फायदे काळ्या जिर्याचे | पुढारी
डॉ. भारत लुणावत
स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या मसाल्यात काळे जिरे वापरले जातात. त्याचे औषधी उपयोगही आहेत. त्यामुळेच त्याचे महत्त्व वाढते. काळ्या जिर्याचे औषधी गुण जाणून घेऊ या.
स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या मसाल्यांपैकी एक असते जिरे. त्या जिर्यासारखेच पण वेगळे असते ते काळे जिरे. काळे जिरे चवीला कडू असतात आणि हिवाळ्यात औषधी म्हणून लहान-मोठ्या आजारांच्या उपचारात त्याच वापर केला जातो. या जिर्याची काय वैशिष्ट्ये आहेत पाहू या.
वजन कमी करते ः वजन कमी करण्यासाठी औषध म्हणून याचा वापर करता येतो. तीन महिने काळ्या जिर्याचे नियमित सेवन केल्यास शरीरात जमा झालेली अनावश्यक चरबी कमी करण्यास मदत होते. काळे जिरे चरबी वितळवून ती मल मूत्राच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.
त्यामुळे व्यक्तीला हलकेपणा जाणवण्यास मदत होते. काळे जिरे मूत्रवर्धक असल्याने नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
प्रतिकार क्षमतेचे आजार दूर होतात ः शरीरात असलेल्या प्रतिकार क्षमतेच्या पेशींना तंदुरुस्त करून ऑटोईम्युन विकार दूर करण्यासाठी काळे जिरे मदत करते. काळे जिरे आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता वाढवून बोनमॅरो, नैसर्गिक इंटरफेरॉन आणि रोगप्रतिकारक पेशींची मदत करते. थकवा, अशक्तपणा दूर करते. शरीरात ऊर्जेचा संचार होतो आणि ती मजबूत होते.
पोटाचा त्रास दूर करण्यासाठी ः काळ्या जिर्यामध्ये अँटिमायक्रोबियल गुण असतात. त्यामुळे पोटाशी निगडित अनेक समस्यांमध्ये ते फायदेशीर ठरतात. पचनासंबंधी त्रास, गॅस्ट्रिक, पोट फुगणे, पोटदुखी, जुलाब, पोटात किडे होणे इत्यादी समस्यांमध्ये काळे जिरे गुणकारी ठरतात. जेवणात जड पदार्थ खाल्ल्यास जेवणानंतर काळ्या जिर्यांचे सेवन करावे. त्यामुळे पोटाचा जडपणा कमी होतो. बद्धकोष्ठता दूर करून पचन क्रिया उत्तम करण्यास मदत करते.
सर्दी-खोकल्यात फायदेशीर ः सर्दी, कफ, नाक बंद होणे किंवा श्वासनलिकेस त्रास होणे या सर्दी-खोकल्याशी निगडित त्रासामध्ये काळ्या जिर्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. शरीरातून कफ बाहेर पडण्यास मदत होते. कफाने नाक चोंदले असल्यास काळे जिरे इनहेलरसारखे काम करू शकते. नाक चोंदले असेल, कफ झाला असेल तर काळे जिरे भाजून रुमालात बांधून त्याचा वास घेतल्यास आराम मिळतो. अस्थमा, डांग्या खोकला, ब्राँकायटिस, अॅलर्जी यांच्यामुळे होणार्या आजारात त्याचा फायदा होतो.
जीवाणूप्रतिबंधक ः काळ्या जिर्याच्या पावडरचा लेप लावल्याने कोणत्याही प्रकारच्या जखमा, फोड, पुटकुळ्या सहजपणे बर्या होतात. जीवाणू प्रतिबंधक गुणांमुळे संसर्ग पसरण्यास अटकाव होतो. कोणत्याही समस्येमध्ये याचे सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केले पाहिजे.
सावधगिरी बाळगा ः काळे जिरे प्रकृतीने उष्ण असते. त्यामुळे दिवसभरात एक ते तीन ग्रॅमपेक्षा अधिक त्याचे सेवन बिलकुल करू नये. विशेषतः, ज्या लोकांना जास्त उकडते किंवा उच्च रक्तदाब आहे त्या व्यक्तींनी, गर्भवती स्त्रियांनी याचे सेवन करताना, पाच वर्षांच्या आतील मुलांना देताना ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात ठेवली पाहिजे. लहान मुलांनी तर 1 ग्रॅमपेक्षा जास्त काळ्या जिर्याचे सेवन करू नये. गर्भवती महिलांनीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. काळ्या जिर्याच्या चूर्णाचे सेवन करताना कोमट पाण्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी करावे. जेवणानंतर दोन तासांनी याचे सेवन करावे. त्यानंतर काहीही खाऊ नये.
डोकेदुखी किंवा दातदुखीमध्ये आराम ः काळ्या जिर्याचे तेल डोक्याला आणि कपाळाला लावल्यास मायग्रेनसारख्या वेदनांमध्येही आराम मिळतो. गरम पाण्यात काळ्या जिर्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुळणा केल्यास दाताच्या वेदनांमध्ये खूप आराम मिळतो.
