Children Skin Infections | मुलांमध्ये आढळणारा त्वचासंसर्ग

Children Skin Infections |
Children Skin Infections | मुलांमध्ये आढळणारा त्वचासंसर्ग
Published on
Updated on

डॉ. मनोज शिंंगाडे

मानवी शरीराचे बाह्य वातावरणापासून रक्षण करणारे कवच म्हणजे त्वचा. लहान मुलांची त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते, ज्यामुळे त्यांना विविध संसर्गांचा सामना करावा लागतो.

बालरोग आणि त्वचारोग विभागामध्ये प्रामुख्याने आढळणार्‍या संसर्गजन्य आजारांपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे ‘इम्पेटिगो’. प्रामुख्याने दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळणारा, अत्यंत वेगाने पसरणारा हा जीवाणूजन्य (बॅक्टेरियल) संसर्ग आहे. या आजाराचे वेळेत अचूक निदान आणि योग्य उपचार पद्धतीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते.

इम्पेटिगो प्रामुख्याने ‘स्टॅफिलोकोकस ऑरियस’ आणि ‘स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स’ या दोन प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो. निरोगी त्वचेवर एखादी लहान जखम होते, कीटक चावतो, खरचटते किंवा एक्झिमासारख्या आधीच असलेल्या आजारामुळे त्वचेचा संरक्षणात्मक थर कमकुवत होतो, तेव्हा हे जीवाणू त्वचेच्या आत प्रवेश करतात. उष्ण आणि दमट हवामान, दाटीवाटीची वस्ती, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव आणि एकमेकांच्या वस्तू वापरल्याने या जीवाणूंचा प्रसार वेगाने होतो. इम्पेटिगोचे दोन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिला आणि सर्वात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे ‘नॉन-बुलस इम्पेटिगो’. या प्रकारामध्ये सुरुवातीला मुलांच्या चेहर्‍यावर, विशेषतः नाक आणि ओठांच्या अवतीभवती लाल रंगाचे लहान फोड किंवा पुरळ येते.

दुसरा प्रकार म्हणजे ‘बुलस इम्पेटिगो’. हा प्रकार प्रामुख्याने स्टॅफिलोकोकस जीवाणूने सोडलेल्या विशिष्ट टॉक्सिनमुळे होतो. यामध्ये त्वचेवर मोठे, पाण्याने भरलेले फोड तयार होतात. हे फोड सहसा शरीराच्या मध्यभागात, जांघेत किंवा काखेमध्ये येतात. इम्पेटिगोचे निदान रुग्णाच्या त्वचेवरील फोडांचे स्वरूप पाहून केले जाते. अत्यंत गंभीर किंवा वारंवार होणार्‍या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये, जीवाणूचा प्रकार आणि त्याची अँटिबायोटिक संवेदनशीलता तपासण्यासाठी जखमेतील द्रवाचा ‘स्वॅब’ घेऊन ‘कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी’ चाचणी केली जाते. या आजाराची उपचार पद्धती संसर्गाच्या तीव्रतेवर आणि व्याप्तीवर अवलंबून असते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रुग्णाची काळजी

* संसर्ग असेपर्यंत मुलांची नखे लहान आणि स्वच्छ ठेवावीत, जेणेकरून खाजवल्यामुळे आजार वाढणार नाही.

* रुग्णाचे कपडे, टॉवेल, अंथरूण आणि खेळणी घरातील इतर सदस्यांपासून वेगळी ठेवावीत आणि ती गरम पाण्यात धुवून घ्यावीत.

* योग्य औषधोपचार सुरू केल्यानंतर साधारण २४ ते ७२ तासांत संसर्ग पसरणे बंद होते. योग्य वेळी शास्त्रोक्त उपचार केल्यास इम्पेटिगो पूर्णपणे बरा होतो आणि त्वचेवर कोणतेही कायमस्वरूपी डाग किंवा व्रण राहत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news