

भारताच्या अनेक राज्यांमध्ये डेंग्यूची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. डेंग्यूबरोबर शरीरात ताप, स्नायूंमध्ये वेदना, रॅशेस, थकवा, उलटीसारखी लक्षणे दिसतात. काहीवेळा या गंभीर आजाराने जीवालाही धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत रोगीने आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, योग्य आहार शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि रिकव्हरी जलद करतो.
डेंग्यूमध्ये आहारात पपईचा समावेश करणं खूप फायदेशीर ठरते. पपईच्या पानांच्या रसाचे सेवन केल्याने प्लेटलेटस्ची संख्या वाढते.
रुग्णाच्या आहारात दहीदेखील असावे. खिचडीसारख्या हलक्या आहारासह दही घेणे फायदेशीर असते; मात्र रात्री दही खाणे टाळावे.
अंडीही डेंग्यूमध्ये खाण्यासाठी योग्य ठरतात; पण अंड्याच्या पिवळ्या भागाचा वापर टाळावा. अंड्याच्या पिवळ्या भागात प्रोटीन जास्त असल्यामुळे पचायला त्रास होऊ शकतो. बकरीचे दूधही या रुग्णांसाठी उत्तम आहे. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच पचनासाठीही सुलभ असते. नारळाचे पाणी डेंग्यूमध्ये अत्यंत फायदेशीर मानले जाते. यात इलेक्ट्रोलाइटस् आणि आवश्यक खनिजे असतात, ज्यामुळे रक्तातील पेशींची संख्या वाढते आणि शरीर हायड्रेटेड राहते. डेंग्यूच्या काळात जितके शक्य असेल तितके नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
डेंग्यूमध्ये काही गोष्टी संपूर्ण टाळाव्यात. मसालेदार, तळलेले, जास्त तेलकट पदार्थ पचायला कठीण होतात आणि पोटात जळजळ निर्माण करतात. कॉफी, चहा आणि मद्यपान करणे टाळावे. कारण, यामुळे शरीरात द्रवांची कमतरता होते आणि रोगातून सावरणे कठीण होते. गडद रंगाचे अन्न किंवा पेय टाळणे महत्त्वाचे आहे. कारण, यामुळे मल किंवा उलट्या लालसर दिसू शकतात. परिणामी, डॉक्टरांसाठी निदान करणे कठीण होऊ शकते. शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी डेंग्यूमध्ये योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. हलके, पचायला सोपे आणि पोषक तत्त्वांनी युक्त अन्न डेंग्यूच्या रिकव्हरीसाठी महत्त्वाचे आहे. योग्य आहार, भरपूर द्रव पदार्थ आणि विश्रांती यामुळे डेंग्यूच्या काळात शरीराला लवकर बरे होण्यास मदत होते आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते.