

आज तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. काही काळापूर्वी ज्या गोष्टी माणसाला शक्य नव्हत्या, त्या आता हळूहळू तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहेत. अशातच आता असे एक उपकरण बनवण्यात आले आहे, जे रक्ताच्या नमुन्यांमधून कर्करोगाच्या पेशी शोधून विश्लेषण करू शकते. यामुळे बायोप्सीची शक्यता कमी होऊ शकते.
'युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी' च्या संशोधकांनी विकसित केलेले हे उपकरण डॉक्टरांना उपचार प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास मदत करू शकते. या उपकरणाबद्दल नुकतीच बायोसेन्सर्स आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स जर्नलमध्ये माहिती प्रकाशित झाली आहे. 'युनायटेड स्टेटस नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये भारतात कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या १४ लाख ६१ हजार ४२७ असल्याचे आढळून आले आहे. देशातील नऊपैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
'एनआयएच'च्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या माहितीनुसार, सध्या कर्करोगाचे निदान तीन प्रकारे केले जाते. त्यात प्रयोगशाळा चाचण्या, इमेजिंग चाचण्या आणि बायोप्सीचा समावेश आहे. आपल्याला कर्करोग जडल्याचा संशय एखाद्या व्यक्तीला येतो, तेव्हा त्याच्या निश्चित निदानासाठी बायोप्सी करावी लागते. आता नवीन उपकरण शोधण्यात आले आहे. हे उपकरण रक्ताभिसरण करणाऱ्या ट्यूमर पेशींचा वेगाने शोध घेऊ शकते, ज्या ट्यूमरपासून दूर गेल्या आहेत आणि रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. ट्यूमर पेशींना सामान्य रक्तपेशींपासून वेगळे करण्यासाठी हे उपकरण कर्करोगाच्या मेटाबॉलिक चिन्हाचा वापर करते.
सिडनी तंत्रज्ञान विद्यापिठातील डॉ. माजीद वरकियानी म्हणाले आहेत की, १९२० मध्ये जर्मन फिजियोलॉजिस्ट हेनरिच वॉरबर्ग यांनी शोधून काढले की, कर्करोगाच्या पेशी खूप जास्त ग्लुकोज वापरतात आणि त्यामुळे अधिक लॅक्टेट तयार होते, जे निसर्गात अम्लीय आहे. हे यंत्र पेशींच्या आसपास आम्लता शोधणारे पीच संवेदनशील फ्लोरोसेंट रंग वापरून वाढलेल्या लैक्टेटसाठी एकल पेशींचे निरीक्षण करते.
वरकियानी म्हणाले की, फक्त एक लिटर रक्ताच्या कोट्यवधी रक्तपेशींमध्ये एक ट्यूमर सेल असू शकते. यामुळे ट्यूमर पेशी शोधणे कठीण होते.
नवीन तंत्रज्ञानामध्ये ३८ हजार ४०० चेंबर्स आहेत, जे मेटाबॉलिकदृष्ट्या सक्रिय ट्यूमर पेशींची संख्या वेगळी आणि वर्गीकृत करण्यास सक्षम आहेत. या उपकरणाने ट्यूमर पेशी ओळखल्यानंतर अनुवंशिक आणि आण्विक विश्लेषण केले जाते. हे कर्करोगाचे निदान आणि वर्गीकरण करण्यास मदत करू शकते आणि डॉक्टरांना वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यात मदत करू शकते. (लक्षवेधी)