

डॉ. मनोज कुंभार
नवजात बालकाच्या त्वचेवर जन्मखुणा असतात. त्या त्वचेच्या रंगापेक्षा निराळ्याच असतात. बर्याचदा त्या लाल किंवा इतर काही प्रकारच्या असतात. जन्मानंतर काही काळाच्या अवधीत त्या नाहीशा होऊ शकतात. त्वचेला लागून असणार्या रक्तवाहिन्यांमुळे या खुणा दिसतात.
त्वचेचे पिग्मेंटेशन झाल्याने अतिरिक्त रक्तवाहिन्या निर्माण होणे हे नवजात बालकाच्या जन्मखुणांमागील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे. या खुणांमागील कारण बहुतेकदा कळून येत नाही. तसेच या खुणा होऊ नयेत यासाठी काही करता येऊ शकत नाही. जन्मखुणांच्या कारणांविषयी आपल्याला अधिक माहिती मिळत नाही हे जरी खरे असले तरीही वहनाच्या समस्यांमुळे निर्माण होणार्या जन्मखुणा या अनुवांशिक निश्चितच नसतात. तज्ज्ञांच्या मते त्वचेच्या पेशींवर परिणाम करणारे काही स्थानिक घटक याला कारणीभूत असतात.
पोर्ट वाईन स्टेन : रक्तवाहिन्यांची रुंदी ठराविक असते; मात्र या प्रक्रियेत असंतुलन झाल्याने पोर्ट वाईन स्टेन प्रकारच्या खुणा दिसतात. या असंतुलनामुळे या ठिकाणी सतत वाहणारे रक्त हे लाल किंवा जांभळ्या रंगाचे होते. पोर्ट वाईन स्टेन्स हे स्ट्रग वेबर सिंड्रोम आणि क्लिपल ट्रेनायूने सिंड्रोम यासाठी कारणीभूत असू शकते.
लाल रंगाच्या या डागांचे निदान करण्याची प्रक्रिया ते कसे दिसतात त्यावर अवलंबून असते. यावर उपचार करण्यापूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या जातात. यामध्ये बायोप्सी, सीटी स्कॅन आणि काही बाबतीत एमआरआय करण्याचा सल्ला देऊ शकतात. बहुतांश वेळा या जन्मखुणा त्रासदायक नसतात त्यामुळे त्यांच्यावर काही उपचार करण्याची गरज नसते. लाल रंगाच्या काही जन्मखुणांमुळे त्रास होऊ शकतो, पण सामान्यतः लाल जन्मखुणा या बाळांच्या वाढत्या वयाबरोबर कमी होतात किंवा निघूनही जातात. या जन्मखुणांपैकी अगदी अल्प प्रमाणातील खुणाच रक्तवाहिन्यांच्या गाठी किंवा ट्यूमरमध्ये परावर्तीत होतात. त्याला ‘हेमेन्गिओमस’ म्हटले जाते. काही खुणा बर्या होत नाहीत आणि त्या जन्मभर टिकून राहतात.
हेमेन्गिओमसमुळे आपल्या दिसण्यावर परिणाम होत असेल तर त्यावर इलाज करण्याची आवश्यकता भासते. या डागामुळे एखाद्या व्यक्तीला तणाव किंवा वेदना होत असतील तरीही त्यावर उपचार करून घ्यायला हवेत. एवढेच नाही तर हेमोन्गिओमस म्हणजेच या डागाचा आकार, स्वरूप किंवा रंग यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास त्याच्यावर उपचार करणे आवश्यक असते. हेमेन्गिओमस किंवा हा डाग जर बालकांच्या डोळ्याजवळ असेल तर त्यावर नक्कीच उपचार करून घेतले पाहिजेत. कारण काही वेळा त्याचा द़ृष्टीवर परिणाम होऊ शकतो. उपचारांमध्ये लेसर उपचारांपासून कॉस्मेटिक उपचारांपर्यंत इतरही काही उपचार पद्धती वापरता येतात. खूप क्वचितच या जन्मखुणांचा संबंध इतर कोणत्याही आजारांशी असतो.