

शरीरातली प्रतिकारशक्ती अपायकारक घटकांना रोखून धरते. त्यामुळे त्याचे परिणाम कमी होतात. पण, अन्नपदार्थांची अॅलर्जी असेल, तर तिचे परिणाम जाणवतातच. आपण सेवन केलेल्या अन्नातल्या प्रथिनवर्गीय घटकांचे पचनक्रियेतून अमिनो आम्लात रूपांतर होते. त्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते. शरीराच्या आत लहान आतड्याच्या श्लैष्मिक आवरणामध्ये प्रतिरक्षक प्रणाली असते, ज्याला इम्युनोग्लो ब्युलिन म्हटले जाते. (Food Allergie)
ती शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या अॅलर्जिक घटकांना रोखते. परिणामी, अॅलर्जीकारक घटक रक्तात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे पचनमार्गात अनेक प्रकारचे अॅलर्जी निर्माण करणारे घटक असूनही, शरीरावर त्याचे कोणतेही बाह्य लक्षण दिसत नाही. अॅलर्जी ही प्रदूषण, धूलिकणांपासून ते अन्नपदार्थांपर्यंत कशाचीही होऊ शकते. त्याची नेमकी कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय समजून घेणे गरजेचे आहे
त्वचा : त्वचेला खाज येणे, शीत पित्त, अॅजिओ ओडिमा किंवा अॅजियो न्युरोटिक ओडिमा ज्यात त्वचेखाली सूज येते. ती हात, पाय, मान, चेहरा तसेच जननेंद्रियांवर दिसून येऊ शकते.
पचन: उलटी, पोटदुखी, जुलाब, रक्ताचे जुलाब होऊ शकते.
श्वसन : दमा व शिंका आहारातून होणाऱ्या अॅलर्जीची बाह्य लक्षणे पूर्णपणे दिसतात, तेव्हा शरीरातल्या विविध कार्यावर त्याचा प्रभाव पडतो. क्वचितप्रसंगी हृदयक्रिया बंद पडून रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. काही औषधे, दूध, कोळंबी किंवा खेकडा यांच्या सेवनामुळेही अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
अॅजिओएडिमा झाल्यास शीतपित्त होते. अशा वेळी शरीराच्या कोणताही भाग लालसर होऊन त्यावर सूज येऊ शकते. पापण्यांना आलेल्या सुजेमुळे डोळे बंद होऊ शकतात. ओठांवर सूज आल्याने ते बाहेर आल्यासारखे दिसतात. या सूज येण्यात हलक्या वेदना व खाज येऊ शकते. हेच पित्त जर श्वसननलिकेच्या आत आले व योग्य वेळी उपचार न मिळाल्यास श्वास गुदमरून रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. काही फळे, भाज्या यांचा तोंड व घसा यांच्या श्लेष्मल आवरणाशी संपर्क आल्यास अॅलर्जी निर्माण होते. त्याला वैद्यकीय भाषेत ओरल अॅलर्जी सिन्ड्रोम म्हटले जाते.
जवळपास सर्वच खाद्य पदार्थांपासून अॅलर्जी होण्याचा धोका असतो; मात्र काही पदार्थांमुळे ती शक्यता अधिक असते. अंडी, मासे, गाय, बकरीचे दूध, गहू, गहवर्गीय पदार्थ, भुईमूग शेंगा, कोळंबी, खेकडा इत्यादी सेवन केल्याने अॅलर्जी होऊ शकते. फळे व भाज्यांमध्ये पपई, काकडी, नारळ, संत्रे, सफरचंद, वांगे, केळी, टोमॅटो, अरवी, भेंडी, फुलकोबी, लाल माठ, पालक, दुधी भोपळा आदी भाज्यांचीही अॅलर्जी होते. मद्यपानामुळेही अॅलर्जी होते. खाद्य पदार्थ टिकवण्यासाठी अनेकदा रासायनिक व कृत्रिम रंगाचा वापर केला जातो, त्याचीही अॅलर्जी येऊ शकते.
टॉट्रॅजिन नावाच्या पिवळ्या रंगाचा खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे शीतपित्त व दमा होण्याची शक्यता असते. खाद्य पदार्थांमध्ये विशेष सुवास निर्माण करण्यासाठी चायनीज सॉल्ट म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट वापरतात. यामुळे दमा होण्याची शक्यता असते. सुक्या मेव्याच्या संरक्षणासाठी सलाड तसेच फळांच्या रसातही सॅलफाईट मिसळले जाते. यामुळे दम लागू शकतो.
दुधाची अॅलर्जी : सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये दुधाची अॅलर्जी होत असल्याचे पाहायला मिळते. आईचे दूध पिताना बाळाला हा त्रास होत नाही; मात्र गायीचे दूध जेव्हा मुलांना पाजायला सुरुवात केल्यानंतर मात्र त्यांना पोटदुखी, पचनाच्या समस्या, श्वसनाला त्रास तसेच त्वचेच्या विविध समस्या होऊ शकतात. गायीच्या दुधात असणाऱ्या बिटा लॅक्टोग्लोब्युलिन नावाच्या प्रथिनामुळे ही समस्या निर्माण होते.
दूध उकळल्यानंतरही या प्रथिनांमध्ये बदल होत नाही आणि अॅलर्जीची प्रतिक्रिया निर्माण होते. आहाराशी निगडित अॅलर्जीसाठी रुग्णाच्या आहार सवयींची माहिती करून घेतली जाते. काही रुग्णांना स्वतःला त्याची कल्पना असते, की कोणत्या पदार्थाची त्यांना अॅलर्जी येते आहे. त्यामुळे अॅलर्जी येऊ शकणारे पदार्थ सहजपणे ओळखता येतात. आहारामुळे होणाऱ्या अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी एकमात्र महत्त्वाचा उपाय म्हणजे, त्या खाद्यपदार्थांचे सेवन न करणे. त्यामुळे अॅलर्जी होण्याचा धोका कमी होतो.
एकदा का तुम्हाला अॅलर्जी असलेले पदार्थ ओळखता आले, की ते आहारात टाळणे किंवा त्याचे पथ्य सांभाळणे सहजशक्य होते. त्याच्याशी निगडित येणाऱ्या लक्षणांपासून सुटका करण्यासाठी काही औषधांचे सेवन करता येऊ शकते. इम्युनोथेरेपीचा खाद्यपदार्थांच्या अॅलर्जीमध्ये उपयोग होऊ शकत नाही. एखाद्या विशिष्ट अॅलर्जीकारक खाद्य पदार्थाचे सेवन दीर्घकाळपर्यंत केले नाही किंवा सेवनच बंद केले तर त्या खाद्य पदार्थातल्या अॅलर्जीकारक घटकाच्या मुकाबल्यासाठी शरीरात असलेल्या आय.जी.ई अँटीबॉडीजची संख्या कमी होते.
परिणामी, दीर्घकाळानंतर त्या खाद्यपदार्थाचे सेवन पुन्हा सुरू केल्यास कदाचित रुग्णाला अॅलर्जी किंवा काही समस्या येणार नाही. अर्थात, सातत्याने या पदार्थाचे सेवन केल्यास पुन्हा अॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात. आहारजन्य अॅलर्जी व्यतिरिक्त औषधांच्या सेवनाने अॅलर्जी निर्माण होते; पण हा गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय यावर स्वतःच काही औषधोपचार घेऊ नयेत. कारण बरेचदा असे उपचार घातक ठरू शकतात.