तपासा तुमची ऑक्सिजन पातळी | पुढारी

Published on
Updated on

सत्यजित दुर्वेकर

भारतात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेने सर्वांनाच भयभीत केले आहे. चिंतेची बाब म्हणजे या लाटेमध्ये रुग्णांना ऑक्सिजन लावावा लागण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे; परिणामी राज्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशावेळी अनेक जण आपली ऑक्सिजन पातळी योग्य आहे की नाही, याचा विचार करताना दिसत आहेत. तसेच आपली फुफ्फुसे कार्यक्षम आहेत ना, याचीही चिंता सर्वांना भेडसावत आहे. 

यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एक सोपी पद्धत सुचवली आहे. त्यानुसार, घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी करावी, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल, जेणेकरून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. 

चाचणी कोणी करावी?

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

अशी करावी चाचणी

ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसाच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. हे चालणे सपाट जमिनीवर असावे. पायर्‍यांवर चालू नये. तसेच चालताना अतिवेगाने किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. 

सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोनवेळा अशीच चाचणी करावी, जेणेकरून काही बदल होतो का, ते लक्षात येईल.

चाचणीचा निष्कर्ष

जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करू नये. 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती 6 मिनिटांऐवजी 3 मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news