

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) -मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग हे सामान्य जिवाणू संक्रमण आहे, जे लहान मुलांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास ते गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतात. शालेय मुलांमध्ये शौचालय स्वच्छतेसंबंधी जागरूकता करणे आणि मूत्रमार्गाच्या भागातील संसर्गाबद्दल माहिती देणे, ही काळाची गरज आहे.
यूटीआय समजून घ्या
जेव्हा जिवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा यूटीआय संसर्ग उद्भवतो, ज्यामुळे मूत्राशय किंवा मूत्रपिंडासारख्या विविध भागांमध्ये संक्रमण होते. मुलांमध्ये यूटीआय संसर्ग अनेक लक्षणांसह दिसून येतात. उदा. वारंवार मूत्रविसर्जनाची भावना होणे, लघवी करताना वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे, लघवी न रोखता येणे, पोटदुखी, ताप, दुर्गंधीयुक्त मूत्र, अंथरूण ओले करणे, खाज इ. मुलांवर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात मूत्रपिंड संक्रमणासारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते. या संक्रमणांमुळे मूत्रपिंडाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
1. हात धुणे : वारंवार हात धुणे हे यूटीआय संरक्षणाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात चोळून पाण्याने स्वच्छ धुवावेत. हाताची स्वच्छता मूत्रमार्गात जिवाणूंचा प्रसार रोखण्यास मदत करते.
2. पुसण्याचे तंत्र : मुलींना शौचालयाचा वापर केल्यानंतर वरून खालच्या दिशेने स्वच्छतेचे तंत्र शिकवले गेले पाहिजे. असे न केल्यास हे गुदद्वारातील बॅक्टेरियांना मूत्रमार्गात प्रवेश करण्यास आणि संक्रमणास मार्ग मिळतो.
3. बाथरूम ब्रेक द्या : मुलांना लघवी करण्याची गरज भासत नसली तरीही त्यांना नियमित बाथरूम ब्रेक घेण्यास प्रोत्साहन द्यावे. हे त्यांचे मूत्राशय वेळोवेळी रिकामे करण्यास मदत करते तसेच जिवाणू तयार होण्याचा धोका कमी करते.
4. हायड्रेशन : मूत्रमार्गाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शाळांनी मुलांना दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी प्रोत्साहित करावे.
5. योग्य वातावरण तयार करा : मुलांना लघवीशी संबंधित कोणत्याही समस्या किंवा लक्षणांवर चर्चा करण्यास मोकळे वाटायला हवे. यामुळे लक्षणे दिसताच वेळीच निदान आणि उपचार करणे शक्य होते. नियमित तपासण्या केल्याने मुलांमधील संक्रमणाची माहिती होऊन संसर्गाला अटकाव करता येईल.
शाळांमध्ये शौचालय स्वच्छता शिक्षण, यूटीआय प्रतिबंध आणि जागरूकता यावर मुलांच्या आरोग्य शिक्षणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हे प्रयत्न शालेय वयाच्या मुलांच्या सर्वांगीण विकास आणि आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील आणि भविष्यातील गुंतागुत टाळता येईल.