Blood in urine causes | लघवीतून रक्तस्राव होत असल्यास...

Blood in urine causes |
Blood in urine causes | लघवीतून रक्तस्राव होत असल्यास...
Published on
Updated on

डॉ. महेश बरामदे

शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकले जातात; परंतु जेव्हा या लघवीतून रक्ताचे अंश दिसू लागतात, तेव्हा ती धोक्याची घंटा समजावी. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘हेमेट्युरिया’ असे संबोधले जाते.

लघवीतून रक्त येणे हे संसर्गाचे किंवा मूतखड्याचे लक्षण असू शकते. काही प्रसंगी ते मूत्राशयाच्या कर्करोगाचे (ब्लॅडर कॅन्सर) प्रमुख लक्षणही असू शकते. विशेषतः जेव्हा हा रक्तस्राव कोणत्याही वेदनेशिवाय होतो, तेव्हा तो कर्करोगाचा सर्वात मोठा संकेत मानला जातो.

मूत्राशयाच्या कर्करोगाचे सर्वात फसवे वैशिष्ट्य म्हणजे यात होणारा रक्तस्राव अनेकदा वेदनाहीन असतो. रुग्णाला कोणतीही शारीरिक कळ सोसावी लागत नाही, त्यामुळे अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी होणे हा मूत्राशयातील पेशींच्या अनियंत्रित वाढीचा परिणाम असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर लघवीतून वारंवार रक्त येत असेल आणि त्यासोबत वेदना होत नसतील, तर तातडीने तपासणी करणे अनिवार्य आहे.

जोखमीचे घटक आणि कारणे

मूत्राशय हा शरीरातील लघवी साठवणारा महत्त्वाचा अवयव आहे. या कर्करोगाचा उगम प्रामुख्याने मूत्राशयाच्या आतील अस्तरापासून होतो. तंबाखूतील घातक रसायने लघवीवाटे मूत्राशयात पोहोचतात आणि तिथल्या पेशींना इजा पोहोचवतात. हे या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण मानले जाते. विशिष्ट उद्योगांमध्ये काम करणार्‍या व्यक्ती, ज्यांचा रसायनांशी सतत संबंध येतो, त्यांना याचा अधिक धोका असतो. याशिवाय वाढते वय आणि वारंवार होणारे मूत्रमार्गाचे संसर्ग (यूटीआय) यामुळेही मूत्राशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते.

लघवीला वारंवार जावे लागणे, लघवी करताना जळजळ होणे, विनाकारण वजन घटणे आणि सतत थकवा जाणवणे ही या आजाराची इतर लक्षणे आहेत. ही लक्षणे इतर आजारांशी साधर्म्य दाखवणारी असली, तरी ती दीर्घकाळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरते. या आजाराच्या निदानासाठी लघवीची चाचणी, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन आणि ‘सिस्टोस्कोपी’ यांसारख्या आधुनिक चाचण्या उपलब्ध आहेत. कर्करोग पहिल्या टप्प्यात शोधला गेल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. प्रगत अवस्थेत हा आजार इतर अवयवांपर्यंत पसरतो, ज्यामुळे उपचार गुंतागुंतीचे होतात. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news