Mental Detox | झोपण्यापूर्वीचे मेंटल डिटॉक्स

Mental Detox
Mental Detox | झोपण्यापूर्वीचे मेंटल डिटॉक्स
Published on
Updated on

डॉ. हंसा योगेंद्र

आजच्या धावपळीच्या युगात आपले मन सतत नवनवीन माहिती, चिंता आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले असते. कामाचा ताण, मोबाईलचा अतिवापर, नात्यांमधील गुंतागुंत आणि भविष्याची काळजी यांमुळे मानसिक थकवा येणे स्वाभाविक आहे. ज्याप्रमाणे शरीराची स्वच्छता महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे मनाला शांत आणि शुद्ध करणे म्हणजेच ‘मेंटल डिटॉक्स’ करणे आजच्या काळाची गरज बनली आहे.

मानसिक शांततेसाठी कोणत्याही मोठ्या बदलाची गरज नसून दररोजच्या छोट्या सवयी पुरेशा आहेत. रात्री झोपण्यापूर्वी केलेले मानसिक डिटॉक्स केवळ झोपेचा दर्जा सुधारत नाही, तर दुसर्‍या दिवसासाठी मनाला सज्ज आणि संतुलित करते.

स्वतःसाठी वेळ काढा : दिवसभराच्या जबाबदार्‍यांमधून किमान पाच ते दहा मिनिटे फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. या काळात मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनपासून पूर्णपणे दूर राहा.

दीर्घ श्वसनाचा सराव : डोळे बंद करून पाच ते सातवेळा दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना आपण शांतता अनुभवत आहोत आणि श्वास सोडताना सर्व ताण बाहेर टाकत आहोत, अशी भावना मनात ठेवा.

कृतज्ञता व्यक्त करा : दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण करा. कितीही छोटी गोष्ट असली तरी त्या अनुभवाबद्दल मनापासून आभार मानण्याची सवय लावा.

चिंतेचा त्याग करा : प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते, हे वास्तव स्वीकारा. झोपण्यापूर्वी समस्यांवर विचार करण्याऐवजी त्या दुसर्‍या दिवसावर सोडून द्या आणि मनाला विश्रांती द्या.

सकारात्मक विचारांचा अवलंब : ‘मी सुरक्षित आहे, मी शांत आहे’ अशी सकारात्मक वाक्ये मनातल्या मनात उच्चारा. मन भरकटले तर पुन्हा लक्ष श्वासावर केंद्रित करा.

सातत्य राखा : मनाचे निर्विषीकरण ही केवळ एक दिवसाची प्रक्रिया नसून ती रोजची सवय बनवा. सातत्यपूर्ण सरावाने मन नैसर्गिकरीत्या शांत राहू लागते.

मानसिक डिटॉक्स का महत्त्वाचे आहे?

यामुळे ताण आणि अस्वस्थता कमी होते, झोप उत्तम लागते, भावनिक संतुलन राखले जाते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी मन शांत करायला शिकतो, तेव्हा जीवनात आपोआप संतुलन येते. दीर्घ श्वास, कृतज्ञता आणि चिंता सोडून देण्याची ही छोटीशी प्रक्रिया मानसिक आरोग्यासाठी मोठा बदल घडवून आणू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news