child appetite medicine | मुलांना भूक वाढवणारे औषध देताय?

child appetite medicine
child appetite medicine | मुलांना भूक वाढवणारे औषध देताय?
Published on
Updated on

डॉ. महेश बरामदे

मुलांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न हा फक्त भूक लागण्याचा नसून अन्नाशी त्यांचा संबंध कसा तयार होतो, याचाही आहे. पालकांनी संयम ठेवून मुलांना विविध स्वाद, रंग आणि टेक्स्चरशी ओळख करून द्यावी, खाण्याच्या वेळेला आनंदी वातावरण तयार करावे आणि मुलांना स्वतःहून जेवणाकडे आकर्षित होऊ द्यावे.

लहान मुलांच्या खाण्यापिण्याबद्दल पालक नेहमीच चिंतेत असतात. कारण, बर्‍याच वेळा मुलांना दिसले की काहीतरी हेल्दी आहे, तर ते तोंड वाकडे करतात आणि खायला बसले तरी नखर्‍यांची संख्या संपत नाही. अशा परिस्थितीत अनेक मुलांचे वजन वाढत नाही, अंगात हाडे उठून दिसतात आणि पालकांना काही तरी शॉर्टकट शोधण्याची इच्छा होते. या शॉर्टकटमध्ये अनेक वेळा भूक वाढवणारा सिरप हे पहिले पाऊल ठरते, पण हा मार्ग जितका सोपा वाटतो तितकाच धोकादायकही असतो. अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना देणे केवळ निरुपयोगीच नाही तर त्यांच्या शरीराला दीर्घकाळासाठी त्रासदायक ठरू शकते.

‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’ आणि ‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’ या दोन्ही संस्थांनी भूक वाढवणार्‍या औषधांचा वापर करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अशा टॉनिकचा प्रत्यक्षात कोणताही फायदा होत नाही आणि साईड इफेक्टस् मात्र निश्चित दिसतात. त्यामुळे मुलांना भूक वाढवण्याचे सिरप किंवा कोणताही असे टॉनिक देऊ नये, अगदी ते सहज उपलब्ध असले तरीही.

या औषधांमधील मुख्य घटक म्हणून सायप्रोहेप्टाडिन नावाचे औषध असते. हे मुलांना दिल्यास त्यांना डोकेदुखी, गरगरणे, चिडचिड, संभ्रम, हलकी भोवळ येणे असे त्रास होऊ शकतात. काही वेळा अ‍ॅलर्जिक प्रतिक्रियादेखील दिसतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा औषधांचा दीर्घकालीन वापर मुलांच्या यकृतावर गंभीर परिणाम करतो. त्यामुळे भूक वाढवण्यासाठी शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात आपण मुलांच्या आरोग्यावर मोठा धोका ओढवून घेतो.

याउलट, मुलांची भूक नैसर्गिक पद्धतीने वाढवणे सर्वात योग्य मार्ग आहे. त्यासाठी त्यांच्या खाण्याच्या सवयी व्यवस्थित करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात बदल करून विविध आणि आकर्षक मेन्यू तयार करता येतो, ज्यामुळे हेल्दी पदार्थदेखील मुलांना रुचकर वाटू शकतात. त्यांना खायला जबरदस्ती करू नये, त्यांच्या मागे सतत ताट घेऊन पळू नये आणि एखादे आमिष दाखवून देऊन खायला शिकवणे तर अजिबातच योग्य नाही. जेव्हा मुलं जेवत असतील तेव्हा फोन, टीव्ही किंवा कोणतेही स्क्रीन त्यांच्यापासून दूर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण स्क्रीनसमोर बसून खाण्याची सवय भूक तसेच पचनशक्ती दोन्हीवर वाईट परिणाम करते.

मुलांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न हा फक्त भूक लागण्याचा नसून अन्नाशी त्यांचा संबंध कसा तयार होतो याचाही आहे. पालकांनी संयम ठेवून मुलांना विविध स्वाद, रंग आणि टेक्स्चरशी ओळख करून द्यावी, खाण्याच्या वेळेला आनंदी वातावरण तयार करावे आणि मुलांना स्वतःहून जेवणाकडे आकर्षित होऊ द्यावे. याच पद्धतीने त्यांच्या भुकेत नैसर्गिक वाढ होते आणि शरीर देखील तंदुरुस्त राहते.

शेवटी, आरोग्यदायी बालपणासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे नैसर्गिक सवयी आणि सकारात्मक आहारसंस्कृती निर्माण करणे. पटकन परिणाम मिळवण्याच्या घाईत कोणताही शॉर्टकट मुलांच्या आरोग्याला बाधक ठरतो, त्यामुळे विज्ञाननिष्ठ, सौम्य आणि संयमी पद्धतींचा अवलंब करणे हेच खरे पालकत्व ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news