डॉ. मनोज शिंगाडे
काही वेळा आपण एखाद्याशी खूप भांडतो आणि नंतर काही वेळातच पश्चातापाची भावना मनात निर्माण होते. रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो आणि पुढे नको त्या गोष्टी घडतात. शांत झाल्यानंतर आपल्या हातून अघटित घडल्याचे वाटू लागते. मग, हा अनुभव एकदा नाही तर अनेकदा येतो, तरीही आपले पहिले पाढे पंचावन्न राहतात. आपल्यासमवेत असे नेहमी का घडते, असा विचार मनात येतो. आपण हैराण होतो. यामागचे कारण काय?
दररोजच्या जीवनात वावरताना आपल्याला अनेक स्वभावाच्या, अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटतात. काही खुशमौजी असतात तर काही लहरी असतात. काही जण अगदीच 'मुडी' असतात. मग त्यापासून बरेच जण चार हात लांब राहतात. त्याचा स्वभाव असा का असेल किंवा तो मुडी का आहे, याच्या खोलात आपण जात नाही. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मूड हा सारखा बदलत असतो. कधी राग, कधी प्रेम, कधी रुसवा, कधी नाराजी. कधी कधी वाटते एखाद्याला खूप भांडावे, तर दुसर्याच क्षणी वाटते की, आपल्यासोबतच असे का घडते? विशेषत: महिलांच्या बाबतीत असा अनुभव नेहमी येतो. म्हणूनच एखाद्याचा मूड सारखा बदलत असेल तर त्याला 'मूड स्विंग' असे म्हणतात.
ही एक मानसिक अवस्था आहे. वास्तविक, त्याचा थेट संबंध महिलांशी आहे, तरीही अशा प्रकारच्या अधिक तणावाला पुरुषही बळी पडतात. हार्मोन संतुलित नसणे हा प्रश्न केवळ महिलांत नाही, तर पुरुषातदेखील आढळून येतो. मानसोपचारतज्ज्ञांच्या तांत्रिक भाषेचा विचार केल्यास या अवस्थेला बायपोलर डिसऑर्डर असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीचा मूड अचानक बदलणे, काही वेळा गंभीर होणे, तर दुसर्याच क्षणी हास्यविनोद करणे, कधी नाराज राहणे या गोष्टी मानसिक आजाराशी निगडीत आहेत.
'बायपोलर डिसऑर्डर'ची समस्या अनेक महिने, वर्ष राहू शकते. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास संबंधित व्यक्ती आत्महत्यादेखील करू शकते. या प्रकारच्या आजारात रुग्ण आनंद आणि दु:ख हे दोन्ही प्रकारच्या मूडमध्ये फिरत असतो. उदास राहणे, उत्साह नसणे, सक्रिय नसणे, इच्छाशक्तीचा अभाव, आत्मविश्वासाची कमतरता, चिडचिडेपणा आदी गोष्टी मूड स्विंगची लक्षणं म्हणून ओळखली जातात. शांत राहणे, एकलकोंडेपणा वाढणे, कोणात मिळून मिसळून न बोलणे ही बायपोलर डिसऑर्डरचे सुप्त लक्षणे आहेत. काही वेळा या गोष्टी सामान्यांच्या आवाक्यात राहत नाहीत. हार्मोन असंतुलनशिवाय अनुवांशिक कारणदेखील मूड स्विंगला तितकेच जबाबदार असते. दुसर्या भाषेत सांगायचे झाल्यास व्यक्तीच्या मेंदूत, विचारात एक प्रकारचे रासायनिक असंतुलन निर्माण होते आणि त्याचे परिवर्तन आजारपणात होते. मेंदू हा मानवी शरीराचा एक अभिन्न अंग आहे. तो शरिरातील सर्व अवयवांना आणि हालचालींना नियंत्रित करत असतो. मेंदूविकार झाल्यास किंवा मानसिक अवस्था ढासळल्यास संपूर्ण शरीराचा तोल जातो. शरीरातील रक्तप्रवाहावर त्याचा विपरीत परिणाम होतोे.
आधुनिक उपचारशास्त्रात या समस्येवर उपचार आहे. मात्र, मानसिक आजार असल्याने गोळ्या-औषधांबरोबरच मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य असणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांच्या मदतीने आजारी व्यक्ती लवकर बरा होण्यास हातभार लागतो. दररोज व्यायाम, संतुलित आहार, सक्रिय राहणे, चांगली आणि गाढ झोप, या गोष्टी आजारपणाच्या सुरुवातीच्या काळात उपयुक्त ठरतात. आजार पुन्हा उलटू नये यासाठी अॅलोपॅथी उपचारात रुग्ण बरा होत असताना त्याला वेळोवेळी औषधे द्यावी लागतात. होमिओपॅथी उपचारात डॉक्टर अनुभवी असेल, तर रुग्णाला उपचारानंतर नेहमीच औषधे घेण्याची गरज भासत नाही. काही बाबतीत पर्यायी उपचार पद्धत आणि अॅरोमा थेरेपीदेखील फायदेशीर ठरू शकते.
स्ट्रेस हार्मोनचे अधिक प्रमाण
महिलांचा बदलणारा मूड ही बाब पुरुषांसाठी नेहमीच गूढ राहिली आहे. महिलांमधील सतत मूड बदलणे हे काही वेळा भांडणासाठी कारण देखील ठरू शकतेे. आतापर्यंत शांत आणि गोड बोलणारी पत्नी क्षणार्धात रुद्रावतार का धारण करते, असा अनेकांना प्रश्न पडतो. अनेकदा गर्भावस्थेच्या काळातदेखील अशा प्रकारची समस्या आपणास महिलांमध्ये पाहावयास मिळते. आई होणे हे स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. अशा स्थितीत शारीरिक, सामाजिक आणि कौटुंबीक जीवनात संतुलन साधताना काही महिलांच्या मनात असुरक्षितता निर्माण होते. अशावेळी मूड स्विंगला ती बळी पडते आणि वाद होऊ शकतात. महिलांमधील हार्मोन बदलामुळे निराशा वाढण्याची शक्यता अधिक बळावते. एका सर्व्हेनुसार 20 टक्के महिलांना वास्तविक जीवनात कोणत्या ना कोणत्या क्षणी नैराश्याला सामोरे जावे लागले आहे. प्रत्यक्षात शरीरातील कोर्टोसिल नावाच्या स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक राहिल्याने मानवाच्या मूडवर त्याचा विपरीत परिणाम होतो.