Fungal Infection | धोका फंगल इन्फेक्शनचा

Fungal Infection |
Fungal Infection | धोका फंगल इन्फेक्शनचा
Published on
Updated on

डॉ. महेश बरामदे

पावसाळ्यात केवळ बाह्य स्वच्छतेअभावी बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन) होतो, हा चुकीचा समज आहे. आधुनिक वैद्यकीय संशोधनानुसार, या संसर्गाचा संबंध आपल्या शरीराच्या अंतर्गत रचनेशी, रोगप्रतिकारक यंत्रणेशी आणि बदलत्या जीवनशैलीशी खूप जवळून जोडलेला आहे.

आपल्या शरीरात कॅन्डिडा नावाची बुरशी नैसर्गिकरीत्या सूक्ष्म प्रमाणात अस्तित्वात असते. पावसाळ्यात तळलेले पदार्थ किंवा साखरेचे प्रमाण जास्त असणारे अन्नपदार्थ खाण्याकडे लोकांचा कल वाढतो. शरीरातील ही अतिरिक्त साखर आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंचे संतुलन बिघडवते. यामुळे शरीराची अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि सुप्त अवस्थेत असलेली बुरशी अचानक त्वचेवर सक्रिय होऊन तीव्र संसर्गाचे रूप धारण करते. केवळ बाह्य क्रीम लावून हा संसर्ग मुळापासून नष्ट होत नाही.

अनेक रुग्णांमध्ये औषधोपचार घेतल्यानंतर बुरशीजन्य संसर्ग तात्पुरता बरा होतो; परंतु काही दिवसांनी तो त्याच जागेवर पुन्हा उद्‌भवतो. याचे कारण बुरशीने त्वचेच्या पेशींवर तयार केलेले ‘बायोफिल्म’ हे संरक्षक कवच होय. बुरशीचे सूक्ष्म जीव एकत्र येऊन स्वतःभोवती एक पातळ, चिकट पडदा तयार करतात. हा पडदा सामान्य अँटी-फंगल क्रिम्स आणि साबणांना आत प्रवेश करू देत नाही. औषधांचा प्रभाव संपताच या कवचाच्या आत सुरक्षित राहिलेली बुरशी पुन्हा बाहेर पडते आणि संसर्ग पुन्हा सुरू होतो.

पावसाळ्यात कपडे न सुकणे ही सर्वसामान्य समस्या आहे; परंतु त्यावर आपण करत असलेला उपाय बुरशीला आमंत्रण देतो. कमी सूर्यप्रकाशामुळे अनेक घरांमध्ये कपडे घरातच पंख्याखाली किंवा बंद खोलीत सुकवले जातात. दमट खोलीत सुकणार्‍या कपड्यांवर हवेतील मायक्रोस्कोपिक फंगल स्पोअर्स स्थिरावतात. वरकरणी कपडे कोरडे वाटत असले, तरी त्यातील धाग्यांमध्ये बुरशीचे कण जिवंत राहतात. जेव्हा आपण हे कपडे घालतो, तेव्हा शरीराच्या उष्णतेमुळे आणि घामामुळे ते बिजाणू त्वचेवर वेगाने वाढू लागतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news