

उष्ण आणि तीक्ष्ण गुणांनी शरीरातील सार्वदेहिक पित्त वाढते. हे संडासच्या वाटे तसेच नाक, तोंड, कान, घसा, ओठ या मस्तकाच्या वाटे किंवा हातापायांच्या त्वचेवाटे बाहेर पड्डू पाहते. त्यामुळे संडासवाटे रक्त पडते, आग होते, चिरा पडतात. अनेकांना हा त्रास होतो.
रक्तपित्त यावर उपचार करताना रोगी बलवान असल्यास ते पित्त उलटीद्वारे शरीराच्या बाहेर काढून टाकावे. त्याकरिता ज्येष्ठमध पन्नास ग्रॅम आणि पाणी दोन लिटर असा काढा उकळावा. आटवून अर्धा लिटर उरल्यावर आकंठ पाजावा.
तेवढ्याने उलटी न झाल्यास गेळफळ बिया पंधरा ग्रॅम आणि पाणी अर्धालिटर एकत्र उकळावे, शंभर मिली उरल्यावर गाळून प्यावे. रोगी बलवान नसल्यास प्रवाळ आणि कामदुधा प्रत्येकी सहा गोळ्या, दोन वेळा बारीक करून द्याव्यात. नाकातून रक्त येणे, डोळे लाल होणे, तोंड येणे, जीभ येणे, घशात लाली या तक्रारींकरिता बहवामगज अडुळसा, बाळहिरडा, कुटकी, गुलाबकळी आणि ज्येष्ठमध प्रत्येकी दहा ग्रॅम, पाणी एक लिटर यांचा काढा करून पाव लिटर उरवावा. गाळून प्यावा. त्यामुळे जुलाब होऊन रक्तपित्त कमी होते.
जुलाबाचे औषध ज्यांना नको आहे त्यांचेकरिता प्रवाळ, कामदुधा आणि चंदनादिवटी प्रत्येकी तीन गोळ्या, दोन वेळा घ्याव्यात. रात्री त्रिफळा किंवा एरंडहरीतकी चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे; अन्यथा एरंडेल तेल मोहन म्हणून कणकेत मिसळून ती पोळी खावी.
हातापायावर पित्ताचे फोड येत असल्यास प्रथम महातिक्त किंवा वासास्वरस सिद्ध घृत खावयास देऊन सर्वांगाला स्वेद द्यावा आणि मग खळखळीत जुलाब होईल असा काढा प्यावा. रक्तपित्ताच्या कोणत्याही अवस्थेत अडुळसास्वरस हा एकमेव उत्तम उपाय आहे.
अडुळसा ताजा असायला हवा. अडुळशाची पाने वाफारुन त्यांचा रस मधाबरोबर घेणे.
विशेष दक्षता आणि विहार : रक्तपित्त विकारात नुसत्या शमन औषधाने भागतेच असे नाही. रोग मुळातून जाण्याकरिता बलवान माणसाला उलटीचे किंवा जुलाबाचे औषध द्यावयाला कां कू करु नये.
पथ्य: आवळा, द्राक्षे, मनुका, डाळिंब, अंजीर, मोसंबी, ताडफळ, नारळाचे पाणी, दूध, ताक, कोथिंबीर, धने, जिरे, दुध्या, कोहळा, पडवळ, कारले, मूग, तांदूळ भाजून भात, ज्वारी, खजूर, तूप, लोणी, ऊस, लाह्या, राजगिरा. कुपथ्य: आंबट, खारट, तिखट पदार्थ, मिरची, दही, लोणचे, पापड,
आंबवलेले पदार्थः इडली, डोसा, पाव, शिळे अन्न, दारू, चहा, तंबाखू, धूम्रपान, जागरण,
योग आणि व्यायाम : हा त्रास असणाऱ्यांनी माफक व्यायाम, लांब फिरणे, श्रम न होईल इतपत पोहणे हे नियमितपणाने केलेच पाहिजे. याखेरीज योग्य ते स्नेह आणि स्वेद करवून वमन किंवा विरेचनाचा काढा घेणे. रक्तपित्तापासून आराम मिळण्यासाठीचा चिकित्साकाल पंधरा दिवस ते दीड महिना आहे.
निसर्गोपचार: कोहळा, द्राक्षे, नारळ पाणी आणि नारळाचे दूध, कोथिंबिरीचा रस, आवळा यांचा उपाय सांगितला आहे.
संकीर्ण : पित्तप्रक्षोभ नुसतीच तिखट, क्षोभ करणारी खाणी वा व्यसनाने होत नाही. खूप पातळ पदार्थ, जागरण, कृत्रिम पेये, चिंता, उशिरा जेवण, चुकीची औषधे यांवरही लक्ष हवे. फार पातळ पदार्थ खाऊन पित्त वाढते.