

डॉ. शैल्या गुप्ता
येणारे लहान मांसल कोंब किंवा ‘स्किन टॅग्स’ ही अनेकांसाठी चिंतेची बाब ठरते. मात्र, सोशल मीडियावरील अर्धवट माहितीच्या आधारे हे कोंब स्वतःच कापून टाकणे किंवा घरगुती उपाय करणे धोकादायक ठरू शकते.
वैद्यकीय भाषेत याला ‘अॅक्रोकोर्डन्स’ (अलअॅेलहेअॅवेपी) असे संबोधले जाते. हे त्वचेच्या पेशींपासून बनलेले अत्यंत लहान आणि निरुपद्रवी मांसल भाग असतात. सहसा मान, पापण्या किंवा काखेमध्ये जिथे त्वचेचे सतत घर्षण होते, अशा ठिकाणी हे प्रामुख्याने दिसतात. हे कोणत्याही प्रकारचे संसर्गजन्य आजार नसून कर्करोगाशीही यांचा संबंध नसतो.
त्वचेचे त्वचेशी किंवा कपड्यांशी होणारे सततचे घर्षण हे याचे मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त खालील घटकही कारणीभूत ठरू शकतात :
* गर्भावस्थेतील संप्रेरकांमध्ये होणारे बदल
* इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप-2 मधुमेह यांसारख्या चयापचय प्रक्रियांच्या समस्या.
* वाढते वजन आणि अनुवांशिकता.
जर हे टॅग्स अचानक मोठ्या प्रमाणात वाढले, त्यांचा आकार झपाट्याने मोठा झाला किंवा त्यातून रक्तस्राव वा वेदना होऊ लागल्या, तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अनेकजण हे कोंब धाग्याने बांधून किंवा कात्रीने कापून काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यामध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्या असल्याने प्रचंड रक्तस्राव, संसर्ग आणि कायमस्वरुपी व्रण राहण्याचा धोका असतो. क्लिनिकमध्ये ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’ किंवा ‘लेझर’ तंत्रज्ञानाद्वारे हे टॅग्स अत्यंत सुरक्षितपणे आणि वेदनारहित पद्धतीने काढता येतात. एकदा काढलेले टॅग्स पुन्हा तिथेच उगवत नाहीत; मात्र प्रवृत्तीनुसार शरीराच्या इतर भागांवर नवीन टॅग्स येऊ शकतात.
स्किन टॅग्स पूर्णपणे रोखणे शक्य नसले, तरी वजन नियंत्रणात ठेवणे, रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखणे आणि त्वचेवरील घर्षण कमी करणे यांमुळे नवीन कोंब येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. घाईघाईने चुकीचे उपाय करण्यापेक्षा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करणे हेच त्वचेच्या आरोग्यासाठी हिताचे ठरते.