मूतखडा आणि आयुर्वेद | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

गेल्या काही वर्षांपासून ज्या आजाराच्या उपचारामध्ये आयुर्वेदाकडे खूपच आशावादी द‍ृष्टिकोनातून पाहिले जाते, असा एक आजार म्हणजे 'मूतखडा'.  कामाची व्यग्रता, प्रवास, शरीराकडे दुर्लक्ष यामुळे पाणी कमी पिणे, हे महत्त्वाचे कारण मुतखडा तयार होण्यास मदत करते.

सामान्यपणे मुतखडा झालेल्या विविध रुग्णांकडून विचारले जाणारे प्रश्‍न म्हणजे- डॉक्टर माझा मुतखडा आयुर्वेदिक औषधांनी बरा होईल का? कोणताही मुतखडा आयुर्वेदिक औषधांनी जाऊ शकतो काय? मुतखडा नक्‍की कशामुळे होतो? मुतखड्याचे दुष्परिणाग नक्‍की काय होतात? मुतखडा होऊच नये म्हणून काय काळजी घेता येते काय? या प्रश्‍नांबरोबरच डॉक्टर मला पूर्वी मुतखडा झाला, तेव्हा ऑपरेशन केले होते, आता पुन्हा मुतखडे झालेत. मुतखडा होण्याची ही शरीर प्रवृत्ती आपण कशी मोडू शकतो, अशी विचारणा करणारे अनेकजण असतात.

काही पेशंटमध्ये खडे मोठे असूनदेखील केवळ ऑपरेशन टाळण्याच्या हेतूने कुठल्यातरी गावठी, खासगी, कोणतीही पदवी नसलेल्या वैद्यांकडून एखादे औषध सुरू ठेवलेले असते; परंतु पथ्य पाळण्याचे कोणतेही मार्गदर्शन केलेले नसल्याने आणि अपुरी औषधी योजना यामुळे खडे जात तर नाहीतच; उलट कालांतराने वाढून त्याचा किडणीवर दुष्परिणाम झालेला आढळतो. म्हणून मुतखडा या आजाराची माहिती करून घेऊ.

मुतखडा होण्याची कारणे :

अतिगोड स्निग्ध पदार्थ, पचण्यास जड, असा आहार वारंवार घेणे, जास्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळे, मांसाहार, शेगदाणे, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पालक यांसारख्या भाज्या वारंवार जास्त  प्रमाणात खाणे, वारंवार अतिप्रमाणात मद्यपान करणे इ. आहारात्मक कारणांनी मूतखडा निर्माण करण्याची परिस्थिती तयार करतात. कामचा व्यग्रता, प्रवास, शरीराकडे दुर्लक्ष यामुळे पाणी कमी पिणे, हे महत्त्वाचे  कारण मुतखडा तयार होण्यास मदत करते.

अशा प्रकारची राहणीमान व आहाराची सवय असण्याबरोबरच वेळच्या वेळी लघवीला न जाणे, मुत्राचा वेग जास्तीत जास्त राहन करणे, तो रोखला असतानाच थंड पाणी पिणे हे देखील महत्त्वाचे कारण असते. वारंवार उपवास, जागरण या गोष्टीदेखील मुतखडा होण्यास मदत करतात. पोट साफ होण्यासाठी वारंवार अतिप्रमाणात रचक घेणे. तर काहींमध्ये रोज उलटी करणे यामुळे देखील मुतखडा होण्याची शक्यता बळावते. आधुनिकशास्त्राप्रमाणे वृक्कामधील बदल, मूत्रप्रवाहातील बिघाड, मूत्रसंस्थेतील जंतूसंसर्ग आणि चयापचय क्रियेतील बिघाड यामुळे मुतखडा होतो.

मुतखड्याची लक्षणे

तीव्र पोटदुखी, अचानक पोटामध्ये व पाठीकडील बाजूस दुखू लागते. या वेदना तीव्र असतात तर काही पेशंटमध्ये बारीक स्वरूपाचे पोटामध्ये बाजूला पाठीकडे दुखत राहते. लघवीला आग होणे. लपवी साफ न होणे, लगवीची चार विपडणे, लपवीला वारंवार जावे लागणे, लघवी लाल होणे, लघवीला कळ करणे अशा तक्रारी असतात. तर काही पेशंटमध्ये कोणतीही तक्रार जाणवत नसते.  फक्‍त इतर कारणांसाठी एक्स-रे किंवा सोनोग्राफी केल्यानंतर मुतखडा असल्याचे आढळते.

मूत्रसंस्थेतील किडनी, युरेटर (मूत्रवाहिनी नलिका), युरिनरी ब्लॅडर (मुत्राशय), मूत्रमार्ग यापैकी कोणत्या ठिकाणी मुतखडा आहे, त्यानुसार वरील लक्षणांची तीव्रता कमी अधिक असते.

मुतखड्याचे दुष्परिणाम ः 

अनेक पेशंटमध्ये मुतखड्याचा त्रास होत असताना तात्पुरत्या स्वरूपात त्रास बंद होणारी पोटदुखीवरची औषधे खात राहणे अशी सवय असते; परंतु कालांतराने याचे दुष्परिणाम होतात. मूत्रमार्ग अवरुद्ध होऊन किडनीला सूज येते, किडनीची क्रियाशक्‍ती मंदावत जाऊन पूर्ण कार्य बंद होऊ शकते. रक्‍तदाब वाढत राहतो.

मुतखड्यावरील उपचार ः 

मुतखडा झाल्याचे कळल्यानंतर बहुतेक पेशंट 'आता ऑपरेशन करावे लागणार, असे वाटून  घाबरून गेलेले असतात. प्रत्यक्षात प्रत्येक खड्याला ऑपरेशनच करावे लागते असे नाही, खडा आकाराने खुपच मोठा असेल, त्यांची संख्या जास्त असेल, मूत्रमार्ग किंवा मूत्रप्रवाह पूर्णत: खंडित झालेला असेल, किडनीचे कार्य खूपच कमी झालेले असेल, अशा वेळीच फक्‍त ऑपरेशननेच मुतखडा काढून टाकावा लागतो. आयुर्वेद शास्त्रानेदेखील अशा खड्यावर शस्त्रकर्म करावे, असे सांगितले आहे; परंतु आकाराने लहान असणारे ज्याने किडनीचे कार्य बिघडलेले नाही, असे खडे मात्र आयुर्वेदिय औषधांनी निश्‍चितपणे जातात, असा आमचा अनुभव आहे.

आयुर्वेदिय औषधी उपचार ः 

मुतखडा या विकारातदेखील एखाद्या गोळ्या, एखादा काढा घेणे किंवा पारंपरिक वनस्पती उपचार घेणे, असे न करता आयुर्वेद तज्ज्ञांकडून शास्त्रीयपणे सांघिक उपचार करून घ्यावेत. पेशंटची प्रकृती, वय, खाण्याचा प्रकार इत्यादींचा सर्वांगीण विचार करून नेमकी औषधी योजना करणे गरजेचे असते. खड्याचे भेदन करणारी, मुत्रोत्पती वाढविणारी, मूत्रमार्गाचा दाह किंवा सूज कमी करणारी, मूत्रप्रवाह जोरात करणारी, अशी वेगवेगळी कामे करणारी औषधे एकाचवेळी वापरावी लागतात.  

वनस्पतीज औपचापकी गोखरू, पुनर्नवा, पाषाणभेद, शतावरी, वाळा, दर्भ, आघाडा, वरूण, चंदन, गुगुळ, शेवगा, इत्यादी आणि आघाडा, पलाश, कर्दळ, यव यांच्यापासून काढलेले क्षार तसेच शिलाजीत, दगडीवर, वंगभस्म, गोमूत्र यांसारख्या घटकांपासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे काढे  किंवा गोळ्या पेशंटची प्रकृती, वय, खड्याचा आकार व स्थान इत्यादीप्रमाणे योग्य त्या प्रमाणात वापरल्या  जातात. खडे पडून गेल्यानंतर खडा पुन्हा होऊ नये, म्हणून वरीलप्रमाणे औषधांनी सिद्ध केलेले तूप किंवा काढा काही काळ घेणे महत्त्वाचे असते.

बर्‍याच वेळा खड्याचा होणारा त्रास म्हणजेच पोटात दुखणे, लघवीला त्रास इत्यादी बंद झाल्यानंतर 'आपला मुतखडा आता बरा झाला,' असे समजून औषधे बंद केली जातात, हे सर्वस्वी चूक व धोकादायक असते, म्हणून त्रास नसला तरी औषधे चालू केल्यानंतर किमान दोन महिने त्रास असो वा नसो औषधे घेऊन परत सोनोग्राफी करावी. खडा गेल्याची खात्री झाल्यानंतरच उपचार बंद करावेत.ऑपरेशन झालेल्यांनी पुन्हा खडा होऊ नये यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांकडून 2-3 महिने उपचार घ्यावेत.

मुतखड्याचे पथ्य 

आयुर्वेद शास्त्राप्रमाणे मुतखडा झालेल्या पेशंटने मका, वरी, नाचणी ही धान्ये वाल, वाटाणे, पावटे, मटकी, उडीद ही कडधान्ये, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, तांबडा, भोपळा, पालक या भाज्या तसेच कवठ, जांभूळ, अननस ही फळे, गाजर, शाबूदाणा, तळलेले पदार्थ, चमचमीत पदार्थ, दूध, दही, मद्यपान या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तसेच अतिप्रवास, अतिश्रम, जागरण, उन्हात सतत फिरणे या गोष्टीदेखील टाळाव्यात.

भात, पोळी, भाकरी, तांदळी, माठ, मुळा, कांदा, पडवळ या भाज्या, मुगाचे वरण, कुळीथ कडधान्ये द्राक्षे, कलिंगड ही फळे, काकडी, कोहळा ही फळभाजी, खजूर, ताजे पातळ ताक, तूप हळदीचे लोणचे हे पदार्थ नियमित घ्यावेत. तसेच धने-जिर्‍याचे पाणी, कोथिंबीर, आवळा, उसाचा रस, वाळा सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत, नारळाचे पाणी, हळिवाची खीर यांचा नियमित वापर करावा.  सुरुवातीला वर्णन केलेली मुतखड्याची कारणे नेहमी टाळावीत. भरपूर पाणी प्यावे, लघवीला जाण्याचा कंटाळा करू नये. तसेच ऑपरेशनने खडा काढून टाकल्यानंतर देखील त्या पेशंटने वरील पथ्य सांभाळल्यास खडा पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news