शास्त्रीय आयुर्वेद उपचार | पुढारी

Published on
Updated on

आयुर्वेदीय अष्टविध परीक्षांनी विकाराचे निदान केल्यानंतर त्यावर उपचार करताना ते सुरू करण्यापूर्वी आयुर्वेद शास्त्रकारांनी काही महत्त्वाची तत्त्वे सांगितली आहेत. त्यामुळे एखाद्या विकारावर सहजगत्या एखादे आयुर्वेदिक औषध घेण्यापेक्षा या मार्गदर्शक तत्त्वानुसार समग्र विचार करून औषधी उपचार घेतल्या, कमी काळात कमी खर्चात आणि नेमका होतो.

एकदा रोग निश्‍चिती झाल्यानंतर शमन उपचार करायचे की पंचकर्म उपचार देखील करायचे? औषध संग्रह कोणता वापरावा? औषधे काढा, चुर्णे, भस्म, गोळी, चाटम, आसव, अरिष्ठ इत्यादीपैकी कोणत्या प्रकाराने घ्यावे? औषधांचा डोस काय द्यावा? किती दिवस एकच औषध द्यावे? औषध कशाबरोबर घ्यावे? उपचार सुरू असताना कोणता आहार घ्यावा? इत्यादींचा निर्णय करताना रुग्णासंदर्भात काही गोष्टी पुनश्‍चः विचारात घेतल्या जाणे शास्त्राप्रमाणे आवश्यक असते. आपल्यावर उपचार करणारा वैद्य यांचा विचार करतो की नाही यासाठी या गोष्टी प्रत्येकास माहिती असाव्यात.

देश विचार : रुग्ण राहतो ती जागा, तेथील हवामान, उष्णतामान, पर्जन्यमान, थंडपणा याची माहिती यामुळेच उदा. सोलापूरला राहणार्‍या व महाबळेश्‍वरला राहणार्‍या दोन दम्याच्या रुग्णांच्या उपचारात फरक पडतो.

द‍ृश्य विचार : द‍ृश्य याचा अर्थ शरीर धातू. रुग्णाच्या शरीरातील रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सात धातूंची अवस्था, धातू सारत्व, धात्वग्नीची, अवस्था या गोष्टींचा विचार उदा. रक्‍ताचे प्रमाण, ओजाचे प्रमाण इत्यादी.

बल विचार : उपचार करावयाचा त्या रुग्णाचे बल, शक्‍ती किती आहे, त्याला कोणते औषध पेलवेल अथवा  नाही, स्थूलपणा आहे का? अशक्‍तपणा आहे का? औषधांबरोबरच रसायन म्हणजे शक्‍तिवर्धक उपचार करणे गरजेचे आहे का? यासाठी हा विचार अत्यंत महत्त्वाचा असतो.

रुग्णाच्या बलाबरोबरच त्याला झालेल्या आजाराचे बल म्हणजे तीव्रता अथवा सौम्यता याचे मोजमाप केले जाते. काही रुग्ण किरकोळ आजारही मोठा करून सांगतात. तर काही रुग्ण मोठा बिघाड झालेला असतानाही सौम्य करून सांगतात. त्यामुळे वैद्याने शास्त्राभ्यासाने बुद्धिकौशल्याने व्याधीबल ठरवावे लागते.

काल विचार : औषधोपचार करताना कोणता काल ऋतू सुरू आहे? विकाराची लक्षणे कोणत्या काळात जास्त जाणवतात? सकाळ-दुपार-रात्री कोणत्या काळात तीव्रता वाढते? याबरोबरच औषधे कोणत्या वेळी घ्यावीत? जेवणापूर्वी-जेवणामध्ये-जेवणानंतर-रात्री झोपताना अनुशेपोटी इत्यादीचा निर्णय हा देखील एक कालविचारच आहे.

अनलविचार-पचनशक्‍ती विचार : रुग्णाचा अनल म्हणजे अग्‍नी म्हणजेच पचनशक्‍ती कशी आहे, तो कोणत्या प्रकारचे औषध सहज पचवू शकेल, तसेच अग्‍निविपन कोणत्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. याचबरोबर धात्वाग्निमांद्य आहे का? याचाही विचारही येथे केला जातो.

प्रकृती विचार : रुग्णाची वात-पित्त-कफ यापैकी कोणत्या प्रकारची प्रकृती आहे, विशिष्ट प्रकृतीत जास्त काळ टिकाव धरतात. उदा. वातप्रधान प्रकृतीचा, संधीवात तसेच औषध देताना ती मूळ प्रकृतीला त्रास देणार नाहीत ना? उदा उष्णप्रकृतीच्या माणसास सर्दीवरील उपचारांनी उष्णता वाढणार नाही? याची काळजी घ्यावी लागते.

वय विचार : विशिष्ट विकार विशिष्ट वयात आढळतात. तसेच विशिष्ट औषधे विशिष्ट वयातच जास्त उपयोगी पडतात. काही औषधे एखाद्या वयात द्यायवयाची नसतात. म्हणजेच औषधी प्रकार निश्‍चितीसाठी आणि औषधांचा डोस ठरविण्यासाठी वयाचा विचार महत्त्वाचा ठरतो. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती काळ ठरविण्यासाठी वयाची माहिती असावी लागते.

सत्व विचार : 'सत्व' याचा अर्थ मनाची शक्‍ती अर्थात सहनशक्‍ती मनःशक्‍ती चांगली असल्यास औषधांची मात्रा, औषधांचा डोस कमी लागतो. तसेच मनोदौर्बलता जास्त असल्यास म्हणजे रुग्ण मनाने जास्त खचलेला असल्यास मनःशक्‍ती वाढविणार्‍या औषधांची उपचारांमध्ये योजना करावी लागते.

सात्म्य विचार : सात्म्य याचा अर्थ सवयीचे असणारे किंवा चालणारे विशिष्ट आहार, विशिष्ट औषधे, रुग्णाला सात्म्य किंवा असात्म्य आहेत याची माहिती यामध्ये घेतली जाते. तसेच विविध व्यसनांची माहिती त्याचे शरीरावर झालेले दुष्परिणाम यांचा विचारही या अंतर्गत केला जातो.

आहार विचार : रुग्ण शाकाहारी की मांसाहार देखील घेतो, घेत असल्यास त्याचे प्रमाण किती? एकंदर आहार किती वेळा, किती प्रमाणात घेतो? तो नियमित असतो का? ताजा की शिळा? बाहेरच्या खाद्यपदार्थांचे प्रमाण, उपवास करण्याचे प्रमाण, नियमित आहारात येणारा पदार्थ कोणते? या गोष्टीचा सखोल विचार या अंतर्गत केला जातो. अनेकवेळा व्याधीचे कारण आहारातच असल्याने उपचार करताना पथ्यकर आहाराचा सल्‍ला देताना या विचाराचा उपयोग होतो.

अवस्था विचार : विकार झाल्यानंतर तो नवीन अवस्थेमध्ये आहे की जीर्ण स्वरूपाचा आहे? तसेच तीव्र की सौम्य हे ठरविण्यासाठी आणि उपचारांचा कालावधी, बरे कधी वाटू लागेल? काळजी किती घ्यावी लागेल या रुग्णांच्या प्रश्‍नांची उत्तरे व्याधीच्या अवस्थेवरूनच देता येत असल्याने हा विचारही महत्त्वाचा ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news