रागाचा शरीरावर प्रतिकूल परिणाम; जाणून घ्या विकार आणि उपाय

Anger Issues | रागामुळे मनात नकारात्मकता वाढीस लागते
Passionate nature and health
तापट स्वभाव आणि आरोग्य
Published on
Updated on
डॉ. संजय गायकवाड

अलीकडील काळात सततच्या व्यस्त जीवनशैलीमुळे, वाढलेल्या ताणतणावांमुळे, मोबाईल-सोशल मीडियामुळे किंवा जीवनविषयक समस्यांची संख्या वाढल्याने राग येण्याचे आणि सतत राग येणार्‍या व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. याची कारणे काहीही असली, तरी रागाचा आपल्या शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो.

सततच्या रागामुळे उच्च रक्तदाब, चिंता, नैराश्य, डोकेदुखी यासारख्या शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. रागामुळे मनात नकारात्मकता वाढीस लागते आणि अपयश येणार असे गृहीत धरूनच एखादी व्यक्ती कृती करू लागते. या गोष्टीमुळे संबंधित व्यक्तीची कामे बिघडतात, आत्मविश्वास कमी होतो, हातून चुका घडतात आणि पर्यायाने नैराश्य येण्याची समस्या असते.

रागामुळे होणारे विकार आणि उपाय

पोटाचे विकार : रागीट किंवा तापट स्वभावामुळे पोटाचे विकार होऊ शकतात, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही; परंतु अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी यासारखे विकार रागामुळेही होऊ शकतात. तापट स्वभावामुळे अन्नपचनाच्या प्रक्रियेला बाधा येते आणि पोटाचे विकार जडू शकतात.

डोकेदुखी : रागीट आणि संतापी स्वभावामुळे डोकेदुखीचा आजार बळावतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध किंवा विचाराविरुद्ध झाली की, संताप अनावर होतो आणि डोकेदुखी वाढते. अशावेळी एक ते दहा आकडे मोजून रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टीमुळे रक्तदाबही वाढतो. म्हणून संकटकाळातही शांतपणे मार्ग काढणे कधीही हिताचे ठरते.

हदयविकार : सातत्याने रागीट, क्रोधीत स्वभावामुळे ताण कायम राहतो. परिणामी, हृदयविकाराचा आजार जडण्याचा धोका संभवतो. अशा स्वभावाच्या व्यक्तींंना हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याची शक्यता अधिक असल्याचे अनेक अभ्यासातूनही दिसून आले आहे. त्यामुळे ताणतणाव घालविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संगीत ऐकणे, योग, व्यायाम करणे या मनाला स्थिर करणार्‍या कृती आहेत.

नैराश्य : क्रोधीत स्वभाव हा नैराश्याकडे नेण्यास कारणीभूत ठरू शकतो. ताण आणि राग यामुळे आरोग्य बिघडू शकते आणि मनात नैराश्याची भावना निर्माण होते. एखादा निर्णय किंवा गोष्ट मनासारखी झाली नाही, तर आपण निराश होतो आणि त्याचा राग अन्य वस्तूंवर किंवा व्यक्तींवर काढतो. अशावेळी अपयश पचविण्याची शक्ती मनात निर्माण केली पाहिजे. नेहमीच सकारात्मक विचार करून नैराश्याला बाजूला सारले पाहिजे.

उच्च रक्तदाब : रागीट स्वभाव हा उच्च रक्तदाबाला हमखास कारणीभूत ठरू शकतो. कालांतराने आरोग्याचे प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवढे शांत राहता येईल, तेवढे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंदी वातावरण कसे राहील, याचाच विचार केला पाहिजे. नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता सकारात्मक गोष्टीकडे अधिक वेळ द्यावा, तरच रक्तदाब नियंत्रित राहू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news