

न्यूरोलॉजिकल विकार म्हणजेच मेंदू, मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) आणि शरीराच्या इतर नर्व्हस संरचनांशी संबंधित विकार. हे विकार लहान मुलांमध्ये विविध प्रकारे दिसून येऊ शकतात. न्यूरोलॉजिकल विकार बालकांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करतात आणि यामुळे त्यांची मानसिक, शारीरिक व वर्तणुकीची क्षमता बाधित होऊ शकते. त्यामुळे या विकारांचे वेळेवर निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
1. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ओएसडी) : ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा एक मानसिक विकार आहे जो बालकांच्या सामाजिक संवाद व वर्तनावर परिणाम करतो. ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये संवादाची कमी क्षमता, पुनरावृत्त वर्तन आणि अॅक्टिव्हिटीची कमतरता दिसू शकते. काही मुलांमध्ये भाषेसंदर्भात उणिवा दिसून येतात. आरंभिक निदान आणि योग्य उपचारांमुळे अनेक मुलांमध्ये सुधारणा होऊ शकते.
2. एडीएचडी ः अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच एडीएचडी हा विकार मुलांच्या एकाग्रतेवर व वर्तणुकीवर परिणाम करतो. मुलांना ध्यान केंद्रित करण्यास, कार्ये पूर्ण करण्यास आणि शांत बसण्यास त्रास होतो. एडीएचडी असलेल्या मुलांना शाळेत वयानुसार कामे पूर्ण करण्यात अडचणी येतात.
3. सेरेब्रल पाल्सी ः सेरेब्रल पाल्सी एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल विकार आहे, जो मेंदूला झालेल्या हानीमुळे होतो. यामुळे शरीराच्या हालचालींवर व संतुलनावर परिणाम होतो. ही स्थिती जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर काही काळात होऊ शकते. मुलांमध्ये अशक्तपणा, हालचालींचा अभाव यामुळे समस्यांमध्ये वाढ होते.
4. एपिलेप्सी ः अपस्माराचा झटका हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा डिसऑर्डर (न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर) आहे. मेंदूत अचानक होणार्या इलेक्ट्रिकल क्रियाकलापांमुळे मेंदूच्या पेशींतील संदेशवहनाच्या व्यवस्थेत तात्पुरता अडथळा निर्माण होतो आणि यामुळे अपस्मार असलेल्या व्यक्तींना पुन्हा पुन्हा फिटस् येतात. अपस्माराचे मुख्य आणि सामान्य लक्षण म्हणजे फिटस् येणे (सीझर्स). याचे सर्व रुग्ण एकसारखे नसतात. फिटस् येण्याच्या काळात व्यक्तीच्या मेंदूचे संतुलन पूर्णतः बिघडलेले असते आणि त्याच्या शरीराचे संतुलनदेखील ढासळते. याचा प्रभाव शरीराच्या कोणत्याही एका भागावर पाहायला मिळू शकतो.
5. मेंदूमधील संसर्ग : ब्रेन इन्फेक्शन्समुळे मुलांमध्ये गंभीर न्यूरोलॉजिकल समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बरेच वेळा बॅक्टेरिया किंवा व्हायरस केवळ मेंदूच्याच इन्फेक्शनसाठी कारणीभूत असतात. मेंदूची सूज, मेनिन्जाइटिस आणि एन्सेफलाइटिस यांसारखे इन्फेक्शन्स बालकांच्या मानसिक क्षमतेवर परिणाम करतात.
6. नॅरोकॉग्निटिव्ह विकार : नॅरोकॉग्निटिव्ह विकार म्हणजेच एक अशी स्थिती जिथे मुलांच्या मेंदूचे कार्य कमी होऊ लागते. या विकारांमध्ये स्मरणशक्ती, तर्कशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता यावर परिणाम होतो. यामुळे मुलांना शालेय कार्य आणि इतर सामाजिक व्यवहारांमध्ये अडचणी येतात.
मानसिक विकासात विलंब
भाषेचे आकलन किंवा संवाद क्षमतेची कमतरता
अति उत्साही किंवा हायपरअॅक्टिव्ह वर्तन
लक्ष केंद्रित करण्यात अडचण
अचानक चक्कर येणे
समन्वयाची समस्या (शारीरिक हालचालींमध्ये गडबड)
निदान आणि उपचार : न्यूरोलॉजिकल विकारांचे वेळेवर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य निदानासाठी डॉक्टर विविध चाचण्या, मेंदूच्या स्कॅनिंग, रक्त चाचण्या, वर्तमान कौशल्य तपासणी आणि इतर पद्धती वापरतात.
उपचारांमध्ये औषधोपचार, फिजिकल थेरपी, भाषाशिक्षण, कॉग्निटिव्ह थेरपी, बिहेवियर थेरपी आणि सामाजिक साहाय्य यांचा समावेश होऊ शकतो. तसेच, मुलांची जीवनशैली सुधारण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, शाळेतील साहाय्य यांची महत्त्वाची भूमिका आहे. शाळा, कुटुंब आणि डॉक्टर यांचा समन्वय व सहकार्य हे बालकांच्या न्यूरोलॉजिकल विकारांसाठी अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या ताण, अशक्तपणा आणि मानसिक समस्या लक्षात घेऊन योग्य काळजी घेणे, हे महत्त्वाचे आहे.
बालकांमध्ये न्यूरोलॉजिकल विकार निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये आनुवंशिक (जेनेटिक) कारणे, गर्भावस्थेतील समस्या, अपघात, संसर्ग, आणि पर्यावरणीय घटक यांचा समावेश होतो.
बहुतेक न्यूरोलॉजिकल विकार आनुवंशिक असू शकतात. काही विकार जडणघडणीच्या द़ृष्टीने वंशानुगत असतात.
गर्भवती महिलांना इन्फेक्शन, आहाराच्या कमतरता, औषधांचा अतिरेक, किंवा धूम्रपान व मद्यपान केल्यामुळे मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल विकार होऊ शकतात.
जन्माच्या वेळी मुलाचे मेंदू किंवा मज्जासंस्थेला इजा झाल्यामुळे न्यूरोलॉजिकल विकार निर्माण होऊ शकतात.
मेंदूला इजा झाल्याने विविध न्यूरोलॉजिकल विकार होऊ शकतात. अपघात किंवा इतर शारीरिक इजा मुलांच्या मेंदूवर परिणाम करू शकतात.
बदललेली जीवनशैली, शाळेतील मानसिक दबाव, पोषणरहित आहार, प्रदूषण यामुळे देखील न्यूरोलॉजिकल विकार होऊ शकतात.