Health Benefits : रोज २ खजूर खा, आरोग्याला द्या ‘एनर्जी बूस्ट’! पचनापासून थकव्यापर्यंत जाणून घ्या फायदे

पोषक घटकांनी समृद्ध खजुराचे नियमित सेवन आरोग्यदायी
Dates Benefits
Published on
Updated on

धावपळीची जीवनशैली, खाण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप आणि ताण यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅसेस तसेच दिवसभर थकवा जाणवण्याच्या तक्रारी वाढत आहेत. नैसर्गिक गोडवा असलेला खजूर हा त्यासाठी चांगला पर्याय आहे.

रोज साधारण 2 खजूर खाल्ल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्याबरोबरच पचनसंस्थेलाही फायदा होऊ शकतो. खजुरामध्ये कार्बोहायड्रेट्स, आहारातील तंतू, पोटॅशियम, मॅग्‍नेशियम तसेच विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजसारखी नैसर्गिक शर्कराही असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी किंवा त्यापूर्वी खजूर खाल्ल्यास शरीराला पटकन ऊर्जा मिळू शकते. व्यायाम किंवा अधिक शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठीही तो ऊर्जादायी पदार्थ ठरतो.

खजुरातील फायबर आतड्यांच्या नियमित हालचालींना मदत करू शकतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांना आहारात मर्यादित प्रमाणात खजूर समाविष्ट करण्याचा फायदा होऊ शकतो. तंतुमय आहाराबरोबर पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे. खजुरातील पोटॅशियम आणि मॅग्‍नेशियम स्नायू आणि मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहेत. वजन वाढवायचे असल्यास डेट मिल्क म्हणजेच खजुराचे दुधासोबत सेवन करावे.

मधुमेह असल्यास मात्र सावध!

खजूर आरोग्यदायी असला तरी त्यात नैसर्गिक शर्करा आणि कॅलरी असतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी ‌‘नैसर्गिक साखर आहे‌’ म्हणून तो अमर्याद खाऊ नये. रक्तातील साखरेची पातळी आणि एचबीए1सी किती आहे, याचा विचार करून प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. साखर अनियंत्रित असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच खजूर खावा.

हेही लक्षात ठेवा

खजूर रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे त्यातील नैसर्गिक साखर नाहीशी होते, असे काही जणांचे मानणे आहे; पण ते पूर्णतः चुकीचे आहे. खजूर पौष्टिक आहे म्हणून अधिक प्रमाणात खाणे मात्र योग्य नाही. कारण तो प्रकृतीने उष्ण असतो. अतिसेवनाने शरीरातील उष्णता वाढून काही समस्या उद्‍भवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news