Avoid Self-medication | वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे नका घेऊ!

Avoid Self-medication |
Avoid Self-medication | वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे नका घेऊ!
Published on: 
Updated on: 

डॉ. संजय गायकवाड

डोके दुखले की पेनकिलर, अंग दुखले की पेनकिलर आणि ताप आला तरी पूर्वी दिलेली गोळी घेणे, सर्दी-खोकला दोन दिवसांत कमी झाला नाही, तर कुणाच्या तरी सांगण्यावरून अँटिबायोटिक घेणे हे प्रकार सर्रास दिसून येतात, पण ही सवय मात्र शरीरासाठी महागात पडू शकते.

वेदनाशामक औषधांचा वारंवार वापर आणि गरज नसताना घेतलेली अँटिबायोटिक्स याबाबत केंद्रीय औषध नियामक यंत्रणेने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अनेक औषधांचा समावेश ‘नॉन-स्टेरॉयडल अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग्ज’ म्हणजेच एनएसएआयडी प्रकारात होतो. या औषधांचा चुकीच्या पद्धतीने किंवा दीर्घकाळ वापर केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषतः मूत्रपिंडाचा आजार असलेल्या किंवा मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असलेल्या व्यक्तींनी हे कटाक्षाने टाळावे.

सर्दी, खोकला किंवा ताप यांसारखे अनेक सामान्य संसर्ग विषाणूंमुळे होतात आणि विषाणूंवर अँटिबायोटिक्स परिणामकारक नसतात. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय अँटिबायोटिक सुरू करू नये. डॉक्टरांनी अँटिबायोटिक दिल्यास त्याचा डोस, वेळ आणि कालावधी त्यांच्या सूचनेप्रमाणेच पाळणे महत्त्वाचे आहे. काही दिवसांत बरे वाटले म्हणून औषध स्वतःहून बंद करणे किंवा मागील उपचारातील उरलेल्या गोळ्या नंतर पुन्हा वापरणेही योग्य नाही. आपल्यासाठी लिहून दिलेली अँटिबायोटिक दुसर्‍या व्यक्तीला देणे तर अधिकच चुकीचे.

अँटिबायोटिक्सचा गरज नसताना किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने जीवाणूंमध्ये त्या औषधांविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. परिणामी भविष्यात खरोखर अँटिबायोटिकची गरज पडल्यास नेहमीची औषधे अपेक्षित परिणाम देत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news