Brain cell growth | मेंदूतील नवीन पेशींच्या वाढीसाठी...

Brain cell growth
Brain cell growth | मेंदूतील नवीन पेशींच्या वाढीसाठी...
Published on
Updated on

डॉ. गौरांगी वैद्य

मानवाच्या मेंदूत आयुष्यभरात नवीन पेशी तयार होतात, असे आता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गेल्या तीन दशकांत झालेल्या अनेक संशोधनांनुसार, योग्य व्यायाम केल्याने प्रौढ व्यक्तींमध्येही नवीन मेंदू पेशी निर्माण होतात. या प्रक्रियेला हिप्पोकॅम्पल न्यूरोजेनेसिस असे म्हणतात.

हिप्पोकॅम्पस् हा मेंदूचा तो भाग आहे जो शिकणे, स्मरणशक्ती, भावना नियंत्रित करणे आणि जागा-स्थान ओळखणे यासाठी जबाबदार असतो. या भागातच प्रामुख्याने नवीन न्युरॉन्स तयार होतात. संशोधनात दिसून आले आहे की, शारीरिक व्यायाम या प्रक्रियेला चालना देतो; पण प्रत्येक व्यायाम समान परिणाम देत नाही. त्याचा प्रकार, तीव्रता, वारंवारिता आणि मानसिक आव्हान यांचा संगम जितका संतुलित, तितका परिणाम अधिक प्रभावी ठरतो. काही शास्त्रशुद्ध व्यायाम मेंदूसाठीही नवीन पेशी निर्माण करण्यात मदत करतात.

ड्युअल टॉक वाकिंग : हा व्यायाम म्हणजे चालताना मेंदूला एकाचवेळी दुसरे मानसिक कार्य देणे. उदाहरणार्थ, चालताना उलट गणती करणे, वर्गीकरणानुसार शब्द सांगणे किंवा साधे गणित मोजणे. 2020 मधील एका संशोधनात वृद्ध व्यक्तींना फक्त चालणे, फक्त मानसिक प्रशिक्षण, दोन्ही एकत्र आणि नियंत्रण गट या चार गटांत विभागले गेले. त्यांनी शारीरिक व मानसिक दोन्ही क्रिया एकत्र केल्या तेव्हा त्यांनी इतर गटांच्या तुलनेत दुप्पट बौद्धिक सुधारणा दाखवली. शारीरिक हालचाल आणि मानसिक गुंतवणूक यांचा एकत्रित व्यायाम मेंदूतील न्युरॉन्सच्या कार्यक्षमतेला चालना देतो.

प्रतिकार प्रशिक्षण : या प्रकारात स्नायूंवर भार टाकून त्यांना मजबूत करण्याचे व्यायाम केले जातात जसे वजन उचलणे, रेसिस्टन्स बँडचा वापर करणे किंवा शरीराच्या स्वतःच्या वजनावर आधारित व्यायाम. हे व्यायाम सामान्यतः ‘सेटस्’ आणि ‘रिपिटेशन्स’मध्ये केले जातात आणि हळूहळू भार वाढवला जातो. अशा प्रशिक्षणामुळे केवळ स्नायू नव्हे, तर न्यूरोमस्क्युलर प्रणालीही मजबूत होते. संशोधनानुसार, प्रतिकार प्रशिक्षणामुळे मेंदूतील बीडीएनएफ (ब्रेन-डिराईव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर), आयजीएफ-1 आणि व्हीईजीएफ या न्यूरोप्रोटेक्टिव्ह फॅक्टर्सचे प्रमाण वाढते. मेंदूतील पेशींच्या वाढीसाठी आणि टिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.

पायांचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे स्नायू गट आहेत. त्यांना सक्रिय ठेवणे म्हणजे संपूर्ण शरीराच्या रक्तपुरवठ्यावर आणि मेंदूच्या आरोग्यावर थेट परिणाम करणे. चालणे, सायकल चालवणे, जिने चढणे, स्क्वॅटस् करणे हे सर्व पायांचे उत्कृष्ट व्यायाम आहेत. पायांच्या हालचालीमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूकडे जाणार्‍या ऑक्सिजन व पोषकतत्त्वांचा पुरवठा वाढतो. वृद्धांमध्ये तर अशा सहनशक्तिवर्धक पायांच्या व्यायामामुळे स्मरणशक्ती व बौद्धिक कार्यक्षमता वाढल्याचे अनेक अभ्यासांनी दाखवले आहे.

नियमित व्यायाम केल्याने शरीरात ब्रेन-डिराईव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर, इन्सुलिन-लाईक ग्रोथ फॅक्टर-1 आणि व्हॅस्क्युलर एंडोथीलियल ग्रोथ फॅक्टर या रसायनांचे प्रमाण वाढते. ही रसायने मेंदूतील नवीन पेशींची वाढ, विभाजन आणि टिकून राहण्याची क्षमता वाढवतात. व्यायामामुळे रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन, ग्लुकोज आणि पोषण मिळते. तसेच, व्यायाम शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून न्यूरोजेनेसिससाठी अनुकूल वातावरण निर्माण करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news