हाडांचे विकार : वेळीच घ्या उपचार 

Published on
Updated on

डॉ. राजमा नदाफ

हृदयविकार, मधुमेह यांसारख्या प्रमुख आजारांच्या खांद्याला खांदा लावून जर आजकाल कोण वाटचाल करत असतील तर ते हाडांचे आजार आहेत. दर दहा रुग्णांमागे दोन-तीन रुग्ण तरी हाडांच्या साध्यांच्या तक्रारी घेऊन येतात.

तीव्र वेदना कितीही उपचार घेतले तरी वेदना कमी होत नाहीत किंवा तात्पुरत्या कमी होतात, वेदनाशामके घेऊन जीव मेटाकुटीला आलेला, अतिप्रमाणात वेदानाशामके घेतल्याने वाढलेल्या पित्ताचा  त्रास, किडनी आणि लिव्हरवर होणारे दुष्परिणाम अशा द‍ृष्टचक्रात अडकलेले कितीतरी पेशंट असतात. 

मुळात पंचेचाळीस किंवा पन्‍नाशीनंतर आपण हाडांच्या तक्रारी या सर्वसाधारण मानतो, पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आजकाल तीस, पस्तीस, चाळीसच्या वयातच या समस्या सुरू झाल्या आहेत. कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी यांसारख्या सामान्य समस्यांपासून ते ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थायटीस, किफॉसिस, लारडॉसिससारखे थोडेसे जटिल असे हाडांचे विकार आजकाल तिशी-पस्तिशीतच गाठू पाहात आहेत. मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी सामान्यपणे सर्वत्र आढळणार्‍या समस्या आहेत.

वास्तविक आपली बदललेली जीवनशैली आणि बदललेले खाणपान याच्या मुळाशी आहेत. हालचालीचे  कसरतीचे म्हणजेच शरीरिक श्रमाचे व्यवसाय तुलनेने कमी झाले आहेत. तासन्तास कॉम्प्युटर समोर बसल्याने, डोळ्यांबरोबर मानेचंही, दुखणं चालू होतं. दिवसभर एकाच ठिकाणी खुर्चीत बसल्याने, पाठदुखी कंबरदुखी उद्भवते. वरचेवर टू व्हीलरवर प्रवास केल्याने ही मान, पाठ आणि कंबरदुखीचा त्रास वाढतो. 

कॅल्शियमची कमतरता भासल्याने मणक्यांची झीज होणे, काही वेळेस चकती सरकते, नस दबली गेल्याने हाता-पायात मुंग्या येेऊ लागतात. मानेच्या मणक्यांमुळे हातात तर कमरेच्या मणक्यांमुळे पायात मुंग्या येत असतात, बर्‍याचदा हे पेशंटच्या लक्षात येत नाही.

सांधेदुखीच्या समस्येनेही अनेकजण त्रस्त आहेत. गुडघा, खांदा, मनगट, कोपर सांध्यांमधील लुब्रीकंट फ्लुईड म्हणजे एक प्रकारचं, वंगण कमी झाल्याने सांध्यांच्या हालचाली कठीण होऊ लागतात. गुडघ्याच्या वाटीची झीज होऊन किंवा वाटीवरील मऊ आवरणाला काही इजा होऊनही तीव्र गुडघेदुखी सुरू होते. रक्‍तामधील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने छोट्या सांध्यामध्ये सूज येऊन वेदना  होऊ शकतात. मनगट आणि आणि बोटांमधील छोट्या सांध्यांचा यात प्रामुख्याने समावेश असतो. कधी-कधी टाचा आणि त्यांचा मागील भाग ही अतिशय ठणकू लागतात. दही, ताक लोणची असे आंबट पदार्थ तसेच चहाचे प्रमाणाबाहेर सेवन, अति मांसाहार यामुळे रक्‍तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या किडनीचं काम नीट चालू आहे की नाही यावरही लक्ष द्या. बरेच जण विचारतात, 'किडनीचा आणि सांधेदुखीचा काय संबंध?' तर हा असा संबंध आहे. युरिक अ‍ॅसिड लेवल किडनीद्वारे नियंत्रित केली जाते. वजन कमी करण्यासाठी उगाच अति प्र्रमाणात लिंबूपाणी सेवन करू नये.

फिफॉसिस, लारडॉसिस या एक वेगळ्याप्रकारच्या मणक्यांच्या  समस्या आहेत. मणक्याची जी सर्वसाधारण रचना किंवा ठेवण असते, ती आपल्या मूळ स्वरूपात नसते. मणक्याच्या मागील किंवा पुढील बाजूस कर्व किंवा एकप्रकारचा पोफ असतो. त्यामुळे पाठ-कमरेमध्ये अतिशय तीव्र वेदना होत असतात. वरकरणी या आजाराचे निदान लागत नाही. मात्र एक्स-रेमध्ये हे दिसून येते.

हाडांच्या  विकारात माणूस जेरीस येतो तो, पेनकिलर म्हणजेच वेदनाशामक खाऊन म्हणूनच सर्वात आधी हाडांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, अंगावर काढू नका.

व्यायाम आणि योग्य आहार 

हाडांच्या आजारांवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सक्‍ती आहे ती व्यायामाची. नियमित मी योग्य व्यायामाने आर्थोपेडिक डॉक्टर, तुमचे  फॅमिली डॉक्टर किंवा फिजिओथेरेपिस्टच्या सल्ल्याने करावा. मानेचे कंबरेचे गुडघ्याचे, टाचांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. व्यायाम नियमित, सचोटीन करावा. 

हाडांची झीज भरून काढण्यासाठी कॅल्शियमयुक्‍त आहारावर भर द्यावा. रोजच्या आहारात दूध, फळे, हिरव्या भाज्या, मासे इ. चा समावेश असावा. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडे ठिसूळ होत असतात. यावेळी सक्‍तीनं कॅल्शियम घ्यावं दोन ते सहा महिन्यापर्यंत आवश्यकतेनुसार ही औषधं घ्यावीत. फक्‍त एकदा रक्‍तातील कॅल्शियमच्या प्रमाणाची तपासणी करून द्यावी.

हाडांच्या वेदनांसाठी वेदनाशामके घेत असाल तर ती बदलून घ्या. एकाच प्रकारचे पेनकिलर दीर्घकाळ घेऊ नये. त्यातही कमी पित्तकारक औषधांना आधी प्राधान्य द्यावे. पर्यायी पॅथीतील औषधांचा उपयोग करणे ही हितावह आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा युनानी उपचारही गुणकारी आहेत, फक्‍त ते जास्त दिवस घ्यावे लागतात. त्यामुळे ते न कंटाळता घ्यावेत. 

फिजिओथेरेपी गुणकारी ठरत आहे

हाडांच्या समस्यांवर दरवेळी ऑपरेशनची गरज असते, असे नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनशैलीमध्ये थोडी फार दुरुस्ती आणि चोवीस तासांमधील केवळ एक तास जरी स्वतःसाठी काढला तरी या समस्यांवर आळा घालता येऊ शकतो. परिस्थिती हाताबाहेर जाऊन ऑपरेशनी वेळ येण्याआधी हाडांच्या तक्रारीकडे लक्ष द्या. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news