

छातीत थोडेसे जरी दुखले तरी आपल्याला हृदयविकाराचा झटका आला, या भीतीने अनेकांचा थरकाप उडतो. हृदयाचे आरोग्य व्यवस्थित नसणे, हे छाती दुखण्याचे एक कारण असले तरी एकमेव नाही.
छातीत दुखू लागल्यावर हृदयाची आवश्यक ती काळजी घ्यायलाच पाहिजे. मात्र अन्य काही कारणांमुळेही छातीत दुखू शकते. हृदयाचे आरोग्य व्यवस्थित नसल्यास छाती दुखण्याला ‘एन्झाईन’ असे म्हणतात. एन्झाईनमुळे होणार्या वेदना काही मिनिटांपर्यंत जाणवतात. त्या व्यक्तीची व्याधी किती गंभीर आहे यावर छातीत होणार्या वेदनेचे प्रमाण अवलंबून असते. हृदयविकाराचा झटका, कोरोनरी हार्ट डिसीज, हार्ट टिश्युजवर सूज येणे अशा कारणांमुळे छाती दुखू शकते. याबरोबरच नियंत्रणात नसलेला मधुमेह, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे या कारणांमुळेही छातीत वेदना जाणवू शकतात.
उच्च रक्तदाबामध्येही छातीत कळा येतात. रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब वाढल्यानंतर हृदयाला रक्त पुरवठा करणार्या वाहिन्यांचाही दाब वाढतो. त्याचा परिणाम छातीत वेदना होण्यात होतो. पोटात वायूंचे (गॅसेस) प्रमाण वाढले तर छातीतील काही भागात वेदना होतात. याला ‘गॅस्ट्रो फॅगल रिफ्लक्स डिसीज’ असे म्हणतात.
फुफ्फुसांचे कार्य व्यवस्थित होत नसल्यास त्याचा परिणाम छातीत दुखण्यात होऊ शकतो. फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होणे, फुफ्फुसांचे कार्य मंदावणे याचाही परिणाम छातीवर जाणवतो. श्वास घेण्यास होणारा त्रास आणि श्वसन विकारामुळे छातीत दुखू शकते. अनेकांना एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची भीती वाटत असते. या भीतीमुळे हृदयांच्या ठोक्यांची गती वाढते आणि छातीत दुखणे चालू होते. काही जणांना व्यायाम केल्यानंतर छातीत दुखू लागते. हे दुखणे हृदयाच्या व्याधीशी संबंधितच असेल असे नाही. काही वेळा वजन उचलण्याच्या व्यायामातील चुकाही कारणीभूत असू शकतात. कारण कोणतेही असले तरी छातीत दीर्घकाळ वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.