स्नायू आखडल्यास ‘हे’ उपाय करा | पुढारी

स्नायू आखडल्यास 'हे' उपाय करा

डॉ. मनोज शिंगाडे

रोज सकाळी सूर्यनमस्कार घातल्यास शरीराच्या बर्‍याचशा तक्रारी कमी होतात. आपण विविध प्रकारची कामे करतो तेव्हा त्यातल्या कोणत्या तरी कामामुळे आपल्या स्नायूवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो आणि परिणामी तो स्नायू दुखावला तरी जातो किंवा आखडतो. विशेषत: शरीराला न मानवणारा व्यायाम करणे, मर्यादेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करणे, मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणे किंवा पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करणे यातून स्नायूंवर भार पडतो. अशावेळी खालील प्रकारचे उपाय योजावेत.

स्नायू दुखत असतील तर आपल्या घराच्या आसपास किंवा एखाद्या मोकळ्या मैदानावर फिरावे. स्नायू दुखावल्यामुळे आराम करावासा वाटतो, पण तसा आराम टाळून थोडेसे तरी फिरणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तप्रवाह वेगाने सुरू होतो आणि दुखणार्‍या स्नायूचे दुखणे थांबते. स्नायूच्या दुखण्यावर दुसरा उपाय म्हणजे मालीश करणे. योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने मसाज केला म्हणजे स्नायूचे दुखणे कमी होते. मसाज केल्याने रक्तप्रवाह तर सुधारतोच, परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात. यासाठी आयुर्वेदामध्ये महानारायण तेल, चंदनबल लाक्षादी तेल, तिळाचे तेल यासारख्या तेलांचा पर्याय सुचवला आहे. मालीश करताना अधिक जोर लावण्यापेक्षा त्याची स्थिती महत्त्वाची असते. उदाहरणार्थ पायांना मालीश करताना खालच्या बाजूने वरती अशा प्रकारे मालीश करावे.

आपल्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते आणि ही ग्लुकोज नावाची शर्करा शरीराला ऊर्जा प्रदान करते. परंतु ग्लुकोज तयार करण्याच्या प्रक्रियेत काही वेळा बाधा येते किंवा पुरेसे ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे स्नायू दुखायला लागल्यावर तर प्रथिनयुक्त अन्नपदार्थ खावेत. त्यामध्ये मांस, मासे, दूध आणि शेंगदाण्यासारखे द्विदल अन्न पदार्थ असावेत. स्नायूच्या आखडण्यावर एक चांगला उपाय म्हणजे दुखावलेल्या स्नायूंना थोडासा ताण देणे. एक सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे, व्यायाम करण्याच्या आधी, व्यायामामध्ये आणि व्यायामानंतर भरपूर पाणी पिले पाहिजे.

Back to top button