Smartwatch Heart Disease Detection | स्मार्टवॉच हृदयाचे आजार ओळखू शकते?

Smartwatch Heart Disease Detection |
Smartwatch Heart Disease Detection | स्मार्टवॉच हृदयाचे आजार ओळखू शकते?
Published on: 
Updated on: 

डॉ. मनोज कुंभार

आजच्या आधुनिक काळात स्मार्टवॉचद्वारे हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण करणे आणि त्याच्या लयीतील अनियमितता शोधणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत. काही प्रगत मॉडेलमध्ये तर ‘ईसीजी’नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामुळे आरोग्याच्या समस्यांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होण्यास मदत होते. ही घड्याळे हृदयारोग्यासाठी उपयुक्त ठरत असली, तरी त्यांच्या सूचनांकडे वैद्यकीय निदानाऐवजी केवळ एका इशार्‍याच्या रूपात पाहिले पाहिजे.

स्मार्टवॉचमधील ‘फोटोप्लेथिसमोग्राफी’ तंत्रज्ञान त्वचेतील रक्तप्रवाहातील बदलांवर आधारित हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण करते. प्रकाशाधारित सेन्सर्सच्या साहाय्याने हे तंत्रज्ञान हृदयाची गती आणि लयीतील असामान्य बदल ओळखते. तसेच प्रगत घड्याळांमधील ईसीजी वैशिष्ट्य हृदयाच्या विद्युत लहरींची नोंद घेते. याद्वारे ‘अ‍ॅट्रियल फायब्रिलेशन’सारख्या हृदयविकाराचा अंदाज बांधता येतो. यामध्ये हृदयाच्या वरच्या कप्प्यांचे ठोके अनियमित होतात, कधी कधी रुग्णाला छातीत धडधडणे, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या जाणवतात, तर काही वेळा कोणतीही लक्षणे न दिसताही ही समस्या उद्‌भवू शकते.

तथापि, स्मार्टवॉचच्या मर्यादा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही घड्याळे हृदयाच्या गतीतील टोकाचे बदल किंवा लयीतील दोष दाखवू शकत असली, तरी ती सर्वच प्रकारच्या हृदयविकारांचे निदान करू शकत नाहीत. उदाहरणास्तव, स्मार्टवॉचद्वारे हृदयविकाराचा झटका, रक्तवाहिन्यांमधील अडथळे किंवा ‘हार्ट फेल्युअर’ यांसारख्या गंभीर स्थिती ओळखता येत नाहीत. त्यामुळे क्लिनिकल ईसीजी आणि वैद्यकीय तपासणीला स्मार्टवॉच कधीही पर्याय ठरू शकत नाही. तसेच स्मार्टवॉचच्या प्रत्येक अलर्टवर डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही. हाताची हालचाल, सेन्सर्सचा त्वचेशी योग्य संपर्क न होणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे चुकीचे इशारे मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे स्मार्टवॉचच्या इशार्‍याला अंतिम आजार मानण्याऐवजी, डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी मिळालेली एक सूचना मानून वेळीच योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणे हाच सुरक्षित मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news