प्रमोद ढेरे
आपले रक्त अॅसिडीक होऊ नये, सामान्य म्हणजे नॉर्मल राहावे म्हणून आपण आवर्जून करण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिला चहा बंद करायला हवा. कारण चहा टीऑक्सिडंट आहे, चहा हिरव्या पानांपासून बनवला जातो, चहाचे मळे असतात; पण चहाची पानं हिरवी आणि पावडर कोणत्या रंगाची असते? काळ्या रंगाची. चहाची पानं हिरवी आणि पावडर काळ्या रंगाची का? तर चहाची पावडर बनवताना जी रासायनिक प्रक्रिया केली जाते त्यामुळे त्यातील टीऑक्सिडंट तत्त्व बर्यापैकी नष्ट होतात. त्यात आपल्याकडे चहा बनवताना त्यात दूध टाकण्याची जी पद्धत आहे. त्यामुळे त्यातील उरलीसुरली जी टीऑक्सिडंट तत्त्व आहेत, तीही नष्ट होतात व कसलीही न्युट्रिशन व्हॅल्यू म्हणजेच पोषणमूल्य नसलेला चहा फक्त सवयीचे गुलाम म्हणून आपण पितोय आणि पाजतोय. या चहामुळे आपले रक्तही अॅसिडीक होते व पचनक्रियेची पण हानी होते. त्यामुळे रक्त अॅसिडीक होऊ नये म्हणून चहा आवर्जून बंद करणे गरजेचे आहे.
खरं तर चहा हे भारतीय पेयच नाही. इंग्रजांनी त्यांच्या देशातून चहाची रोपं आणली आणि भारतात आसाम, दार्जिलिंगसारख्या थंड हवेच्या ठिकाणी चहाचे मळे विकसित केले व भारतीयांना चहाची सवय लावली.
ज्यांचा रक्तदाब म्हणजे बीपी कमी असतो त्यांच्यासाठी चहा हे एक औषध आहे. मात्र, ज्यांचा रक्तदाब सामान्य किंवा जास्त असतो त्यांच्यासाठी चहा घातकच आहे. चहामध्ये टीऑक्सिडंटस् असली तरी कॅफीन (Caffein), टॅनिन (Tannin) व निकोटीन (Nicotin) अशी भारतीयांसाठी घातक अशी रसायनं असतात. मात्र, युरोप, अमेरिका खंडांसारख्या थंड देशातील लोकांसाठी तिथल्या वातावरणामुळे त्यांना ही रसायनं उपयुक्तच ठरतात. मात्र, आपण त्यांचं अंधानुकरण करणं योग्य नाही.
युरोप, अमेरिका खंडांसारख्या थंड देशांमध्ये सहा-सहा महिने सूर्यदर्शन होत नाही. थंड प्रदेश असल्यामुळे तेथील लोकांचा रक्तदाब कमीच असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी चहा हे एक उत्तम पेय आहे. मात्र, भारतात थंड हवेची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणीच चहाचे मळे आहेत व त्या ठिकाणच्या लोकांनीच चहा प्यायला हरकत नाही. मात्र, संपूर्ण भारतभर गरज नसताना चहा पिला जातो हे चुकीचे आहेच. त्यात दूध व साखर टाकून चहा बनवण्याची चुकीची पद्धत व चुकीच्या वेळी केले जाणारे सेवन, अतिसेवन यामुळे चहा अधिकच अपायकारक ठरत आहे. त्यामुळेच अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रयत्नपूर्वक चहाची सवय कमीकमी करत बंद करणेच उत्तम. अगदीच प्यायचा झाला तर पुढीलप्रमाणे सात गोष्टींची अवश्य काळजी घ्या.
1) चहा प्यायचा असेल तर चहाच्या पानांची पावडर म्हणजेच Tea Leaf Powder (ग्रीन टी) वापरावी. ती उत्तम. न्युट्रिशनयुक्त, हर्बल व उच्च प्रतीचा चहा पिणे केव्हाही उत्तमच.
2) चहाच्या पानांच्या पावडरपासून बनवलेल्या रेग्युलर चहामध्ये गोडव्यासाठी साखर न वापरता गूळ किंवा खडीसाखर वापरावी. कारण मुळात साखर हा एक रासायनिक पदार्थ आहे. त्यामुळे तो आपल्या शरीराला अपायकारकच.
3) गुळाच्या चहामध्ये दूध टाकू नका कारण त्यामुळे त्यातील पोषकतत्त्व बर्यापैकी नष्ट होतात. दूध नसलेल्या या चहाला काळा चहा म्हणजेच Black Tea म्हणतात. हा वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरतो.
4) चहाच्या पानांच्या पावडरपासून बनवलेल्या या काळ्या चहामध्ये लिंबू पिळल्यास उत्तम. कारण गूळ क्षारीय आहे व लिंबू आम्लयुक्त आहे. त्यामुळे काळ्या चहात लिंबू पिळल्यास तो चहा सामान्य होतो व आरोग्यदायी होतो.
5) सकाळी उठल्या-उठल्या साखरेचा चहा पिणे पूर्णपणे टाळा. कारण सकाळी उठल्या-उठल्या पोटात अॅसिडीक वातावरण असते. त्यात साखरेचा चहा पिल्यामुळे पोटातील अॅसिडीटी अजूनच वाढते. पोटातील अॅसिडीटी वाढली तर परिणामी रक्तातील अॅसिडीटी पण वाढते. मग कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड व अन्य विषारी द्रव्ये वाढायला लागतात व वारंवार असा चहा पिल्याने हृदयविकार, मधुमेह, अर्धांगवायू असे अनेक आजार जडण्याची शक्यता वाढते. शिवाय जेवणानंतर लगेच चहा पिऊ नका. जेवणानंतर चहा प्यायचाच झाला तर जेवणानंतर आर्धा ते पाऊण तासांनी प्यावा. संध्याकाळी पाचनंतर तर चहा अजिबात पिऊ नये. त्यामुळे निद्रानाश होण्याची शक्यता वाढते. स्त्रियांनी गरोदरपणात किंवा बाळंतपणात शक्यतो चहा पिऊ नये. कोणताही औषधोपचार चालू असताना, मधुमेह, हृदयविकार असताना मात्र चहा अजिबात पिऊ नये.
6) चहा कल्हई केलेल्या पितळेच्या भांड्यात बनवणे उत्तम. अॅल्युमिनियमच्या भांड्यात बनवला तर अॅल्युमिनियम गरम झाल्यावर विषारी द्रव्ये तयार होतात व ते चहात मिसळतात. तसेच अॅल्युमिनियमच्या भांड्यात वारंवार चहा उकळल्याने चहामध्ये विषारी द्रव्ये अधिकच वाढतात व असा चहा अधिकच अपायकारक ठरतो.
7) दूध-साखरेच्या चहाचे दुष्परिणाम निश्चितच होतात. त्यामुळे वारंवार चहा पिणे टाळाच. अगदीच कोणाच्या आग्रहास्तव प्यावा लागलाच तर तो पिण्यापूर्वी एक ग्लास पाणी मात्र जरूर प्या. ज्यायोगे चहाच्या दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
चहापेक्षा कॉफी चांगली?
चहापेक्षा कॉफीमध्ये टॅनीन खूपच कमी असले तरी कॅफीन मात्र तिपटीहून जास्त असते. कॅफीनमध्ये असणार्या औषधी गुणांमुळे ते बर्याच औषधांमध्ये वापरले जाते. मात्र, शेवटी त्याचे अतिसेवन घातकच. तसेच कॉफीही जर दूध-साखर टाकून चुकीच्या पद्धतीने बनवली, चुकीच्या वेळी सेवन केली, अतिप्रमाणात सेवन केली तर तीही घातकच ठरते. त्यातही कॉफीच्या बियांना रोस्ट करून बनवलेली ब्राऊन कॉफी, इन्स्टंट कॉफीपेक्षा ग्रीन कॉफी उत्तम. त्यातही बाजारात मिळणारी उच्च प्रतीची न्युट्रिशनयुक्त हर्बल कॉफी केव्हाही अतिउत्तमच.