वजन घटवण्याची गुरुकिल्ली | पुढारी

वजन घटवण्याची गुरुकिल्ली

डॉ. संतोष काळे

अलीकडे बैठे प्रकारचे काम, विज्ञानाने लावलेले अनेक शोध यामुळे शरीराचा व्यायाम थांबून गेलाय. परिणामी, वजन वाढणे ही एक मोठी समस्या होऊन बसलीय. यावर उपाय म्हणून कमी कमी खाणे, शरीराला अतिरिक्त व्यायामाचा डोस देऊन हैराण करणे हा उपाय अजिबात नाही. रोजच्या दिनक्रमातील आहार, व्यायामावर नियंत्रण ठेवले, तर काहीच अवघड नाही. आयुर्वेदाचे सल्ले यासाठी नक्कीच प्रभावी ठरणारे आहेत. आयुर्वेदाचा परिणाम हळूहळू होतो, हा समज थोडा बाजूला ठेवला, तर याचे पालन करणे सोपे जाईल.

गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे; पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत. शेवटी खाणे म्हणजे अतिरिक्त चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरते. याची पडताळणी करण्यासाठी थोडे दिवस जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ खाऊन पाहा. वजन वाढलेले दिसेल; पण जेवढे गोड पदार्थ जेवणानंतर खाणार तेवढेच ते जेवणाआधी खा. या प्रकारात नेहमीपेक्षा निम्मे अन्न जाईल. म्हणजे आपल्याला जेवढे अन्न हवे आहे, तेवढेच खाल्ले जाईल. अशा तर्‍हेने अवाजवी अन्न टाळले जाईल. परिणामी, कमीच दिवसात वजन कमी झालेले आढळेल.

जेवणानंतर पान खाण्याची प्रथा आहे. अलीकडे ही प्रथा काहीच कुटुंबांमध्ये दिसून येते. पान खाण्यामागेही आयुर्वेदाचे बरीच कारणे आहेत. पानातील चुना, कात, सुपारी, गुलकंद (तंबाखू व अन्य रसायनमिश्रित पदार्थ सोडून) या सर्वांमध्ये आयुर्वेदानुसार गुणकारी घटक आहेत. चयापयाची क्रिया सुधारण्यास त्यांचा लाभ होतो. याबरोबरच फळांचेही उदाहरण घेता येईल. सर्व फळांमध्ये कमी—जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू, तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवापायी ही जीवनसत्त्वे वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी बिया व सालींचे सेवन करावे.

चरबी किंवा मेद मेणासारखा असतो. उष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्या वजन कमी करायचे असल्यास थंड पाणी, कोल्ड्रिंक्स वर्ज्य करा. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, लस्सी, आईस्क्रीम घेणे म्हणजे अतिरिक्त चरबीला आमंत्रण देणे होय. याबरोबरच चहा-कॉफीसारखी साखरयुक्त पेये दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटाघोटाबरोबार पोटात जाणारी साखर कणाकणाने चरबी वाढविण्यास मदत करते.

आयुर्वेदाच्या नियमानुसार जेवणानंतर लगेच झोपू नये. थोडी शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजनवाढीला आणि रोगराईला आमंत्रण देणे होय. बैठे प्रकारचे काम करणार्‍यांनी रोज किमान कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास चालावे. साधारणतः 21 व्या मिनिटांपासूनचा व्यायाम हा तुमच्या शरीरातील कॅलरीज जाळण्यासाठी मदत करत असतो; पण हा व्यायाम नियमित करायला हवा. चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये, अशा आशयाचे एक सुभाषित आहे, ते अमलात आणावे. जेवताना नेहमी चार घास कमी खावे.

Back to top button