

अॅलर्जिक र्हायनायटिस ही श्वसनसंस्थेशी निगडित एक सामान्य पण त्रासदायक अॅलर्जीजन्य समस्या आहे. हवेत असणारे परागकण, धूळकण, बुरशीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस, कपड्यांतील सूक्ष्म धागे किंवा सुगंधी रसायनांचा वास हे सर्व घटक अॅलर्जेन म्हणून कार्य करतात.
जेव्हा अॅलर्जेन नाक अथवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा हिस्टामिन नावाचे द्रव्य स्रवते. यामुळे नाकाच्या आतील आवरणात सूज येते, ग्रंथी उत्तेजित होतात आणि शिंका येणे, नाक वाहणे, डोळ्यांत व घशात खाज येणे, कधी कधी त्वचेवर लालसर चट्टे दिसणे अशी लक्षणे प्रकट होतात. अॅलर्जिक र्हायनायटिस संसर्गजन्य नसतो. सामान्य सर्दीप्रमाणे तो जीवाणू किंवा विषाणूमुळे होत नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेची अति संवेदनशील प्रतिक्रिया यात कारणीभूत असते. काहीवेळा नॉन एलर्जिक र्हायनायटिससुद्धा आढळतो. या दोन्हींमध्ये समान लक्षणे दिसतात; परंतु त्यामागे अॅलर्जेन नसतो.
या आजाराचे दोन प्रकार मानले जातात. पहिला म्हणजे हंगामी अॅलर्जी जी विशिष्ट ऋतूमध्ये दिसते, उदा. पावसाळ्यात किंवा पीक कापणीच्या काळात परागकण वाढल्यावर ही तक्रार होते. दुसरा प्रकार म्हणजे वर्षभर राहणारी अॅलर्जी जी प्रामुख्याने घरातील धूळकण, आर्द्र हवामान, पाळीव प्राणी किंवा काही खाद्यपदार्थ यांमुळे उद्भवते.
प्रमुख कारणे
कुटुंबामध्ये पूर्वीपासून अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असणे, अतिप्रदूषित किंवा दमट ठिकाणी राहणे, वायुवीजन कमी असलेल्या जागेत जास्त वेळ घालवणे यामुळे अॅलर्जिक र्हायनायटिस होण्याची शक्यता वाढते.
बिछाना, उशी व चादरी आठवड्यातून दोनदा धुऊन उन्हात वाळवणे, घरातील हवेशीरपणा टिकवणे, धूळ व धूर टाळणे, एअरकंडिशनर व कूलर नियमित स्वच्छ ठेवणे, धुळीच्या ठिकाणी जाताना मुखपट्टी लावणे, अगरबत्ती व धूपबत्तीच्या धुरापासून दूर राहणे हे उपाय साधे असले तरी प्रभावी ठरतात.
अॅलर्जी दीर्घकाळ राहिली तर नाकामध्ये पॉलिप्स निर्माण होऊ शकतात. तसेच दम्याचा त्रास वाढणे, ब्राँकायटिस, सतत श्वास घेण्यास त्रास होणे, फंगल सायनसाईटिस होणे यासारख्या गुंतागुंतीही उद्भवू शकतात. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नये.