Body Pain Causes | सांधेदुखी नसतानाही अंग दुखत असल्यास...

Body Pain Causes |
Body Pain Causes | सांधेदुखी नसतानाही अंग दुखत असल्यास...
Published on: 
Updated on: 

डॉ. संजय गायकवाड

अनेकदा गुडघे, कोपर आणि पाय यांसह शरीराच्या विविध भागांमध्ये दीर्घकाळ वेदना जाणवतात. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य येऊनही या वेदना कमी होत नाहीत. असे होत असेल, तर ते ‘फायब्रोमायल्जिया’ या आजाराचे लक्षण असू शकते.

फायब्रोमायल्जिया ही मज्जासंस्थेशी आणि स्नायूंशी संबंधित एक दीर्घकालीन वेदनांची स्थिती आहे. यामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत तीव्र वेदना होतात. या आजारात केवळ अंगदुखीच नाही, तर इतरही अनेक लक्षणे दिसून येतात. यामध्ये रुग्णाला सतत अशक्तपणा आणि तीव्र थकवा जाणवतो.

पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही ताजेतवाने वाटत नाही. गाढ झोप न येणे किंवा वारंवार झोप मोडणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

याशिवाय, काम करताना एकाग्रता न होणे आणि रोजच्या गोष्टी लक्षात ठेवताना अडचण येणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.

मानसिक ताण किंवा नैराश्य यामुळे या वेदना अधिक वाढू शकतात. हा आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळतो.

फायब्रोमायल्जियाची खात्री करण्यासाठी कोणतीही एक विशिष्ट रक्ताची चाचणी उपलब्ध नाही. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी रुग्णाची पार्श्वभूमी आणि लक्षणांच्या आधारे याचे निदान करतात; परंतु इतर आजार किंवा पोषणाची कमतरता नाही ना, हे तपासण्यासाठी काही चाचण्या करण्याची शिफारस केली जाते. यामध्ये हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम, ब्लड शुगर, यूरिक अ‍ॅसिड आणि ऑटोइम्यून आजारांसाठी सीआरपी चाचण्यांचा समावेश असतो.

फायब्रोमायल्जिया पूर्णपणे बरा करण्यासाठी औषधांसोबतच जीवनशैलीत बदल करणे अत्यंत प्रभावी ठरते. आहारात कोणत्याही एकाच पदार्थावर भर देण्याऐवजी संतुलित आहाराचा स्वीकार करावा. पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

यासोबतच शरीराला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. हलके एरोबिक्स, योगासन आणि रोज चालण्याचा सराव केल्याने स्नायूंना ताकद मिळते.

व्यायामाची सुरुवात नेहमी हळूवार करावी. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करणे, कोमट पाण्याने आंघोळ करणे आणि पुरेशी विश्रांती घेणे फायदेशीर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news