

बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. यामुळे लोकांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या असणे सामान्य बनत चालले आहे. शहरी वातावरणात मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहामुळे शरीराच्या जवळपास सर्वच अवयवांवर परिणाम होतो.
भवतालचे जग पाहण्यासाठी निसर्गाकडून मिळालेले वरदान म्हणजे डोळे; पण दुर्दैवाने मधुमेहामुळे डोळ्यांवरही अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. भारतात मधुमेहजन्य द़ृष्टिदोष हे प्रतिबंधात्मक आंधळेपणाचे प्रमुख कारण बनले असून, यामुळे उत्पादकता, जीवनमान आणि आरोग्य खर्चावर परिणाम होत आहे. हाय शुगरमुळे रक्तवाहिन्यांमध्ये इजा होऊन डोळ्यांच्या रेटिना (डोळ्याच्या आंतरिक भागातील एक महत्त्वाचा भाग) आणि इतर भागांमध्ये सूज येते. यामुळे गंभीर नेत्रविकारांचा सामना करावा लागू शकतो.
डायबेटिक रेटिनोपॅथी ः मधुमेहामुळे होणार्या प्रमुख डोळ्याच्या विकारांपैकी एक म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी. ह्या विकारात रेटिनाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते, ज्यामुळे द़ृष्टीवर गंभीर प्रभाव पडतो. धूसर द़ृष्टी, लहान ठिपके दिसणे, रात्री द़ृष्टी कमी होणे, ही याची प्रारंभिक लक्षणे आहेत.
डायबेटिक कॅटरॅक्ट ः मधुमेह असलेल्या व्यक्तींना कमी वयात मोतीबिंदू होण्याचा धोका जास्त असतो. यावर शस्त्रक्रियेचा मार्ग असला तरी शरीरातील उच्च रक्तातील साखरेची पातळी जखमा बरे होण्यास उशीर करू शकते. तसेच संसर्गाची शक्यता वाढवू शकते. यामुळे मधुमेहींवर शस्त्रक्रिया करणे, हे तसे गुंतागुंतीचे असते. सामान्यतः, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या सुमारे दहा दिवस आधी रुग्णाला आयड्रॉप्स घालण्यासाठी देतात. शस्त्रक्रियेपूर्वी रिकाम्या पोटी राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. अलीकडील काळात नव्या तंत्रज्ञानामुळे आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अशा शस्त्रक्रियांमधील जोखीम कमी झाली आहे; परंतु अनेक रुग्ण शस्त्रक्रिया झाल्यानंतरची काळजी घेण्यात कुचराई करतात. वास्तविक, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्यायलाच हवीत. असे केल्याने इन्फेक्शन आणि सूज येण्याची समस्या कमी होते. तसेच शस्त्रक्रियेनंतर नियमित तपासणी आवश्यक असते.
ग्लॉकोमा ः ग्लॉकोमा किंवा काचबिंदू हा डोळ्याचा गंभीर विकार आहे. अनेकांना आपल्याला काचबिंदू आहे, हे माहितीच नसते. निदानच झाले नाही आणि त्यामुळे त्यावर काही उपचारच झाले नाही, तर यामुळे अंधत्व येऊ शकते. काचबिंदूची शक्यता दर्शविणारा एक महत्त्वाचा धोकादायक घटक म्हणजे डोळ्याच्या आतल्या पाण्याचा वाढलेला दाब. निरोगी डोळ्यात डोळ्याचे अंतर्गत पाणी किंवा द्रव डोळ्यातून बाहेर निघून जाते म्हणजेच त्याचा निचरा होतो. ही निचरा करणारी यंत्रणा तुंबली आणि आवश्यक त्या नेत्ररसाचा निचरा सर्वसाधारण गतीने झाला नाही तर डोळ्याच्या आतला दाब वाढतो. दीर्घकाम दुर्लक्ष झाल्यास द़ृष्टीसुद्धा जाऊ शकते. घरात कुणाला काचबिंदू असेल, मधुमेह, उच्च रक्तदाब हे विकार असतील, तर डोळ्यांची नियमित तपासणी करावी. वर्षातून एकदा केलेल्या चाचणीतून काचबिंदूची लक्षणे आढळून आली तर त्यावर नियंत्रण मिळविता येते.
मधुमेहामुळे डोळ्यांवरील प्रभाव मुख्यतः शर्करेच्या पातळीच्या वाढीमुळे होतो. दीर्घकाळ हाय शुगर असल्यास शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये सूज, रक्तस्राव आणि इतर इजा होऊ शकतात, ज्यामुळे डोळ्यांवरील विविध विकार तयार होतात. वय वाढल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे मधुमेहाचे परिणाम जास्त होतात. धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन मधुमेहाच्या डोळ्यांवरील परिणामांना अधिक तीव्र करते. मधुमेहामुळे डोळ्यांचा पक्षाघातही होऊ शकतो. त्यामुळे डोळे तिरळे होण्याचा धोका संभवतो. हे सगळं टाळण्यासाठी मधुमेहग्रस्त रुग्णांनी डोळ्यांची नियमित तपासणी केली पाहिजे. किमान वर्षातून एकदा तरी तपासणी करणं अत्यावश्यक आहे. ज्यांना उतारवयात मधुमेह आढळला आहे, त्यांनी तर सहा महिन्यांतून एकदा डोळ्याची तपासणी करावी. हाय शुगरवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी डाएट, व्यायाम, औषधे, आणि इन्सुलिनचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.