पाय दुखणे हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते, जाणून घ्या अधिक | पुढारी

पाय दुखणे हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते, जाणून घ्या अधिक

आरोग्यवृत्त

कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयविकाराचा झटका येणे ही आजकाल सर्वात सामान्य समस्या आहे; पण त्याआधी शरीर काही सिग्नल देते. त्याकडे दुर्लक्ष केले नाही तर हृदयविकार वेळीच थांबवता येतो. त्यातील एक म्हणजे पाय दुखणे. पायांमध्ये दीर्घकाळ वेदना होत असतील तर ते हृदयविकाराचा झटका किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते.

तुमच्या शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही तेव्हा पायात मुग्या येणे किंवा पाय दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे सामान्य पाय दुखण्यापेक्षा वेगळे आहे. यामुळे यथावकाश चालण्यास त्रास होतो. तुमचे पाय वराच काळ दुखत असतील आणि पायांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नसेल, तर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढतेच; पण हृदयाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.

भारतातील २५ ते ३० टक्के लोकांना उच्च कोलेस्टेरॉलची समस्या आहे आणि हे उच्च कोलेस्ट्रॉल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे एक कारण आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, ब्लॉकेज अशा समस्या उद्भवू शकतात.

‘पेरिफेरल आर्टरी डिसीज’मध्ये पायांमध्ये अधूनमधून वेदना होतात आणि कडकपणाची समस्यादेखील जाणवते. काही काळानंतर हे त्रास आपोआप बरे होतात; परंतु पायांमध्ये दीर्घकाळ जडपणा आणि वेदना होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे. लठ्ठ किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना हा त्रास होण्याची शक्यता असते. पाय दुखणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यासाठी जास्त चरबीयुक्त आहार घेणे टाळावे. तसेच धूम्रपान, मद्यपान इत्यादी गोष्टींपासून दूर राहावे. पायांचे दुखणे कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे.

Back to top button