

मुत्राशयाचा कर्करोग हा मुत्राशयाच्या अस्तरातील असामान्य पेशींच्या वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. हा प्रामुख्याने मुत्राशयाच्या आतल्या बाजूस असलेल्या ट्रान्झिशनल सेल्समध्ये सुरू होतो. भारतात आणि जगभरात मुत्राशयाच्या कर्करोगाची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. तंबाखू सेवन, प्रदूषण आणि काही औद्योगिक रसायनांच्या संपर्कामुळे या आजाराची शक्यता वाढते.
युरोथेलियल कार्सिनोमा (ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा) हा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे, जो मुत्राशयाच्या आतल्या पेशींमध्ये सुरू होतो. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा ही स्थिती दीर्घकालीन संसर्ग किंवा दीर्घकालीन मुत्राशयातील जळजळ झाल्यास उद्भवू शकते. एडेनोकार्सिनोमा हा प्रकार मुत्राशयातील ग्रंथींमधून उद्भवतो आणि तुलनेने दुर्मीळ आहे.
तंबाखू आणि धूम्रपान ः धूम्रपान करणार्या व्यक्तींमध्ये मुत्राशयाच्या कर्करोगाचा धोका 2-3 पट जास्त असतो. सिगारेटमधील हानिकारक रसायने मुत्राशयात साचतात आणि त्याचा थेट परिणाम पेशींवर होतो.
रासायनिक पदार्थांच्या संपर्कामुळे धोका ः काही औद्योगिक क्षेत्रांमध्ये (रंग, रबर, प्लास्टिक, टेक्स्टाईल, केमिकल्स) काम करणार्या व्यक्तींना मुत्राशयाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो.
जास्त प्रमाणात प्रदूषित पाणी सेवन ः अर्सेनिकयुक्त किंवा जड धातूंचे अंश असलेले पाणी सतत प्यायल्याने मुत्राशयाचे नुकसान होऊ शकते.
अनुवंशिकता आणि वंशपरंपरा ः कुटुंबात पूर्वी कोणाला मुत्राशयाचा कर्करोग झाला असेल, तर पुढील पिढ्यांमध्ये याचा धोका वाढतो. मुत्राशयाच्या संसर्गाचा दीर्घकालीन त्रासः मुत्राशयात सतत संसर्ग राहिल्यास, मुत्राशयाच्या आतल्या पेशींमध्ये बदल होऊन कर्करोगाचा धोका वाढतो.
लघवीत रक्त येणे (हेमॅट्युरिया)
वारंवार लघवीला जाण्याची गरज जाणवणे
लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे
पाठदुखी किंवा पोटदुखी
वजन झपाट्याने कमी होणे आणि थकवा जाणवणे
1. युरिन टेस्ट आणि सायटोलॉजी ः यामध्ये मुत्राच्या नमुन्यात असामान्य पेशी किंवा रक्त तपासले जाते.
2. सिस्टोस्कोपी ः लघवीच्या नलिकेद्वारे एक लहान कॅमेरा मुत्राशयात टाकून डॉक्टर निरीक्षण करतात.
3. बायोप्सी ः संशयास्पद भागातून पेशींचा नमुना घेऊन कर्करोगाची पुष्टी केली जाते.
4. सिटी स्कॅन आणि एमआरआय ः यामधून ट्यूमरची व्याप्ती आणि इतर अवयवांवर झालेला परिणाम समजतो.
ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ः कर्करोगाचा प्राथमिक टप्पा असल्यास ही शस्त्रक्रिया केली जाते.
सिस्टेक्टॉमी ः मुत्राशय पूर्ण किंवा अंशतः काढण्याची प्रक्रिया.
किमोथेरपी ः कर्करोगग्रस्त पेशींचा नाश करण्यासाठी केमिकल औषधांचा वापर केला जातो.
इम्युनोथेरपी ः रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर स्वतः कर्करोगाशी लढू शकते, यासाठी काही विशिष्ट औषधे दिली जातात.
रेडिएशन थेरपी ः शरीरावर बाहेरून रेडिएशन टाकून कर्करोगी पेशी नष्ट केल्या जातात.
धूम्रपान व तंबाखू सेवन टाळावे. शुद्ध व स्वच्छ पाणी प्यावे.
जीवनशैलीत व्यायाम व संतुलित आहार समाविष्ट करावा.
संभाव्य घातक रसायनांचा संपर्क टाळावा.