कोरोना काळातील मुलांची काळजी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. पल्लवी आणुजे

जगभरात दोन, तीन कोरोनाच्या लाट येऊन गेल्या आहेत. भारत सुद्धा दुसर्‍या लाटेच्या अंतिम टप्प्यात आहे व तद्नंतर कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. पहिल्या व दुसर्‍या लाटेपेक्षा तिसर्‍या लाटेमध्ये मुले कोरोनाबाधित होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच मुलांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

मुलांमध्ये कोव्हीड संवेदन क्षमता 43 टक्के इतकीच असते. म्हणजेच प्रौढांपेक्षा कमी प्रमाणात मुलांना कोव्हीडचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यामध्ये बहुतांश मुले ही लक्षणविरहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे असलेली असतात. सौम्य, मध्यम अथवा तीव्र स्वरूपाची लक्षणे ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, घसा दुखणे, पोटदुखी, जुलाब, उल्टी, मळमळ, भूक न लागणे, चव, वास न समजणे, डोळे येणे व अंगावर पुरळ उठणे इत्यादी लक्षणे सर्वसामान्यपणे मुलांमध्ये असतात. मुलांमध्ये जरी ही लक्षणे आढळली तरीही प्रौढव्यक्तीप्रमाणे मुले गंभीर स्थितीत जाण्याची शक्यता कमी असते. तसेच लहान मुलांमध्ये मृत्यूदर देखील कमी असतो. एक वर्षाखालील बालके कोरोनाने गंभीर आजारी देखील पडू शकतात. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी चांगली नसते.

प्रौढ व्यक्तीप्रमाणेच लहान मुलेसुद्धा या आजाराचे वाहक असतात. एका लहान मुलांपासून इतर लहान मुलांना अथवा प्रौढांना कोरोनाचा प्रसार होवू शकतो. लहान मुले प्रौढांपेक्षा 60 टक्के अधिक विषाणू प्रसार करतात. म्हणूनच कुटुंबातील एखाद्या मुलांस कोरोना झाल्यास पूर्ण कुटुंब बाधित होण्याची शक्यता अधिक असते. मुलांना कोरोना झाल्यास वरील लक्षणे कमी होण्यास 1 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकतो. म्हणून किमान 14 दिवस मुलांना विलगीकरणात ठेवावे किंवा मुले लक्षणविरहीत होईपर्यंत वाट बघावी.

तसेच ज्या मुलांना काही जन्मजात आजार आहेत. उदा. मेंदुचे आजार, चयापचय क्रियेमध्ये बिघाड असणारे, जनुकीय दोष, जन्मजात हृदय रोग, स्थौल्य, मधुमेह, दमा अथवा फुफ्फुसाचे आजार, सिकल सेलचा आजार, कॅन्सर असणारी मुले तसेच रोगप्रतिकारक शक्ती दाबणारी औषधे सुरू असणारी मुले यांना कोव्हीड 19 चा गंभीर धोका संभवतो. प्रौढांप्रमाणे लहान मुलांमध्येसुद्धा कोव्हीडच्या गंभीर अवस्थेत श्वसनसंस्था बंद पडणे, हृदयाच्या स्नायुंचा संसर्ग (Myocarditis), शॉक, मुत्रपिंड निकामी होणे, रक्तामध्ये गुठळ्या होणे, एकावेळी अनेक अवयव संस्था बंद पडणे (Multi-Organ System Failure) इत्यादी जीवघेणी अवस्था संभवते.

तपासणी व निदान

(Antigen Testing and RTPCR Testing) तपासणी व निदानद्वारे मुलांमधील कोव्हीडचे निदान आपण करू शकतो. तसेच रक्त तपासणी, छातीचा एक्स रे, सी.टी.स्कॅन करावा लागतो.

प्रतिबंध

लहान मुलांना कोरोना पासून बचाव करायचा असेल तर मुलांना वैयक्तीक स्वच्छतेच्या सवयींचे काटेकोरपणे पालन करण्यास शिकवावे. दोन वर्षावरील सर्व मुलांना मास्क घालण्याची सवय करावी.वरचेवर साबणाने हात धुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करण्याचे प्रशिक्षण मुलांना द्यावे. गदीच्या ठिकाणी मुलांना पाठवू नये. Social Distancing कसे पाळावे याची माहिती मुलांना द्यावी. क्रीडांगणे, नदी, बाजारपेठा, थिएटर, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी मुलांना जाण्यास मज्जाव करावा. आजारी व्यक्तींच्या मुलांचा संपर्क टाळावा. घरी कोणीही आजारी असल्यास त्यांचा मुलांशी संपर्क येवू देवू नये. कोणतीही तक्रार झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपचार मुलांमध्ये करू नयेत. मुले गंभीर होण्याची, ऑक्सीजन स्तर खाली येवू पर्यंत घरी वाट पाहू नये.

उपचार 

प्रौढांतील व लहान मुलांमधील उपचार पद्धतीत थोडासा फरक असतो. मुलांमध्ये शरीरातील सर्व संस्थांना आधारात्मक लक्षणानुसार उपचार करावेत. गुंतागुंत होवू नये व रुग्ण गंभीर अवस्थेत जावू नये यासाठी सर्व उपचार प्रणाली अंमलात आणावी.

स्टीरॉईडस् तसेच फॅबिपिरावीर, रेमडीसिवीर यांसारख्या अ‍ॅन्टीव्हायरल औषधांचा वापर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व रुग्णाच्या गंभीर अवस्थेतच करावा. ऑक्सीजनचा सतर जर 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर रुग्णास ऑक्सीजन लावावा लागतो. अत्यवस्थ रुग्णासाठी व्हेंटीलेटरचा वापर करावा लागतो.

लसीकरण

फायझर ची लक्ष 16 वर्षावरील मुलांसाठी सुरक्षित आहे. 12 वर्षाखालील मुलांवर या लसीची चाचणी सुरू आहे. काही देशांमध्ये 12 ते 16 वर्षावरील मुलांसाठी लस उपलब्ध आहे. लवकरच सर्व मुलांसाठी सुद्धा कोव्हीड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल.

महाराष्ट्राच्या कोव्हीड व बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सने नुकताच एक सल्ला दिला आहे. कोव्हीडच्या तिसर्‍या लाटेपूर्वी मान्सून सुरू होण्यापूर्वी 06 महिने ते 05 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना फ्ल्युचे लसीकरण करावे.

कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अधिक घातक ठरण्याची शक्यता आयसीएमआरने वर्तविली आहे. म्हणून सर्व बालचमुंचे कोव्हीड 19 आजारापासून संरक्षण करण्यासाठी भारताची भावी पिढी सुरक्षित करण्यासाठी व राखण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया. परमेश्वर सर्व मुलांना या महामारीमध्ये सुरक्षित ठेवो आणि या विश्वातून कोरोनाचा नायनाट होवो.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news