येऊ शकणारे कोणतेही काम करा आणि त्यानंतर पाणी प्या.
7. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता: शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यात या व्हिटॅमिनची महत्त्वाची भूमिका असते. ते विशेषतः मांसाहारातून मिळते. शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्याचे काम हे व्हिटॅमिन करते. त्याची कमतरता असेल, तर लाल रक्तपेशी सर्व शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा करू शकत नाहीत आणि परिणामी सतत थंडी वाजत राहते.
यावर उपाय म्हणून आहारात बी 12 व्हिटॅमिनचा समावेश करा. त्यासाठी मांस, मासे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा; परंतु या आहाराचे व्यवस्थित शोषण होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका रक्त चाचणीच्या साहाय्याने ते व्हिटॅमिन बी 12 ची पातळी मोजतील.
सर्वसामान्यपणे थंडीला पळवून लावण्यासाठी खालील उपाययोजना करा.
आहारात फळे, सुका मेवा आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. पातळ पदार्थ खा आणि जंक फूड खाऊ नका. तृणांकुराचा रस प्या. योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घ्या. मलावरोध दूर ठेवा. तीळ, अश्वगंधा आणि मोहरीचे तेल यांनी मालिश करून घ्या. गरम पाण्याने अंघोळ करा. पोट आणि कंबर एकेक मिनिट आलटून पालटून थंड-गरम पाण्याने शेका. नाडी शोधन प्राणायाम, कपालभाती, सूर्य नमस्कार, वीरभद्रासन, शलभासन आणि भूजंगासन इ. आसनांचा फायदा होतो. नाकात बदामाच्या तेलाचे थेंब टाका. यालाच आयुर्वेदात नस्य असे म्हणतात. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.