

डॉ. भारत लुणावत
नैराश्य आणि चिंताविकाराच्या उपचारांमध्ये समुपदेशन, मानसोपचार, व्यायाम यांच्याबरोबरच गरजेनुसार नैराश्य दूर करणार्या औषधांचाही वापर केला जातो. मात्र ही औषधे स्वतःच्या मनाने सुरू करणे किंवा अचानक बंद करणे धोकादायक ठरू शकते.
नैराश्यविरोधी औषधांच्या विविध प्रकारांपैकी ‘एसएसआरआय’ प्रकारातील औषधे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ही औषधे मेंदूतील सेरोटोनिनसारख्या संदेशवाहक रसायनांच्या उपलब्धतेवर परिणाम करतात. त्यामुळे मनःस्थिती सुधारण्यास, चिंता व घबराट कमी होण्यास आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण घटण्यास मदत होऊ शकते.
या औषधांचा परिणाम तत्काळ जाणवत नाही. साधारणतः २ ते ४ आठवड्यांनंतर सुधारणा जाणवू शकते. योग्य मात्रा निश्चित करण्यासाठी आणि उपचारांचा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी काही वेळा २ ते ३ महिनेही लागू शकतात. लक्षणे कमी झाल्यानंतरही डॉक्टर काही काळ औषध सुरू ठेवण्याचा सल्ला देतात. यामागे नैराश्य पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी करणे हा उद्देश असतो.
औषधांमुळे काही रुग्णांना तोंड कोरडे पडणे, झोप अधिक किंवा कमी होणे, थकवा, भूक वाढणे, वजन वाढणे किंवा पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. काही व्यक्तींमध्ये लैंगिक इच्छा कमी होणे किंवा लैंगिक कार्यात बदल जाणवू शकतो. अशा वेळी औषध स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे. योग्य वैद्यकीय देखरेखीखाली औषधाची मात्रा बदलणे किंवा दुसरे औषध देणे शक्य असते.
दीर्घकाळ औषध घेतल्यानंतर ते अचानक थांबवल्यास बेचैनी, घबराट, झोपेचा त्रास, उदासी किंवा नकारात्मक विचार जाणवू शकतात. मूळ आजाराची लक्षणेही पुन्हा उफाळण्याची शक्यता असते. म्हणून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधाची मात्रा हळूहळू कमी केली जाते. प्रत्येक ताणतणाव किंवा उदासीसाठी औषधांची गरज नसते. लक्षणांचे स्वरूप, तीव्रता आणि कालावधी पाहून उपचार ठरवले जातात. सौम्य नैराश्यात नियमित व्यायाम, योग आणि मानसोपचार उपयुक्त ठरू शकतात; तर मध्यम किंवा तीव्र नैराश्यात औषधे आणि मानसोपचार यांची सांगड अधिक परिणामकारक ठरू शकते. उपचार सुरू असताना मद्य आणि इतर मादक पदार्थ टाळणे तसेच चक्कर किंवा अतिझोप येत असल्यास वाहन चालवताना विशेष काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.