दम्यावर मात  करता येते | पुढारी

Published on
Updated on

डॉ. अनिल मडके

मे महिन्यातील पहिला मंगळवार हा 'जागतिक दमा दिवस' म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी सात मे या दिवशी जागतिक दमा दिवस साजरा होईल. जिना (ग्लोबल इनिसिएटिव्ह फॉर अस्थमा) या जागतिक संस्थेच्या वतीने दमा याविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर संपूर्ण मे महिन्यात दम्याचे प्रबोधन करण्यासाठी जगभर वेगवेगळे कार्यक्रम जाहीर केले जातात. जेणेकरून लोकांमध्ये दमा या आजाराविषयी असलेली भीती दूर होईल आणि मनातील शंकांना समर्पक उत्तरे मिळतील.

दमा हा श्‍वासनलिकांचा विकार आहे. ज्यामध्ये काही काळासाठी श्‍वास वाहिन्या आकुंचन पावतात. या काळात रुग्णाला श्‍वास आत घेण्यास आणि बाहेर सोडण्यास त्रास होतो. या अवस्थेला 'दमा' असे म्हणतात. या अर्थाने दमा हा आजार नव्हे, तर ती अवस्था आहे. दमा कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. अगदी लहानग्या बाळापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत कुणालाही.

दम लागणे, धाप लागणे, छातीतून घरघर आवाज येणे, खोकला येणे अशा मुख्य तक्रारी दम्याच्या असतात. काही व्यक्तींना छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. श्‍वास घ्यायला खूप त्रास होतो. काही व्यक्तींना रात्रीचा किंवा पहाटेचा खोकला येतो. काही व्यक्तींना केवळ छातीत घरघर होते. जेव्हा रुग्ण लहान मूल असते तेव्हा पालक खूप चिंताग्रस्त होतात; पण दम्याची अशी लक्षणे दिसल्यानंतर घाबरून जाण्याचे बिलकूल कारण नाही. कारण, लहान मुलांमधील दमा हा आयुष्यभर राहतोच असे नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लहान मुलांमधील घरघर होण्याचे कारण नेमके दमा आहे की अन्य काही आहे, याची शहानिशा करावी आणि त्यानुसार औषधोपचार करावा.

दमा का उद्भवतो याचा विचार केला तर यामध्ये आनुवंशिकता हा महत्त्वाचा घटक आहे. दमा हा संसर्गजन्य नाही. बर्‍याच लोकांना याची भीती असते. आई आणि वडील यापैकी एका व्यक्तीला दमा असेल, तर मुलांमध्ये दमा उद्भवण्याची शक्यता असते इतकेच. मुलांना दमा होईलच असे नाही. ज्या व्यक्तींमध्ये दमा होण्याची शक्यता असते, अशा व्यक्तींमध्ये दम्याचा त्रास उद्भवण्याचे एखादे कारण निमित्त म्हणून पुढे यावे लागते. जसे की, हवामानातील बदल, ढगाळ वातावरण, वातावरणातील धूळ, धूर, वेगवेगळ्या प्रकारचे परागकण, फुलांचा वास, विशिष्ट प्रकारची औषधे, घराला लावला जाणारा नवीन रंग, घरातील पाळीव प्राणी इत्यादी… जसे की कुत्रा, मांजर, कबुतरे, कोंबड्या. आपण जी वेगळ्या प्रकारची अत्तर-स्प्रे वापरतो त्यांचाही त्रास दमा उद्भवण्यास कारणीभूत ठरतो. बाहेरच्या वातावरणातील प्रदूषण दम्यासाठी जितके कारणीभूत असते तितकेच घरातील प्रदूषण कारणीभूत असते. त्यामुळे घरात असलेली धूळ किंवा धूर हा दम्यासाठी त्रासदायक ठरतो. घरात लावली जाणारी उदबत्ती, कुठल्याही प्रकारची अगरबत्ती तसेच डास पळवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कोणत्याही प्रकारच्या वड्या या दम्यासाठी त्रासदायक ठरतात. दमा उद्भवण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांना ट्रिगर फॅक्टर असे म्हणतात तर ज्या पदार्थांमध्ये दमा उद्भवतो अशा पदार्थांना ऍलर्जन असे म्हणतात.

दम्याचे निदान करण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची सोपी चाचणी वापरली जाते. त्यामध्ये रुग्णाला एका संगणकीय मशिनमध्ये फुंकर मारायला लावली जाते आणि फुफ्फुसाची क्षमता तपासली जाते. यामध्ये रुग्णाला दमा आहे की नाही आणि असल्यास तो कोणत्या तीव्रतेचा आहे, हे तपासले जाते आणि त्यावरून औषधोपचाराची योजना केली जाते.

आज दम्यावर वेगवेगळ्या प्रकारची उत्तम दर्जाची औषधे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये श्‍वासावाटे घेण्याची औषधे रुग्णांना दिली जातात. ज्यांना इन्हेलर असे म्हटले जाते.

एखाद्या व्यक्तीला जेव्हा दमा आहे असे सांगितले जाते तेव्हा ती व्यक्ती एकदम घाबरून जाते; पण असे घाबरून जाण्याचे बिलकूल कारण नाही. कारण, दमा ही एक अवस्था असते आणि दम्याची तीव्रता ही कमी-जास्त असू शकते. दमा हा संपूर्णपणे आटोक्यात येतो. वर नमूद केलेल्या कारणांबरोबरच पित्त विकार किंवा अवेळी जेवणे तसेच मानसिक ताणतणाव ही दम्याचा त्रास उद्भवण्याची कारणे आहेत आणि या कारणावर मात करावी. काही लोकांना इन्हेलर म्हणजे तोंडाने श्‍वासावाटे घेण्याचा पंप दिल्यानंतर त्याची सवय लागेल अशी भीती असते. विशेषतः, जेव्हा अशाप्रकारचा इन्हेलर लहान मुलांना दिला जातो, तेव्हा पालक घाबरून जातात. गडबडून जातात; पण याची चिंता करण्याचे बिलकूल कारण नाही. कारण, अरुंद झालेल्या श्‍वासनलिका रुंद करण्यासाठी काही कालावधीसाठी हा इन्हेलर घ्यावा लागतो. रुग्णाचा त्रास कमी झाला की, याची मात्रा कमी केली जाते.

दम्यावरील औषधोपचार नियमित घेतले तर श्‍वासनलिका सुस्थितीत राहतात आणि दम्याचा त्रास होत नाही. औषधोपचाराबरोबरच दम्याचा त्रास कशामुळे उद्भवतात हे शोधून हे घटक टाळले, तर दम्यावर निश्‍चितपणे मात करू शकतो. दमा या आजाराची माहिती घेऊन आपल्याला कोणत्या घटकाचा त्रास होतो, कोणत्या ठिकाणी त्रास होतो, कोणत्या वातावरणात त्रास होतो आणि नेमक्या कोणत्या खाद्यपदार्थामुळे त्रास होतो हे जर शोधले, तर आपण दम्यावर निश्‍चितच मात करू शकतो. मानसिक ताणतणाव हे प्रमुख कारण असल्यामुळे ज्या व्यक्तीला दम्याचा त्रास होतो त्या व्यक्तीने तसेच त्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतरांनी हे लक्षात घेऊन दमा असलेल्या व्यक्तीला अनुकूल असे वातावरण निर्माण करणे, हे दम्यावर मात करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरते.

दमा ही अवस्था आहे आणि ही अवस्था निघून जाऊ शकते, एवढे जरी या जागतिक दमा दिनानिमित्त समजून घेतले, तरी आपण दम्यावर विजय मिळवण्यासाठी पहिले पाऊल टाकले हे समजावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news