

डॉ. प्राजक्ता गायकवाड
खूप उष्णता किंवा वाढते तापमान याचा हा परिणाम आहे असे समजून जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर मात्र नंतर पश्चातापाची पाळी येणार आहे. त्यामुळे बाळांना येणार्या घामाचे कारण माहीत असणे आवश्यक आहे. जेणेकरून योग्य वेळी त्यावर उपचार करता येऊ शकतात. बाळांच्या हाताला किंवा तळव्यांना घाम येण्याची 5 कारणे पाहूयात.
हातांना आणि तळव्यांना घाम येणे ही गंभीर समस्या : उन्हाळ्याच्या काळात जास्त उष्णतेमुळे शरीरातून घाम येणे अगदीच नैसर्गिक आहे; पण बाळांच्या हातांना किंवा तळव्यांना कोणत्याही कारणाशिवाय घाम येत असेल तर हा गंभीर समस्येकडे इशाराही असू शकतो. असे झाल्यास बाळाला उठवावे, जेणेकरून ते रडू लागेल. त्यानंतर बाळाला डॉक्टरकडे घेऊन जावे.
श्वास घेण्यास त्रास : अनेकदा श्वास घेण्यात अडचण येत असेल तर बाळाच्या तळव्यांना, शरीरातून खूप घाम येतो. अशा वेळी बाळाला हलवून उठवावे जेणेकरून ते रडू लागेल. रडताना बाळ जोरजोरात श्वास घेऊ लागते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पूर्तता होते. बाळ झोपत असताना श्वासाची घरघर जास्त प्रमाणात ऐकायला येत असेल तर मात्र बाळाला डॉक्टरकडे घेऊन जावे.
तापाचे कारण : ताप येतो तेव्हा शरीरातून खूप जास्त घाम बाहेर पडतो. तापामध्ये शरीराचे तापमान वाढते. ते संतुलित करण्यासाठी घाम येतो. बाळाला घाम येत असेल तर त्याला ताप नाही ना हे तपासावे.
हृदयरोग : अनेकदा बाळांना जन्मापासूनच हृदयाशी निगडीत एखादा आजार असतो. हृदयामध्ये छिद्र, अनियमित ठोके, अनुवांशिक हृदयरोग यामुळे बाळांना सामान्य पातळीपेक्षा जास्त घाम येतो. अशा वेळी बाळाला घाम येत असताना त्वचेचा रंग तर बदलत नाही ना किंवा त्याचा श्वास थांबत नाहीये ना हे पाहावे. तसे होत असल्यास बाळाला सीपीआर द्यावा किंवा त्वरीत चांगल्या रुग्णालयात हलवावे.
हायपरहायड्रोसिस : हायपरहायड्रोसिसमुळे बाळांच्या शरीरावर जास्त घाम येऊ लागतो. अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नाही. एकदा बाळाला घेऊन डॉक्टरकडे जावे आणि संपूर्ण उपचार करावेत.