अडेनॉईड आणि होमिओपॅथिक उपचार | पुढारी

अडेनॉईड आणि होमिओपॅथिक उपचार

अडेनॉईडला ग्रीसनी गिलायू असेही म्हणतात, जे नाकाच्या पश्चिद्रापाशी असतात. (अडेनॉईडही घशाच्या वरच्या बाजूस आणि नाकाच्या मागील बाजूस असतात). त्यांचा शरीरकार्याशी असलेला संबंध म्हणजे गिलायू हे श्वसन मार्ग आणि अन्नमार्गाच्या सुरुवातीला असून त्या मार्गाने शरीरात प्रवेश मिळवणाऱ्या जंतूंच्या विरुद्ध प्रतिकार करण्याचे कार्य करतात.

अडेनॉईडची लक्षणे ही त्याचा आकार वाढल्यामुळे जे अडथळे श्वसनाला निर्माण होतात त्यात पाहायला मिळतात. तसेच संसर्गामुळेही याची लक्षणे दिसतात. संसर्ग सामान्यपणे विषाणू आणि जीवाणूंमुळे होतो. हे जीवाणू म्हणजे स्टेप्टोकोकस, स्टॅफिलोकोकस, न्यूमोकोकस आहेत.

कुपोषित बालकांमध्ये याचे प्रमाण जास्त पाहायला मिळते. जी मुले बाहेरचे खाणे व सतत थंड पदार्थांचे सेवन करणे किंवा ज्या बालकांमध्ये वरचेवर सर्दी, खोकला, ताप व टॉन्सिलचे तक्रार असते त्या मुलांच्या मध्येसुद्धा अडेनॉईडचे प्रमाण जास्त बघायला मिळते.
अडेनॉईडचा आकार वाढल्यामुळे होणारी व प्रामुख्याने दिसणारी लक्षणे म्हणजे लहान मुलांना तोंडावाटे श्वास घेणे. घोरणे, तोंडावाटे लाळ येणे तसेच गिळताना त्रास होणे हा प्रकार लहान मुलांमध्ये जास्त पाहायला मिळतो.

चेहऱ्यावर होणारा बदल म्हणजे सतत तोंड उघडे राहते. नाक चिमुटल्यासारखे दिसते व रात्री झोपताना तोंड उघडे राहते. चेहरा अभिव्यक्तीहीन दिसतो व आवाजातही बदल दिसून येतो. अडथळा बरेच दिवस राहिला, तर कान फुटणे, कानातून पू येणे, ऐकायला कमी येणे अशी लक्षणेसुद्धा दिसतात व ती बळावतात. संसर्गामुळे नाकावाटे सर्दी वाहणे, सर्दी साठून राहणे तसेच टॉन्सिल वाढणे, टॉन्सिलचा संसर्ग वाढणे, घसा धरणे, वारंवार खोकला होणे तसेच मानेभोवती अवधानाच्या गाठी दिसणे या समस्या निर्माण होतात.

अडेनॉईड तपासणी

अडेनॉईड तोंड उघडून पाहिल्यास दिसत नसतात, तर त्याची लक्षणे हीच महत्त्वाची असतात. ती त्याचे योग्य निदान करण्यासाठी कारणीभूत असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, सकस आहाराचे महत्त्व व त्याच्याबद्दलची माहिती मुलांना व आईंना समजावून सांगणे आणि वरील सर्व लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने तपासण्या करून घेणे हे पालकांच्या व पाल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण, योग्यवेळी निदान झाले नाही, तर आरोग्याबरोबरच दातांचीही ठेवण बिघडते. दात वेडेवाकडे येतात.

अडेनॉईडचे निदान डॉक्टरांच्या सल्ल्याने होणे गरजेचे असते. होमिओपॅथिक औषधांमुळे मुलांमध्ये चांगला फरक जाणवतो. मुलांना वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप याच्यावर योग्य उपचार तर देता येतातच शिवाय त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, स्वभाव याचासुद्धा विचार करता येतो. खालील काही होमिओपॅथिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे.

Back to top button