आम्लपित्त व आयुर्वेद उपचार | पुढारी

Published on
Updated on

वैद्य दिलखूश तांबोळी

आम्लपित्त हा शब्द दोन वेगवेगळ्या शब्दांपासून तयार होतो. एक आम्ल व दुसरा पित्त. यातून एक ढोबळ कल्पना आली असेल की ज्या आजारात पित्त हे आम्ल किंवा आंबट गुणांनी वाढते त्या आजारास आम्लपित्त म्हणतात. एक पित्ताची गोळी घेतली की लगेच कमी होतो. असा वरवर सोपा वाटणारा आजार बरा करण्यास अवघड असतो. आयुर्वेदामध्ये शरीरामध्ये सर्व क्रिया चालवणारे तीन मुख्य घटक आहेत. वात, पित्त, कफ हे तीन मुख्य घटक यांना त्रिदोष म्हणतात. यांचे शरीरामध्ये असलेले प्रमाण विकृतरीत्या वाढले की हे तीन दोष शरीरामध्ये आजार निर्माण करतात. शरीरामध्ये दोष निर्माण करतात म्हणूनच या घटकांना दोष ही संज्ञा आयुर्वेदामध्ये दिली आहे. या दोषांची शरीरामध्ये विकृत वाढ होऊ नये म्हणून पथ्याचा आधार घेणे, वेळोवेळी शरीर शुद्धीसाठीची पंचकर्मे करून घेणे या गोष्टी आयुर्वेदाने सांगितल्या आहेत.

या पित्ताची चिकित्सा करताना शास्त्रकार म्हणतात – पित्तं जामातर इव म्हणजे पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे. त्या काळात जावयाबद्दल असलेल्या अनुभवावरून किंवा संकल्पनेतून ही संज्ञा दिली असावी. यावरून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की 'पित्त' हे शीघ्रकोपी असते. तुमच्या पथ्यापथ्यात, रोजच्या जीवनशैलीमध्ये थोडा देखील बदल झाला तर शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो व छातीत जळजळ, मळमळ, तीव्र डोकेदुखी किंवा अंगामध्ये, पायांमध्ये, डोळ्यामध्ये दाह निर्माण होणे अशा प्रकारची पित्ताची लक्षणे दिसू लागतात.

पुरुषोऽयं लोक सम्मितः या सिद्धांताप्रमाणे सृष्टीचे छोटे स्वरूप म्हणजे मानवी शरीर आहे. सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे छोटे स्वरूप मानवी शरीरामध्ये आहे. 

उदा. सृष्टीतील वारा/वायू – शरीरामध्ये ही असते त्याला वातदोष म्हणतात.

सृष्टीतील चंद्र जो सृष्टीमध्ये शीतलता, सौम्यता आणतो त्याचे शरीरातील छोटे स्वरूप म्हणजे कफदोष.

सृष्टीमध्ये असणार्‍या सूर्याचे छोटे स्वरूप म्हणजे पित्तदोष होय. 

आपण जो आहार घेतो त्याचे पचन करणे, शरीरभावात बदल करणे अशी साक्षात अग्‍नीची कामे पित्ताच्या आश्रयाने, उपस्थितीनेच होतात. अशा या पित्ताची विकृत वाढ होण्यासाठी आपण जो आहार घेतो, ज्या प्रमाणे जीवनशैली ठेवतो याच गोष्टी कारणीभूत असतात. ती कारणे पुढीलप्रमाणे –

आम्लपित्ताची कारणे

आहार षड्रसात्मक असावा असे आयुर्वेद सांगते.गोड, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट अशा सहा चवींचा किंवा सहा रसांचा आहार आपण घेत असतो; परंतु या षड्रसांपैकी – आंबट (आम्ल), खारट (लवण) व तिखट (कटू) या तीन रसांचा आहार आपण जास्त घेतला की शरीरातील पित्त वाढते. याची रोजच्या आहारातील उदाहरणे पुढीलप्रमाणे – आंबवलेले पदार्थ (ईडली, डोसा सारखे साऊथ इंडियन पदार्थ), बेकरीचे सर्व पदार्थ (बिस्किटे, खारी, टोस्ट इ.), लोणचे, दही, सर्व प्रकारची फळे जरी गोड असली तरी पचन झाल्यावर शरीरामध्ये त्यांचा आंबटपणाचा परिणाम येतो. चवीला गोड असणारा पण शरीरावर आम्ल रसाचा प्रभाव दाखवणारा पदार्थ म्हणजे जिलेबी, ढोकळा या आंबट पदार्थांच्या सोबत असणार्‍या खोबरे, टोमॅटो इ.च्या वेगवेगळ्या चटण्या, दही, आंबट ताक, चिंच, खारट पदार्थांमध्ये कुरकुरे, वेफर्स सारखे सर्व नमकीन पदार्थ.

सर्व तिखट पदार्थं, सर्व मसाल्याचे पदार्थ. मसाल्याचे पदार्थ उष्ण तीक्ष्ण असतात त्यामुळे शरीरातील पित्त उष्ण गुणांनी वाढते. मिरे, आले, मिरची, दालचिनी, खोबरे, लसूण यांसारखे मसाल्याचे पदार्थ अशा पदार्थांपासून बनवलेल्या चटण्या, पाणीपुरीचे पाणी या सर्व कारणांनी शरीरातील पित्त वाढते. आंबट, खारट किंवा तिखट पदार्थांशिवायही पित्त वाढते त्याची कारणे पुढीलप्रमाणे –

कोणत्याही चवीचे शिळे अन्‍न खाणे, कोणत्याही प्रकारच्या अन्‍नाचे अजीर्ण झाले तरी आम्लपित्ताची लक्षणे दिसू लागतात. अजीर्ण झाले तरी आम्लपित्ताची लक्षणे दिसू लागतात. अजीर्ण होणे म्हणजेच खाल्लेले अन्‍न अर्धे/कच्चे पचन होणे व जे न पचलेले अन्‍न आहे त्यामध्ये फर्मंनटेशन सुरू होते व गोड खाल्लेल्या अन्‍नामध्ये आंबण्याची प्रक्रिया सुरू होते व आम्लपित्ताची लक्षणे सुरू होतात. 

याशिवाय वर्षाऋतूमध्ये ही शरीरातील पित्त वाढते.

आम्लपित्ताची लक्षणे

या आजारात जठरातील पित्ताची आम्लता वाढते त्यामुळे तोंडाला पाणी सुटणे, आंबट पाणी येणे, आंबट/करपट ढेकरा येणे, घशात जळजळ होणे, पोटात आग पडणे, भूक मंदावणे, तोंडाला कडवट/आंबट चव येणे, खाल्लेले अन्‍न न पचणे, अन्‍नाचा व्देष वाटून अन्‍न खायला नको वाटते. काही आम्लपित्‍ताच्या प्रकारात अंगाला गांधी उठणे, वारंवार डोके दुखणे – उलटी झाली की डोकेदुखी थांबणे, अधिक तहान लागणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, अंगाचा दाह होणे, डोळ्यांचा दाह होणे, अशक्‍तपणा असणे, उलटीमधून आंबट, हिरवट रंगाचे पित्त पडणे पित्तासोबत चिकट, जिळगट असा कफ पडणे, कधी कधी पोट दुखणे, अंगात आळस वाटणे, अंगाला मुंग्या येणे, संडास दुर्गंधीयुक्‍त, हिरवट, पिवळी, पाण्याप्रमाणे अशी होणे, वारंवार पित्ताच्या उलट्या होणे, उलटी झाली की बरे वाटणे.

आम्लपित्ताचे उपद्रव 

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उपचारांसाठी सोपा वाटणारा; परंतु प्रत्यक्षात खूप अवघड असलेला हा आजार आहे. या आजारात लक्षणांचा एक क्रम पहायला मिळतो. सुरुवातीला इतर लक्षणांप्रमाणे तोंडाला पाणी सुटणे – मळमळ होणे – व शेवटी उलटी होणे. आम्लपित्ताचा रुग्ण उलटी झाली की बरे वाटते असे सांगत असतो यावरून एक लक्षात येते की रुग्णाला झालेली उलटी ही रुग्णाच्या भल्यासाठीच झालेली असते. खरेतर आपले शरीर स्वतःच एक डॉक्टर असते व ते स्वतः शरीराला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असते. त्यापैकीच हा उलटीचा प्रकार असतो. उलटीने रुग्णाला बरे वाटते हे शरीराने स्वतः वाचवण्यासाठी केलेली क्रिया असते आणि जे पित्त बाहेर जाणे अपेक्षित असते, शरीर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते म्हणून जळजळ, मळमळ सुरू होते; परंतु नेमके यावेळी आपण मेडिकलमधून पित्ताची गोळी आणून खातो आणि शरीराबाहेर पडण्यास तयार असलेल्या पित्ताला आतच दाबतो आणि गोष्ट वारंवार होत गेल्यास आत दबले गेलेले पित्त दुसर्‍या आजारांच्या स्वरूपाने बाहेर पडते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पूर आलेला सर्वांनी पाहिला आहे.

त्याची छोटी छोटी कारणे सोडून मोठी कारणे पाहिली तर मुख्यत्वे करून दोन कारणे होती. पहिले कारण म्हणजे पाणलोट क्षेत्रात खूप पाऊस पडणे व दुसरे कारण म्हणजे अलमट्टी धरणातून पाणी न सोडणे/अडवणे. आपण पाहिले की धरणातील पाणी अडवले तर धरण भरेपर्यंत कोणताही त्रास नसतो; परंतु हे पाणी हळूहळू आपली पुढे जाण्याऐवजी आपली दिशा बदलते व मागे मागे जाऊ लागते/थांबू लागते व हळूहळू पूरस्थिती निर्माण करते. असेच काहीसे पोटातून बाहेर पडणार्‍या पित्ताला पित्तशामक औषधांनी अडवले की पित्त आपली दिशा बदलते व शरीरातील इतर अवयवांमध्ये शिरून तिथे पूरस्थिती म्हणजेच तिथे आजार निर्माण करते. नुकतेच व्हॉटस् अ‍ॅप वर सर्वांनी एक व्हिडीओ पाहिला असेल रॅनिटीडीन या औषधाच्या अधिक सेवनाने कॅन्सर होतो. 

रॅनिटीडीन हे औषध आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घेतले जाते. वर सांगितल्याप्रमाणे पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस पडल्यानेही पूर येतो तसे पित्त वाढवणारे पदार्थ सतत खाणे, बदलत्या जीवनशैलीने शरीर विकृत प्रमाणाची वाढ होते व आजार निर्माण होतात तसेच धरणाचे पाणी अडवल्याने जशी पूरस्थिती येते तसेच शरीरात वाढलेल्या पित्ताला औषधांनी अडवले तर ते मोठमोठे आजार निर्माण करते. कॅन्सर हा त्यापैकीच एक आजार होय.

याशिवाय अति उच्च रक्‍तदाबाचा त्रास होणे, तीव्र डोकेदुखी मायग्रेन, छातीत धडधड होऊन घाम येणे, अस्वस्थता वाटणे, भीती वाटणे, किडनीचे आजार, डोळ्यांच्या तक्रारी निर्माण होणे, मलावरोध, त्वचा विकार होणे, सोरायसिस, मूड बदलणे, पांडू होणे, (कावीळ) कामला होणे, दमा अशा प्रकारे शरीरामध्ये दबलेले पित्त अशा प्रकारचे आजार घेऊन येते. पोटाशी संबंधित अल्सरेटिव्ह कोलायटिस पोटाचा कॅन्सर होणे, पचनक्रिया मंदावणे, झोपेच्या तक्रारी निर्माण होणे हे उपद्रव आम्लपित्ताच्या रुग्णांना झालेले आढळतात.

आम्लपित्त उपचार

शरीरात वाढवणार्‍या पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे असे शास्त्र म्हणते म्हणजेच शरीरात वाढवणार्‍या पित्ताची खूप काळजीपूर्वक चिकित्सा करणे आवश्यक असते. आम्लपित्ताच्या सर्व रुग्णांना कळकळीची विनंती आहे कि त्यांनी स्वतःच्या स्वतः औषध घेणे प्रथमतः बंद करावे. आपल्या जवळच्या वैद्यांना भेटून त्यांच्याशी आपल्या जीवनशैलीची माहिती देऊन त्यातील योग्य-अयोग्य गोष्टी चर्चा करून समजून घेऊन त्यामध्ये योग्य तो बदल करून घ्यावा. आपल्या प्रकृतीला योग्य कोणता आहार घ्यावा, कोणती पथ्ये पाळावीत याची माहिती वैद्यांकडून घ्यावी व तसा आपल्या दिनचर्येमध्ये बदल करून घ्यावा.

आपण नेहमी हे लक्षात ठेवावे की ज्या जीवनशैलीमुळे ज्या प्रकारच्या खाण्यापिण्यामुळे आपल्याला एखादा आजार झाला आहे त्या खाण्यापिण्याच्या सवयी, ती जीवनशैली बदलल्याशिवाय केवळ औषधांनी झालेला आजार बरा होऊ शकत नाही. एखादी खोली आपण झाडूने स्वच्छ करत असतो त्याचवेळी कोणीतरी त्या खोलीत कचरा टाकत असेल तर केवळ झाडल्याने ती खोली स्वच्छ होणार नाही त्याकरिता त्या खोलीत कचरा टाकणे ही बंद झाले पाहिजे.

आम्लपित्ताच्या रुग्णांनी सर्वप्रथम आयुर्वेदात सांगितलेली वमन, विरेचन इ. पंचकर्मे करून शरीरशुद्ध करून घेतले पाहिजे. जेणेकरून संपूर्ण शरीरात वाढलेली आम्लता कमी होईल. शरीर शुद्धीच्या या प्रक्रिया कोणी कराव्यात, कोणी करू नयेत यासंबंधी काही नियम शास्त्राने घालून दिले आहेत त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याशिवाय या गोष्टी करू नयेत.

याचदा लोकांना रोज ब्रश करताना मुद्दाम उलटी काढण्याची सवय असते हे अत्यंत चुकीचे आहे. याने आपण स्वतः वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो. अशा लोकांनी वमन, विरेचनादि कर्मे करून, जीवनशैली बदलून, पथ्याहार घेतलाच पाहिजे.

डाळिंब रस, गुलकंद, कोकम, कोहळा, मोरावळा, ज्येष्ठमध, काळे मनुके हे रोजच्या व्यवहारातील पित्तशामक पदार्थ आहेत. यांचा आपल्या रोजच्या खाण्यामध्ये समावेश करावा. लिंबू सरबत देखील पित्तशामक आहे; परंतु काही विशिष्ट प्रकृतिच्या लोकांना लिंबू सरबत घेतल्याने त्रास वाढतो. त्यामुळे ज्यांना लिंबू सरबताचा त्रास होत नाही त्यांनीच लिंबू सरबत घ्यावा.

शिवाय सततचे जागरण टाळावे, सततची चिडचिड टाळावी, अतिचिंता करू नये.

आम्लपित्त हा रोग नवीन असला तर लवकर बरा करता येतो. अधिक जुना झाल्यास फार प्रयत्नाने त्यावर फार कष्टाने विजय मिळवता येतो. आम्लपित्त रोग वैद्यांना मोहात पाडणारा रोग आहे; परंतु हा आजार फार गुढ असा आजार आहे. कारण यामध्ये वेगवेगळ्या आजारांचा त्रास होतो तसेच वेगवेगळ्या आजारांमध्ये आम्लपित्तासारखी लक्षणे आढळतात. त्यामुळे या आजाराची चिकित्सा काळजीपूर्वक करावी लागते. रुग्णांनी देखील मी कोणतेही पथ्य पाळणार नाही तरीही माझा आजार बरा करा असा हट्ट न करता वैद्यांनी सांगितलेली पथ्ये, पंचकर्मे, औषधे घेऊन वैद्यांचा सल्ला तंतोतंत पाळून या आजारातून आपली सुटका करून घ्यावी. आजारांमुळे नेहमी त्रस्त राहण्यापेक्षा पथ्यापथ्य सांभाळणे केव्हाही चांगले.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news