छातीत दुखतंय? | पुढारी

Published on
Updated on

छातीत दुखण्यास विविध कारणे आहेत. यामध्ये अतिश्रम, धाप, नाडीचा वेग वाढणे, श्रम, श्‍वास पांडुता असा नक्‍की इतिहास असल्यास शृंग सुवर्णमाक्षिकादिवटी प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा सकाळ-संध्याकाळ कुष्मांडपाकाबरोबर घ्याव्यात. जेवणानंतर राजकषाय किंवा अर्जुनारिष्ट, अश्‍वगंधारिष्ट चार चमचे घ्यावे. आमाशयातील सूज, आम्लपित्त यामुळे उदरवात आणि छातीत दुखणे अशी रोगाची साखळी असल्यास जेवणानंतर प्रवाळपंचामृत सहा गोळ्या आणि आम्लपित्त तीन गोळ्या घ्याव्यात. आवश्यक वाटल्यास लघुसूतशेखर रिकाम्या पोटी तीन गोळ्या घ्याव्या.

मल प्रवृत्ती साफ होत नसल्यास त्रिफळाचूर्ण एक चमचा गरम पाणी आणि तुपाबरोबर घ्यावे. अजीर्णामुळे पोट दुखल्यास उदरवात आणि छातीत दुखणे असा रोगाचा प्रवास असल्यास जेवणानंतर शंखवटी प्रवाळ पंचामृत, तीन-तीन गोळ्या, पंचकोलासव किंवा पिप्पलादिकाढा चार-चार चमचे घ्यावा. 

काही वेळेस ओवाचूर्ण, चिमूटभर हिंगाष्टक, पाचक चूर्ण, भास्करलवणचूर्ण किंवा चिमूटभर सोडा, गरम पाण्यातील लिंबू-मीठ सरबत याचाही तात्कालिक उपयोग होऊन जातो. 

क्षय, शोष, थुंकीतून रक्‍त पडणे, उर:क्षत अशा विकारांत छातीत दुखत असल्यास विकारचे स्वरूप गंभीर आहे, असे समजून अस्थिक्षयावरील उपचार अस्थिसंधानकर त्याकरिता लाक्षदिघृत दोन चमचे आणि सोबत लाक्षदि गुग्गुळ, शृंग, सुवर्णमाक्षिकादिवटी आणि प्रवाळ प्रत्येकी तीन गोळ्या, 2 वेळा घ्याव्यात. हलक्या हाताने छातीत बलदायी महानारायण तेल जिरवावे. 

विशेष दक्षता आणि विहार : छातीत दुखणे, संचारी किंवा एकाच जागी नसल्यास दुखणे ही बाब गंभीर नाही असे समजून उदरवात, गॅसेस, अजीर्ण यावरील उपचार करावे. 

पथ्य : लघू पथ्यकर, सात्त्विक आहार घ्यावा. कमी तेल, तूप, साखर असलेले पदार्थ खावेत. जेवणात दुधीभोपळा, पडवळ, दोडका, गवार, तांबडा भोपळा, चाकवत, राजगिरा या भाज्या उकडून खाव्यात. 

कुपथ्य : तेल, तूप, मांसाहार, बटाटा, अंडी, मुगाशिवाय कडधान्ये, मिठाई, कोल्ड्रिंक, कृत्रिम पेये. डालडा, साबुदाणा, गहू, बेकरीचे पदार्थ.

योग आणि व्यायाम : तारतम्याने पूर्ण विश्रांती किंवा माफक फिरणे हे व्यायाम करावेत. मात्र, चढावर फिरणे वर्ज्य करावे. मानसिक आणि शारीरिक विश्रांतीकरिता रुग्णालयात प्रवेश करावा. 

या आजारासाठीचा चिकित्साकाल दोन दिवस ते तीन महिने इतका आहे. 

संकीर्ण : छातीत दुखण्याच्या लक्षणांचा बाऊ करू नये आणि उपेक्षाही करू नये. बुटक्या, पोट मोठे असलेल्या माणसाला आणि छातीत ठराविक जागी दुखत असल्यास सतत धोका असतो. 

– वैद्य विनायक खडीवाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news